उद्योगधंद्यांत प्रगती करण्याचे सामर्थ्य हिंदुस्थानात आहे, परंतु ते बीजरूपाने आहे, निष्क्रिय आहे व संधी आली की ते तात्काळ सक्रिय बनून उद्योगधंद्यांचा विस्तार झपाट्याने करू शकते एवढे मात्र या महायुध्दाच्या निमित्ताने नि:संशय सिध्द झाले आहे.  आर्थिक दृष्ट्या पाहिले तर जगातील अनेक राष्ट्रांपैकी एक राष्ट्र, एक आर्थिक घटक असलेल्या, या हिंदुस्थानने त्याच्या मार्गात अनेक अडचणी मुद्दाम घातलेल्या असतानाही अवघ्या पाच वर्षोत जिला भांडवल म्हणून हिशेबात धरता येईल अशी खूपच खूप पुंजी जमविली आहे. ही पुंजी हिंदुस्थानच्या इतर देशांकडे घेणे असलेल्या तारणावरच्या स्टलिंग कर्जाच्या स्वरूपात आहे, पण ह्या घेणे रकमेचा उपयोग करण्याची मुभा हिंदुस्थानला नाही.  ह्या कर्जाची फड पुढे स्थगित करण्यात येईल असेही म्हणतात. ब्रिटिश सरकार व अमेरिकन संयुक्त संस्थानांचे राष्ट्र यांच्यातर्फे त्यांच्याकरिता हिंदुस्थान सरकारने जो खर्च केला त्याची रक्कम त्या राष्ट्राकडून येणे आहे म्हणून त्या राष्ट्राकडे हिंदुस्थानचे जे घेणे निघते ते हे कर्ज असे या स्टर्लिंग कर्जाचे एक स्वरूप आहे, पण त्याला दुसरेही एक स्वरूप आहे. भूक, दुष्काळ, साथीचे रोग, नेभळेपणा, क्षीणता, असंख्य हिंदी लोकांची उपासमारीने व रोगाने खुंटलेली वाढ व अकाल-मृत्यू, या प्रकारच्या नाना आपत्ती, या सर्वांची नोंद या हिशेबात घेतली पाहिजे, या पुंजीचा तोही एक अर्थ आहे.

हिंदुस्थानला पूर्वी इंग्लंडचे खूप मोठे देणे होते ते, ही पुंजी हिंदुस्थानचे भांडवल म्हणून इंग्लंडकडे जमा होत गेल्यामुळे पार फिटून गेले व उलट आता हिंदुस्थानला इंग्लंडकडून घेणे झाले आहे, हिंदुस्थान हा इंग्लंडचा सावकार झाला आहे.  सरकारच्या कारभारात कमालीचा हलगर्जीपणा व गोंधळ असल्यामुळे हिंदुस्थानातील प्रजेचे अतोनात हाल झाले हे खरे, पण असे हाल करून घेऊन का होईना, हिंदुस्थान देशाला एवढ्या थोड्या अवधीत एवढ्या मोठाल्या रकमा साचविता येणे शक्य आहे हे सिध्द झाले आहे.  या युध्दाकरिता म्हणून पाच वर्षात हिंदुस्थानने जो काही प्रत्यक्ष खर्च केला त्याची गोळाबेरीज इंग्लंडने शंभर वर्षे हिंदुस्थानात वेळोवेळी घातलेल्या भांडवल रकमेच्या गोळाबेरजेपेक्षा अधिक भरते.  हिंदुस्थानात गेल्या शतकभराच्या ब्रिटिशांच्या राज्यकारभारात देशात रेल्वे, पाटबंधारे वगैरे मोठमोठे कामे झाली व त्यामुळे हिंदुस्थानची मोठी प्रगती झाली असा गाजावाजा नेहमी केला जातो, त्या प्रगतीचा वास्तविक आकार केवढा आहे त्याचे यथार्थ दर्शन या हिशेबाने होते. तसेच या गोष्टीवरून असेही सिध्द होते की, आपली सर्व बाबतीत प्रगती अत्यंत त्वरेने करून घेण्याचे सामर्थ्य हिंदुस्थानच्या अंगी आहे.  प्रतिकूल परिस्थितीशी झगडत असताना व हिंदुस्थानची औद्योगिक वाढ होऊ द्यावयाची नाही अशा मताचे परकीय सरकार राज्यकारभार चालवीत असताना हा असा चमत्कारात जमा होण्याजोगा दीर्घ प्रयत्न जर हिंदुस्थानकडून होऊ शकतो तर स्वतंत्र स्वकीय सरकारच्या राजवटीत योजनापूर्वक वाढ करू म्हटले तर काही थोड्या वर्षातच देशाचे रूप पार पालटेल यात शंका नाही.

ब्रिटिशांनी चालू वर्तमानकाळात हिंदुस्थानात आर्थिक व सामाजिक क्षेत्रात जे काही कार्य सिध्दीस नेले त्याचे मूल्य काय हे ठरवायला या देशात किंवा कोठल्या तरी देशात भूतकालात मागे केव्हातरी जे काही कार्य झाले असेल तेथील प्रमाणे लावावयाची अशी एक विचित्र वहिवाट ब्रिटिशांनी पाडली आहे.  कधी काळी शेकडो वर्षांपूर्वी या देशात आर्थिक वा सामाजिक क्षेत्रात जे काही फेरफार कोणी केले असतील त्यांच्याशी आपण आपल्या राजवटीत काय काय केले याची तुलना ते करतात, व त्यात त्यांना मोठे समाधान वाटते असे दिसते.  जगाच्या पाठीवर एकोणिसाव्या शतकात जी मोठी औद्योगिक क्रांती झाली, व विशेषत: गेल्या पन्नास वर्षांत यंत्रे, रसायने वगैरे उद्योगधंद्यांच्या साधनसामग्रीत जी प्रचंड सुधारणा झाली तिच्यामुळे मानवी जीवनाची गती किती वाढली, चाल किती बदलून गेली, ह्या गोष्टीचा हिंदुस्थानसंबंधी विचार करताना ब्रिटिशांना कशामुळे तरी विसर पडलेला दिसतो.  हिंदुस्थानात ते आले तेव्हा हा देश ओसाड, नापीक पडलेला व येथील लोक विद्या व आचार यांचा गंध नसलेले अडाणी रानटी अशी स्थिती नसून तो देश म्हणजे एक सर्वांगीण विकास झालेले सुसंस्कृत राष्ट्र होते, मात्र त्याचे जीवन तात्पुरते गोठून अचल बनले होते व व्यवहारोपयोगी यंत्रविज्ञानात ते तात्पुरते मागासलेले होते, ह्या गोष्टीचाही ब्रिटिशांना विसर पडलेला दिसतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारताचा शोध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल