या विशाल भारतात अनेक प्रांत आहेत. मोठ्या कुटुंबात पुष्कळ भाऊ असावेत, त्याप्रमाणे या विशाल भारतीय कुटुंबात पुष्कळ भाऊ आहेत. या भावांनी परस्परांशी संयमाने वागले पाहिजे. एक कुटुंबात राहावयाचे असेल तर आपापलीच तुणतुणी वाजवून चालणार नाही. आपापलेच सूर उंच करून भागणार नाही. युरोपात लहान अनेक देश विभक्त आहेत. आणि कापाकापी करीत आहेत. तसे जर भारताचे व्हावयास नको असेल तर भारताने जपले पाहिजे. आणि एकत्र कुटुंबात दुस-याचे सुखदुःख आधी पाहावयाचे, आधी माझे नाही, आधी तुझे ; हे जसे करावे लागते, तसेच आपणांस भारतीय संसारात करावे लागेल. महाराष्ट्रीयाने गुजरातला म्हणावे, “धन्य गुजरात ! महात्माजींस जन्म देणारा गुजरात धन्य होय.” गुजरातने महाराष्ट्रास म्हणावे, “धन्य महाराष्ट्र ! लोकमान्यांना जन्म देणारा, छत्रपती श्रीशिवाजीस जन्म देणारा शूरांचा महाराष्ट्र धन्य आहे ! बंगालला म्हणावे, “बा वंग देशा ! कृतार्थ आहेस तू ! जगदीशचंद्र, प्रफुल्लचंद्र, रवीन्द्र यांना जन्म देणा-या ! देशबंधू, सुभाषबाबू यांना जन्म देणा-या ! श्रीरामकृष्ण व विवेकानंद यांना प्रसवणा-या ! बलिदान देणा-या शेकडो सुपुत्रांनी शोभणा-या ! धन्य आहे तुझी !” पंजाबला म्हणावे, “हे पंजाबा ! दयानंदांची तू कर्मभूमी ! स्वामी रामतीर्थांची जन्मभूमी ! श्रद्धानंद, लालाजी, भरतसिंग यांची तू माता ! थोर आहेस तू !” सरहद्द प्रांताला म्हणावे, “पंचवीस लाख लोकांतून सोळा हजार सत्याग्रही देणा-या तेजस्वी प्रांता ! धन्य आहे तुझी ! देवाचे सैनिक देणा-या प्रांता ! तू भारताची शोभा व आशा आहेस !” अशा रीतीने सारे प्रांत परस्परांची मुक्तकंठाने स्तुती करीत आहेत, एकमेकांचा गौरव करीत आहेत, एकमेकांचा प्रकाश घेत आहेत, एकमेकांपासून स्फूर्ती घेत आहेत, एकमेकांचे हात हातांत घेत आहेत, -असा देखावा या भारतात दिसला पाहिजे ! परंतु याला मोठे मन हवे. याला संयम हवा. स्वतःचा अहंकार दूर राखावयास हवा.

जो दुस-याच्या सुखदुःखांचा विचार करू लागला, त्याला संयम सुलभ वाटतो. मी असे केले तर त्याला काय वाटेल, मी असे बोललो तर त्याचा काय परिणाम होईल, असे लिहिल्याने व्यर्थ मने तर नाही ना दुखावली जाणार, जोराने पाय आपटीत गेलो तर कोणाची झोप नाही ना मोडणार, रात्री रस्त्याने मोठ्याने चर्चा करीत वा गाणी गात गेलो तर कोणास त्रास नाही ना होणार, सभास्थानी आपण आपसांत चर्चा करू लागलो तर व्याख्यान ऐकून घेण्यास इतरांस अडचण तर नाही ना होणार, एक का दोन, -शेकडो बारीकसारीक गोष्टींच्या वेळी दुस-यांची आठवण झाली पाहिजे. परंतु आपल्या देशात ही सवयच नाही. दुस-यांचा विचार क्षणभरही आपल्या मनात डोकावत नाही. कारण सहानुभूती कमी. जेथे सहानुभूती नाही तेथे संयम नाही.

दुस-याला आपल्या कृत्यापासून उगीच त्रास होईल ही भावनाच आपल्या लोकांच्या मनातून गेला आहे. जणू मीच काय तो एकटा जिवंत आहे. आजूबाजूला कोणी नाही, या भावनेने आपण वागत असतो. पाश्चिमात्य देशांत ही वस्तू नाही. पाश्चिमात्य देशांत त्यांच्या सार्वजनिक जीवनात संयम अधिक आहे. ते रस्त्यातून उगी गोंगाट करणार नाहीत.   दुस-याला त्रास होईल असे काही करणार नाहीत. सर्वत्र व्यवस्थिकतपणा आढळेल. संयमाशिवाय व्यवस्थितपणा येत नसतो. जेथे संयम नाही तेथे सारी बजबजपुरीच ! आपल्या सभा पाहा, आपल्या मिरवणुकी पाहा, स्टेशनवर तिकिटाच्या तेथे पाहा. सर्वत्र संयमहीन जीवन आढळेल. आणि कोणी संयम सुचविला तर त्याचीच टर उडविण्यात येते!  “अहो, जरा हळू बोला !” असे कोणास सुचविले, तर “गप्प बसा, मोठे आलेत शिष्ट !” असे पुणेरी जोडे एकदम मिळावयाचे !

एखादा शब्द आपण एकदम बोलतो आणि त्याने कायमची मने तोडली जातात. एखादे भरमसाट विधान करतो आणि कायमची वैरे उत्पन्न होतात. आणि एकदा तुटलेली मने जोडणे कठीण आहे.

फुटले मोती तुटले मन। सांधूं न शके विधाता।।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारतीय संस्कृती


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
भारताची महान'राज'रत्ने
गावांतल्या गजाली
गांवाकडच्या गोष्टी
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत