“आपणास चिमोटा घेतला। तेणें जीव कासावीस झाला।
आपणावरून दुस-याला। ओळखीत जावे।।”


मला कोणी मारले, तर मला दु:ख होते. मला अन्नपाणी मिळाले नाही, तर माझे प्राण कंठात येतात. माझा कोणी अपमान केला, तर मेल्याहून मेल्यासारखे मला होते. मला ज्ञान मिळाले नाही, तर मला लाज वाटते. माझ्याप्रमाणेच दुस-याला असे होत असेल. मला मन, बुद्धी, हृदय आहे. दुस-यालाही ती आहेत. मला माझा विकास व्हावा अशी इच्छा आहे, तशीच ती दुस-यालाही असेल. माझी मान वर असावी, तशीच दुस-याचीही असणे योग्य आहे. थोडक्यात, आपणांस येणा-या सुख-दु:खांच्या अनुभवांवरून दुस-याच्या सुखदु:खांच्या कल्पना येणे, म्हणजेच एक प्रकारे अद्वैत.

मला ज्या गोष्टींनी दु:ख होते, त्या गोष्टी दुस-याच्या बाबतीत मी करणार नाही, हा त्यापासून मनाला बोध मिळतो. मला ज्या गोष्टींनी आनंद होतो, त्या दुस-यासही लाभाव्यात अशी मी खटपट करीन, असेही माझे अद्वैत मला सांगते. अद्वैत म्हणजे अमूर्त कल्पना नव्हे; अद्वैत म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार. अद्वैत म्हणजे चर्चा नव्हे; अद्वैत म्हणजे अनुभूती.

ऋषी केवळ अद्वैताच्या कल्पनेत रमले नाहीत. सर्व जगाशी, सर्व चराचराशी ते एकरूप झाले, रुद्रसूक्त लिहिणारा ऋषी मानवांना काय काय लागेल त्याची काळजी वाहात आहे. सर्व मानवजातीच्या गरजा जणू त्याला स्वत:च्य़ा वाटत आहेत. शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या, भुका तो अनुभवीत आहे.

“घृतं च मे, मधुं च मे, गोधूमाश्य मे, सुखं च मे, शयनं च मे, -हीश्च मे, श्रीश्च मे, धीश्च मे, धिषणा च मे।”

“मला तूप हवे, मध हवा, गहू हवेत, सुख हवे, आंथरूण-पांघरूण हवे, विनय हवा, संपत्ती हवी, बुद्धी हवी, धारणा हवी, मला सारे हवे.”

तो ऋषी स्वत:साठी हे मागत नाही. तो जगदाकार झाला आहे. आजूबाजूच्या सर्व मानवांचा तो विचार करीत आहे. या मानवांना या सर्व गोष्टी केव्हा मिळतील अशी तगमग त्याला लागली आहे. पोटभर खायला, अंगभर ल्यायला या सर्व भावाबहिणांना केव्हा मिळेल, या सर्वांना ज्ञानाचा प्रकाश केव्हा मिळेल, या सर्वांना सुखसमाधान कसे लाभेल, याची चिंता त्या महर्षीला लागूनच राहिली आहे.

समर्थाचेसुद्धा असे एक मागणे आहे. राष्ट्राला जे जे पाहिजे त्याची भिक्षा प्रभूजवळ त्यांनी त्या स्त्रोत्रात मागितली आहे; त्याला “पावनभिक्षा” असे सुंदर नाव दिले आहे. विद्या दे, संगीत दे, गायन दे. सा-या हृद्य व मंगल वस्तू त्यांनी मागितल्या आहेत.

रुद्रसुक्तातील कवी समाजाच्या गरजा सांगत आहे व गरजा पुरविणा-यांना तो वंदन करीत आहे. त्या ऋषीला अमंगल व अशुची कोठेही इवलेसुद्धा दिसत नाही.

“चर्मकारेभ्यो नमो, रथकारेभ्यो नमो, कुलालेभ्यो नमो।”

“अरे चांभारा, तुला नमस्कार; अरे सुतारा, तुला नमस्कार; अरे कुंभारा, तुला नमस्कार!”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारतीय संस्कृती


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
भारताची महान'राज'रत्ने
गावांतल्या गजाली
गांवाकडच्या गोष्टी
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
 भवानी तलवारीचे रहस्य
शिवाजी सावंत