ज्या काळात प्रवास करणे अतिकठीण होते, दळणवळणाची साधने मंदगतीची व जुनीपुराणी होती, अशा काळात या विशाल देशात शंकराचार्यांनी केलेल्या या प्रवासयात्रांना विशेषच महत्त्व आहे.  असे ते प्रवास, ठायी ठायी समविचाराची मंडळी भेटणे, संस्कृतमधून होणारी संभाषणे, संवाद, त्या काळातील सुशिक्षितांचे संस्कृत एकच एक राष्ट्रभाषा हे सारे डोळ्यांसमोर आले म्हणजे त्या दूरच्या काळातही भारताचे मूलभूत ऐक्य कसे होते हे स्पष्ट झाल्यावाचून राहात नाही.  असे प्रवास त्या काळात किंवा त्यापूर्वीही अपवादात्मक नव्हते.  राजकीय दृष्टी ऐक्य नसले तरीही लोक सर्वत्र जात-येत.  ग्रंथ दूरवर जात.  कोणताही नवीन सिध्दान्त निघाला, नवीन विचार निघाला की, ताबडतोब हिंदुस्थानभर त्याचा बोलबाला होऊ लागे; जिकडे तिकडे त्याच्यावर जोदार चर्चा होई.  सुशिक्षितांच्याच जीवनात समान बौध्दिक आणि सांस्कृतिक जीवन होते असे नाही, तर बहुजनसमाजातही एकता होती.  किती तरी सामान्य लोकही यात्रांसाठी हिंदुस्थानभर जात; रामायण-महाभारत काळापासून प्रसिध्द तीर्थांना जात.  सामान्य लोकांचे काय किंवा विद्वानांचे का, हे सर्वत्र जाणे-येणे, भेटणे, मिसळणे यामुळे आपण सारे एका देशाचे, आपली सर्वांची समान संस्कृती हा विचार अधिकच सर्वांच्या मनात ठसला असला पाहिजे.  या यात्रा वरच्या वर्णाचे लोकच करीत असे नाही; यात्रेकरूंत सर्व वर्णांच्या अनेक वर्गांच्या स्त्रीपुरुषांचा मेळावा जमे.  या यात्रांचे धार्मिक दृष्ट्या काय फळ मिळत असेल त्याबद्दल यात्रेकरूंच्या मनात कोणत्याही भावना असोत, आजच्या प्रमाणे त्या काळातही संसारातून थोडा विरंगुळा म्हणून, थोडा आनंद, करमणूक म्हणून, नाना प्रदेश पाहण्याची इच्छा म्हणून मनुष्य यात्रेला निघत असे.  आणि यात्रेचे प्रत्येक ठिकाणी म्हणजे भारताच्या विविधतेचे थोडक्यात स्वरूप असे.  नाना चालीरीतींचे, नाना पेहेरावांचे, नाना भाषांचे लोक तेथे जमत; परंतु आपल्यांत सारखे असे खूप आहे, समान बंधनांनी बांधलेले असल्यामुळे आपण सारे येथे आलो, ही भावना सर्वांना असे.  अशा या मेळाव्यात दक्षिण व उत्तर अशी भाषेचीही विशेष अडचण आड येत नसे.

शंकराचार्यांच्याही काळात हे सारे असे होते, आणि त्यांना त्याची नीट कल्पना होती.  हे जे राष्ट्रीय ऐक्य, ही जी समानतेची, एकतेची जाणीव तिच्यात अधिक भर घालावी, असे त्यांच्या मनात असावे.  बौध्दिक, तत्त्वज्ञानात्मक आणि धार्मिक अशा तिन्ही भूमिकांवरून त्यांनी कार्य करून, सर्व देशभर विचारांची अधिक एकता असावी म्हणून प्रयत्न केला.  बहुजनसमाजासाठीही त्यांनी अनेक प्रकारे कार्य केले.  आंधळ्या श्रध्देने, कडवेपणाने पाळलेले अनेक धर्मप्रकार त्यांनी मोडून काढले,  आणि ज्याची ज्याची पात्रता असेल त्या सर्वांना आपल्या तत्त्वज्ञानाच्या पवित्र मंदिराची दारे त्यांनी खुली ठेवली.  हिंदुस्थानच्या चार कोपर्‍यांना चार मठ स्थापून हिंदुस्थानच्या सांस्कृतिक ऐक्याची कल्पना त्यांना आणखी दृढ करायची होती असे दिसते.  ही चारी ठिकाणे पूर्वी यात्रेची ठिकाणे म्हणून प्रसिध्द असली तरी त्यांना अधिकच महत्त्व व पावित्र्य आले.  सार्‍या हिंदुस्थानातून लोक तेथे यात्रेसाठी जाऊ लागले.

आणि प्राचीन भारतीयांनी आपली यात्रास्थानेही कशी सुंदर निवडली आहेत !  ही स्थाने बहुतेक निसर्गरम्य अशाच ठिकाणी आहेत.  उत्तरेला काश्मिरातील हिमाच्छादित ती अमरनाथाची गुहा, तर अगदी दक्षिण टोकाला असलेले केप कामोरिन जवळचे कन्याकुमारीचे ते देवालय !  काशी तर सुप्रसिध्दच आहे आणि हिमालयाच्या पायथ्याला प्रेमाने बिलगून बसलेले हरद्वार !  गंगा बिकट दर्‍याखोर्‍यांतून डोंगरपहाडांतून मोठ्या कष्टाने वहाता वहाता तेथूनच खालच्या सपाट मैदानावर पसरते आणि गंगायमुनांचा जेथे संगम आहे ते प्रयाग; आणि यमुनेच्या तीरावरील ती मथुरा आणि कृष्णाच्या लीलांनी अमर झालेले ते वृंदावन; बुध्दांना जेथे बुध्दत्व प्राप्त झाले ती बुध्दगया; दक्षिणेतीलही ती नाना स्थाने; दक्षिणेकडील मंदिरे म्हणजे विख्यात शिल्पकलेचे अमर नमुने आहेत.  ही सारी यात्रास्थाने पाहिली म्हणजे भारतीय कलेचेही अंतरंग अशा प्रकारे दिसते.

सर्वत्र पसरलेल्या बौध्दधर्माचा शंकराचार्यांनी सोक्षमोक्ष केला, आणि नंतर ब्राह्मणधर्माने बंधुभावाने त्याला आत्मसात केले असे म्हणण्यात येत असते.  परंतु शंकराचार्यांच्या आधीच बौध्दधर्म संकुचित झाला हाता.  शंकराचार्यांचे काही ब्राह्मण प्रतिस्पर्धी त्यांना प्रच्छन्न बुध्द म्हणत.  बौध्दधर्माचा त्यांच्यावर बराच परिणाम झाला होता हे खरे आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारताचा शोध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल