जनमेजय साम्राज्याचा अधिपति झाला होता. त्याचें राज्य दूरवर पसरलेलें होतें. ठिकठिकाणचें लहान लहान राजे त्याला करभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनांत नागांचा द्वेष होता. वक्रतुंडानें तो वाढीला लावला होता पित्याच्या त्या भयंकर मरणानें तो पराकोटीला गेला होता.  'ही भूमि मी निर्नाग करीन ' अशी त्यानें प्रतिज्ञा केली होती.  त्या प्रतिज्ञापूर्तीच्या कामाला तो लागला. त्यानें या बाबतींत कोणाचें ऐकावयाचें नाहीं असें ठरविलें. 'माझ्या पित्याचा प्राण घेणारी जात दुष्टच असली पाहिजे. नागाची पूजा करणारे नागासारखेच दुष्ट असावयाचे. सर्पांप्रमाणें ते वक्रगति व विष वमणारें असावयाचें. अशी दुष्ट जात जगांतून दूर केलीच पाहिजे.' असें तो म्हणे.  सर्व सत्ता हातीं येईपर्यंत तो वाट पाहात होता.  परंतु आतां कोण करणार विरोध ? कोण येणार आडवा ?

'साम्राज्यांत कोणीहि नागपूजा करतां कामा नये,' असें त्यानें आज्ञापिलें.  नागांचे उत्सव, यात्रा यांवर त्यानें बंधन घातलें. कोणत्याहि अधिकारावर नागांना नेमावयाचें नाहीं, असें ठरविण्यांत आलें.  नागांशी आर्यांचे विवाह होतां कामां नयेत, असें त्यानें उद्धोषिलें.  इतर मांडलिक राजांना त्याने पत्रें लिहिली. 'आपापल्या राज्यांत नागपूजा बंद करा, कोणी नागपूजा करील तर त्याचें शासन करा, नागांना कोठेंहि कसलेहि अधिकार देऊं नका.' असें त्यानें कळविलें.

सर्वत्र छळ होऊं लागला. वक्रतुंड व त्याचे हस्तक प्रचार करूं लागले.  राजाच्या आज्ञेप्रमाणें अधिकारी वागत आहेत किंवा नाहींत, सामंत राजे वागत आहेत कीं नाहीत, हें ते पाहात व जनमेजयाला कळवीत.  पाषाणमयी सुंदर नागमूर्तीचा संहार होऊं लागला. त्या गांवाबाहेर फेंकण्यांत येऊ लागल्या. सर्वत्र असंतोष माजला.

आर्यांच्या पुष्कळ स्त्रिया नागपूजक झाल्या होत्या. त्या फुलें व दूध घेऊन गांवाबाहेर जात, कोठें एखादे वारूळ पाहून तेथें फुलें वाहून येत, दूध अर्पून येत. परंतु त्यांना बंदी होऊं लागली. आर्यस्त्रिया घरांतच भिंतीवर, पाटावर नागांचें चंदनी गंधानें चित्र काढीत व पूजा करीत. परंतु राजपुरुषांना कळलें तर दंड होई.  गुप्त हेरांचा सुळसुळाट झाला. भिंतीला कान फुटले, उशाखाली विंचू आला. सुरक्षितता कोठें दिसेना.

जनमेजयाच्या साम्राज्यांत नागांचे एक मोठें गांव होतें. त्यांनी तेथें आज्ञा-भंग करण्याचें ठरविलें. फारच प्रचंड अशीं पांच फणांची अतिशय मनोहर पाषाणमयी नागमूर्ति त्या गांवी होती. ज्या वेळीं त्या मूर्तीचा उत्सव होई, त्या वेळीं त्या पांच फणा हिरेमाणकांनी सजवीत. 'उत्सव कायमचा बंद करा. राजाधिराज जनमेजयमहाराजांचे अनुशासन पाळा. नाहीं तर समूळ उच्छेद  केला जाईल. ' असें धमकीचें पत्र तेथील नागनायकास आलें. गांवांतील नाग-स्त्रीपुरुषांची प्रचंड सभा भरली त्या सभेंत तें जनमेजयाचें अनुशासन प्रकट रीतीनें जाळण्यांत आलें. संतापजनक भाषणें तेथें झाली. नागांचा निश्चय झाला. उत्सव करण्याचें सर्वांनी ठरविलें. जनमेजयाचें सैन्य आलें तर त्याचा समाचार घेण्यासाठी नाग तरुण सिध्द झालें. सोळा वर्षावरील प्रत्येक नाग तरुण सन्नध्द झाला. गदा, तलवार, पट्टा, बाण वगैरे शस्त्रास्त्रांची जमवाजमव करण्यांत आली.  महाद्वारावर हजारों दगड गोहा करून ठेवण्यांत आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to आस्तिक


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
श्यामची आई
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
गावांतल्या गजाली
अजरामर कथा
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
पैलतीराच्या गोष्टी