खरं पाहिले तर, अर्थशास्त्र सुधारल्याशिवाय कामशास्त्र सुधारणार नाही. धर्ममय, समाजाचे नीट धारणपोषण करणारे, सर्वाचा विकास करू पाहणारे अर्थशास्त्र जोपर्यंत नाही, तोपर्यत तेजस्वी कामशास्त्र तरी कसे संभवणार? मजुराला का आम्ही बह्मचर्याचे धडे शिकवीत बसायचे? वरच्या वर्गांनी वाटेल तशी चैन करावयाची आणि मजुरांच्या मुलांची उपासमार व्हावयाची! श्रीमंत दोन त-हांनी पाप करीत आहेत. श्रीमंत आता संततिनियमन करून खुशाल माडया-महालांत भोग भोगीत असतात; समाजाला बालकेही ते देत नाहीत. समाजाचे हे महान कर्म ते टाळू पाहात आहेत. समाजात संपत्तीची निर्मिती मजुरांनीच करावयाची आणि मुलांची निर्मिती करुन समाजाचे अस्तित्वही त्यांनीच टिकवावयाचे! परंतु मजुरांच्या मुलांना पोटभर खायला मिळेल अशी व्यवस्थाही हे श्रीमंत करू इच्छीत नाहीत. श्रीमंत स्वत: संतती निर्माण करूनही संपत्ती नाही;  गरिबांनीच झिजून संपत्ती निर्माण करावयाची आणि गरिबांच्या बायकांनीच झिजून संतती निर्माण करावयाची! मेणबती बिचारी दोन्हीकडून पेटली, तर लवकरच खलास होईल, झाले!

मजुरांजवळ पोटाला पुरेसे नाही आणि संततिनियमानाची साधनेही त्यांच्याजवळ नाहीत. संततिनियमनाविरुध्द सनातनी आरडाओरडा करतात. परंतु मजुरांच्या मुलांना पोटभर खावयाला मिळेल. त्या मुलांच्या वर्णाप्रमाणे त्यांना शिक्षण मिळेल, असे धर्ममय अर्थशास्त्र समाजात निर्माण करण्यासाठी मात्र ओरडत नाहीत! जोपर्यंत समाजात ही विषमता आहे, तोपर्यंत गरिबाला संततिनियमनाशिवाय कोणता मार्ग? त्याला का ब्रह्मचर्यांचे उपदेश पाजणार? ती दु:खावर डागणी आहे.

परंतु हे संततिनियमनाचे ज्ञान तरी मजुराला कोण देणार? ज्ञानाची साधनेही श्रीमंतांसाठीच आहेत. ते उपायही श्रीमंतच करू शकतात. औषधाला दिडकी ज्याच्याजवळ नाही, तो कोठून आणणार डॉक्टर? साध्या आरोग्याचे ज्याला ज्ञान नाही, तो या गुतांगुंतीच्या शास्त्रात कसा नीट वागणार? मजुराच्या संसारात खायला नाही, ल्यायला नाही, शिकायला नाही, तेथे सारा अंधार आहे! मुले उत्पन्न होणार व समाज दिवसेंदिवस दीन-दरिद्री, दु:खी होणार!

धर्ममय अर्थशास्त्र समाजात आल्यावर ते या सर्व गोष्टींचा विचार करील. पृथ्वीवर किती माणसे जगू शकतील? कितींचे पोषण होईल? पडित जमिनी लागवडीस आणू. सुधारलेली शेती करू. विद्युत उष्णता देऊन वर्षातून चार- चार, पाच-पाच पिके घेऊ वाळवंटेही सुपीक करू. कृत्रिम पाऊस पाडू. लोकसंख्या वाढत चालली, अशी उगीच हाकाटी धर्ममय अर्थशास्त्र करणार नाही आणि किती लोकसंख्या पृथ्वीला चालेल हे पाहून मग नियमन घालील. इतकीच मुले निर्माण करा, असे हे धर्ममय अर्थशास्त्र आज्ञा करील. ज्याप्रमाणे यंत्रातून जरूर तितकी वस्त्रे निर्माण केली जातील त्याप्रमाणे धर्ममय अर्थशास्त्रही जरूर तेवढीच मुले समाजाला देईल.

ज्या वेळेस हिंदुस्थानात भरपूर जमीन होती, लोकसंख्याच कमी होती त्या वेळेस ''अष्टपुत्रा सौभाग्यवती भव'' असा आशीर्वाद देणे म्हणजे धर्म्य वस्तू  होती; परंतु समाजात धर्ममय अर्थशास्त्र नसताना आणि समाजात लोकसंख्या मात्र भरपूर असताना ''अष्टपुत्रा भव'' असा आशीर्वाद देणे म्हणजे शापच आहे! आपण काय बोलतो हेच आपणांस समजत नाहीसे झाले आहे! ''अष्टपुत्रा भव'' असा आशीर्वाद देणा-याला जर म्हटले, ''त्या आठ पुत्रांचे पोषण व्हावे म्हणून साम्यवाद समाजात आणशील का? '' तर तो म्हणेल, ''अब्रह्मण्यम्! साम्यवादाचे पाप कशाला? नाव काढू नका त्या भ्रष्ट साम्यवादाचे''!मग पुन्हा त्या आशीर्वाद देणा-याला म्हणा, ''आठ पुत्र घेऊन काय करु!''  संततिनियमन मला शिकवा. तुझा आशीर्वाद नसला तरी मला मुले होणारच, परंतु त्यांचे पोषण कसे करू?  पोषण करावयास समाजाचे धारण करणारे साम्यवादी अर्थशास्त्र आणा असे म्हणताच तुम्ही रागावता, तर मग मुले न होताच कसा भोग भोगू ते सांगा. भोग न भोगणे जमणार नाही. ते देवांनाही शक्य झाले नाही. ऋषिमुनींना शक्य झाले नाही. कोणी भिल्लीण पाहून भुलले, कोणी कोळीण पाहून भुलले! तेव्हा उगीच ब्रह्मचर्याचा मंत्र बोलू नका. भोग भोगावयाचा, पंरतु समाजात रडकी, दुबळी मुले पाहण्याचे तरी दु:ख नको. आपले पोटचे गोळे वस्त्रहिन पाहणे मायबापांना का आवडेल? अहो, आपण गायी बैलांनाही थंडीत झूल करतो. तेव्हा तुम्ही संततिनियमनाचे शास्त्र सांगा. '' तर तो धर्ममार्तंड 'अब्रह्मण्यम्' म्हणून पळून जाईल. !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारतीय संस्कृती


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
भारताची महान'राज'रत्ने
गावांतल्या गजाली
गांवाकडच्या गोष्टी
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत