भरलेल्या पवित्र कमळाची गाणी गात शेकडो भ्रमर येतील; परंतु कमलपुष्प लक्ष देणार नाही. भारतीय संस्कृती स्वत:ची स्तुतिस्तोत्रे गात बसणार नाही. जगाला वाटले तर तिची स्तुती करू दे. भारतीय संस्कृती गाजावाजा न करता फुलत राहील. जगाला गीतेची स्तुती करू दे; जगाला बुध्दाचा महिमा गाऊ दे; जगाने गांधींना म्हणू दे महात्माजी; जगाने म्हणू दे रवीन्द्रनाथांना महर्षी. भारतीय संस्कृती आपल्या लेकरांस सांगते, 'तुम्ही कर्मात रमा. निंदास्तुतीवर काटी लावून ध्येयात बुडा.' तुम्ही स्वकर्मात इतके तन्मय झालात की कीर्ती आपोआप तुमच्याकडे येईल, आपोआप तुमचे पोवाडे जग गाईल.

कमळ म्हणते, 'अनासक्त राहा, प्रकाशाची पूजा करा, अमंगलातून मंगल घ्या, तपस्या करा, केवळ सत्कर्मात रमा, नवीन नवीन जोडा.' भारतीय संस्कृती म्हणजे काय, तर 'कमळ'.

दुसरे महान प्रतीक म्हणजे यज्ञ किंवा होम. भारतीय संस्कृती म्हणजे त्याग. समाजात एकमेकांसाठी झिजावे लागेल. त्याग करावा लागेल. एकमेकांनी एकमेकांचे जीवन व्हावयाचे. कोणताही संस्कार असो, कोणताही धार्मिक विधी असो, तेथे होम आहे. तुम्ही कोणतेही ध्येय घ्या, कोणतेही समाजसेवेचे कर्म उचला, तेथे तुम्हांला होम करावा लागेल. उत्तरोत्तर वाढता होम करावा लागेल. उपनयनाच्या वेळेस होम आहे. तुला ज्ञान मिळवावयाचे असेल, तर इतर सर्व सुखांचा होम करावा लागेल. 'सुखार्थिन: कुतो विद्या, कुतो विद्यार्थिन: सुखम्' हे ध्यानात धरावे लागेल.

विवाहाच्या वेळेस होम आहे. तुम्हांला उभयतांस संसारात आनंद हवा असेल, तर परस्परांसाठी वैयक्तिक इच्छांचा होम करावा लागेल. तुमचा गृहस्थाश्रम तरच सुखकर होईल. पती आपलाच तुणतुणे वाजवील, पत्नी आपलाच हट्ट धरील, तर आनंद कसा नांदेल ? संसार म्हणजे सहकार्य, देवाण-घेवाण. आणि शेवटी तुमचा गृहस्थाश्रमही समाजासाठी आहे. समाज मागेल त्या वेळेस तुमची मुले-बाळे, तुमचे घरदार, तुमचे सर्वस्व अर्पण करा; सेवा म्हणजे होम !

पावित्र्य म्हणजे चिर यज्ञ, उत्तरोत्तर अधिकाधिक पावित्र्य मिळविण्यासाठी क्षुद्र वस्तूंचा होम करावा लागतो. सर्वांगावर भस्म फासावयाचे. देवाची प्राप्ती, ध्येयप्राप्ती फुकाफुकी नाही, त्यासाठी होळी पेटवावी लागते. स्वार्थाची, सुखविलासांची राखरांगोळी करावी लागते. सर्वेन्द्रियांच्या वासनांचे भस्म करावे लागते. शरीराचे भस्म करावे लागते. देवघरात शिरत आहेस, भस्म लावून जा. ध्येयाची पूजा करावयाची आहे ना ? सर्वस्वावर निखारा ठेवून बाहेर पड.
तुकाराममहाराजांनी म्हटले आहे :
"संसारास आग लावुनियां हातें ।  मागुतें परीते पाहूं नये'

'संसारास आग लावून मागे पाहू नका. मागच्याचे कसे होईल याची चिंता नका करू.' तुझे ध्येय व तू ! अमळनेरचे थोर संत सखाराममहाराज ज्या वेळेस पंढरपूरला जावयास निघत, त्या वेळेस ते आपल्या झोपडीला प्रथम काडी लावीत आणि मग पंढरपूरचा रस्ता धरीत ! देवाकडे जाताना मागची भुणभुण नको. देवाकडे जाणे, ध्येयाची पूजा करणे, म्हणजे सतीचे वाण आहे !

आपण कपाळाला गंध का लावतो ? देवाला गंध लाविल्यावर स्वत:ला गंध लावावयाचे. आधी देवाला गंध, मग मला गंध. देवाची पूजा करून त्याच्या चरणी भक्त मस्तक ठेवतो. देवाच्या पायावर ठेवलेल्या स्वत:च्या कपाळाला तो गंध लावतो. 'हे डोके आता माझे नाही, देवाचे डोके झाले. देवाला आवडणारे विचारच या डोक्यात आता येतील. हे मंगल मूर्तीचे डोके आहे. हे आता माकडाचे, आग लावणारे, घाणीने भरलेले डोके नाही. या डोक्याची आता पूजा करू दे.  डोक्यालाही गंध लावू दे.' अशी गंधाच्या पाठीमागची भूमिका आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारतीय संस्कृती


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
भारताची महान'राज'रत्ने
गावांतल्या गजाली
गांवाकडच्या गोष्टी
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत