आर्त भक्त म्हणजे काय? आर्त म्हणजे दु:ख सांगणारा, देवाजवळ दु:ख सांगणारा. हे कोणाचे दु:ख? मला वाटते, भक्त जो असेल तो केवळ स्वत:चे दु:ख उगाळीत बसणार नाही. हा उदार आर्त आहे. या चारी भक्तांना उदार म्हटले आहे. जगाच्या दु:खाने तो आर्त भक्त दु:खी होतो. सर्व समाजातील भीषण अन्याय पाहून त्याचे अंत:करण तळमळते. समर्थांनी लहानपणीच आईला सांगितले:

“आई! चिंता करितो विश्वाची”

समर्थांसारख्या उदार आर्त भक्तांना समाजाची चिंता प्रथम असते. या समाजाचे भले कसे होईल, समाज सुसंपन्न, सुसंस्कृत, सुश्लिष्ट कसा होईल, समाजात अन्न-वस्त्राची, ज्ञानविज्ञानाची विपुलता कशाने होईल, याची त्यांना चिंता लागते. या एकाच चिंतेने त्यांच्या हृदयाची होळी पेटत असते.

झाडूं संतांचे मार्ग। आडरानीं भरले जग।।

सारा संसार रानात शिरलेला त्यांना दिसतो. चुकीच्या मार्गाने लोक जात आहेत व त्यामुळे दु:खात पडत आहेत, असे त्यांना दिसते. या उदार आर्त भक्तांना चैन पडत नाही. किंकाळ्या त्यांच्या कानांवर येत असतात. भक्ताची ही पहिली स्थिती असते. जगाच्या दु:खाशी तो एकरूप होतो.

या उदार आर्ततेतून मग उदार जिज्ञासा उत्पन्न होते. दु:ख तर आहे, परंतु हे दु:ख का आहे याची कारणमीमांसा तो आर्त भक्त करू लागतो. आर्त भक्तीतून जिज्ञासा उत्पन्न होते. प्लेग का येतो? चला शोधू त्याची कारणे. स्वत:च्या अंगात टोचून घेऊ या. प्रयोग करू या. पीतज्वर का होतो? उपदंश का होतो? भूकंप का होतात? ज्वालामुखीचे स्फोट का होतात? वादळे का होतात? पिकांचे रोग का येतात? समाजात व्यभिचार का आहेत? चो-यामा-या का आहेत? समाजात एकीकडे मोठमोठ्या माड्या आणि एकीकडे मातीच्या झोपड्या, असे चित्र का? काहींचे गाल फुगलेले, काहींचे बसलेले; काही अनवाणी, तर काही नवीन बूट घातलेले; काही मर मर मरतात, काही खुशाल गाद्यांवर मांसाच्या गोळ्याप्रमाणे लोळतात; काही अजीर्णाने मरतात; काहींना ज्ञानाचा गंध नाही, काही आमरण शिकतच आहेत! ही अनंत दु:खे का, याची मीमांसा तो आर्त भक्त करू लागतो. राष्ट्राराष्ट्रांत लढाया का? भेद का? साम्राज्यवाद का? गुलामगिरी का? का हे सारे?

अशा रीतीने मनुष्य विचार करू लागला म्हणजे त्याला नाना प्रकारची कारणे दिसतात. ती कारणे दूर करण्याचे उपाय तो शोधू लागतो. परंतु खरा उपाय कोणता? दु:खे दूर करण्याचे अनेक मार्ग त्या जिज्ञासू भक्ताला दिसू लागतात. परंतु सारे मार्ग हितकरच असतील असे नाही. भक्तीची तिसरी स्थिती तो आता अनुभवतो. अर्थार्थी भक्त, दु:ख दूर करण्यासाठी जे जे उपाय सुचले, त्यांतील कोणत्या उपायाने खरोखर अर्थ साधेल हे बघतो. अर्थ म्हणजे कल्याण. मनातील मांगल्याचा अर्थ कोणत्या मार्गाने गेले असता साधेल? अर्थार्थी म्हणजे प्रत्येक गोष्टीत अर्थ पाहणारा, प्रत्येक गोष्टीचे मूल्यमापन करणारा, तिचे महत्त्वमापन करणारा.

समाजातील विरोध व वैषम्ये, हे भेद व ही दुर्भिक्ष्ये दूर करण्यासाठी साम्यवाद चांगला का? ही यंत्रे चांगली आहेत की वाईट आहेत? ग्रामोद्योग सुरू करावेत की यंत्राची पूजा सुरू करावी? हिंदु-मुसलमानांचे प्रश्न आर्थिक आहेत की दुसरी काही कारणे आहेत? हिंसेचा अवलंब करावा की अहिंसेचा? नि:शस्त्र प्रतिकार हितकर आहे की वांझोटा आहे? साम्राज्यान्तर्गत स्वराज्य चांगले की फुटून निघणे चांगले? मुले-मुली एकत्र शिकण्यात हित आहे की अहित आहे? शिक्षण स्वभाषेतून असावे की परभाषेतून? प्रौढविवाह असावेत की बालविवाह? पोषाख एक असावा की नसावा? घटस्फोटाची जरुरी आहे का? स्त्रियांना वारसा हक्क का असू नये?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारतीय संस्कृती


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
भारताची महान'राज'रत्ने
गावांतल्या गजाली
गांवाकडच्या गोष्टी
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत