हिंदुस्थानातील राष्ट्रभाषेचा जो प्रश्न आहे, त्याचा या विविधतेशी तसा संबंध नाही.  तो फक्त हिंदी-उर्दूचा प्रश्न आहे.  खरे म्हटले तर दोहोंमिळून भाषा एक आहे, परंतु लिप्या व वाङ्मयप्रकार दोन आहेत.  बोलण्यात फारसा फरक नाही, परंतु लिपीत व विशेषत: लेखनशैलीत अंतर वाढते.  हे अंतर कमी व्हावे असे प्रयत्न चालले आहेत.  दोहोंच्या मिश्रणाने एक नवीनच 'हिंदुस्थानी' असा प्रकार उत्क्रान्त केला जात आहे, आणि ही हिंदुस्थानी हिंदुस्थानभर समजली जाणारी भाषा होत आहे.

पुश्तू ही भाषाही संस्कृतोद्भव आहे.  अफगाणिस्थान व सरहद्द प्रांत यांत ती रूढ आहे.  पर्शियन भाषेचा जास्तीत जास्त परिणाम तिच्यावर झाला आहे.  या सरहद्द प्रांतातच प्राचीन काळी संस्कृत भाषेतील थोर थोर विचारवंत, पंडित आणि व्याकरणकार निर्माण झाले.

सीलोनची सिंहली भाषा आहे.  ही भाषा प्रत्यक्ष संस्कृतोद्भवच, इंडो-आर्यन कुळातलीच आहे.  सिलोनी लोकांना हिंदुस्थानने केवळ बौध्दधर्मच दिला नाही, शिवाय वांशिक दृष्ट्या आणि भाषिक दृष्ट्या ते हिंदी लोकांच्या अत्यंत जवळचे आहेत.

संस्कृत भाषा युरोपातील प्राचीन व अर्वाचीन भाषांशी संबध्द आहे ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे.  स्लाव्ह लोकांच्या भाषेतही असे शब्द आहेत की ज्यांचे मूळ धातू व रूपे आहेत, तीच संस्कृत भाषेतही आहेत.  युरोपातील लिथुआनियातील भाषा ही संस्कृतला जास्तीत जास्त जवळची अशी आहे.

बौध्दधर्माचे तत्त्वज्ञान

असे म्हणतात की, बुध्द ज्या प्रदेशात वास्तव्य करून राहिले त्या प्रदेशातील जनतेची भाषा, एक संस्कृतोद्भव प्राकृत भाषाच त्यांनी वापरली.  त्यांना संस्कृतचे ज्ञान अर्थातच असले पाहिजे.  परंतु सामान्य जनतेला समजावे म्हणून लोकांच्या भाषेत बोलण्याचेच ते पसंत करीत.  ते ज्या प्राकृत भाषेत बोलत तिचा विकास होऊन पाली भाषा झाली.  या पाली भाषेतच बौध्दधर्माचे ग्रंथ आहेत.  बुध्दांच्या मरणानंतर कित्येक वर्षांनी त्यांचे संवाद, त्यांनी केलेल्या चर्चा, त्यांचे उपदेश यांचा संग्रह पाली भाषेत करण्यात आला.  सीलोन, ब्रह्मदेश, सयाम या देशांत जो बौध्दधर्म आहे, तो या पाली ग्रंथांवर आधारलेला आहे.  या देशात बौध्दधर्माचा हीनयान पंथ आहे.

बुध्दांच्या मरणानंतर कित्येक शतकांनी हिंदुस्थानात संस्कृत भाषेचे पुनरुज्जीवन झाले, बौध्दधर्मीय पंडितही संस्कृत भाषेत लिहू लागले, बौध्दधर्माच्या प्रसारासाठी अश्वघोषाने नाटके, काव्ये लिहिली ती संस्कृतातच लिहिली.  त्याची नाटके आजच्या माहितीप्रमाणे सर्वांत जुन्यात जुनी आहेत.  हिंदुस्थानातील बौध्दधर्मीयांचे हे संस्कृत ग्रंथ चीन, तिबेट, जपान, मध्य आशिया या भागात गेले.  तिकडे बौध्दधर्माचा महायान पंथ सुरू झाला.

बुध्द ज्या काळात जन्मले, त्या काळी भारतात नाना मतांचा गलबता, तत्त्वज्ञानाची जिज्ञासापूर्वक विविध चर्चा होत असे, यामुळे लोकांच्या मनात प्रचंड खळबळ चालली होती.  नुसत्या भारतातच नव्हे, सर्व जगभरच ही वैचारिक लाट उसळली होती व याच काळात पायथॅगोरस, झरथुष्ट्र, लाओत्से आणि कन्फ्यूशियस हे महापुरूष झाले.  याच काळात हिंदुस्थानात भगवद्‍गीता अवतरली आणि जडवादही पुढे आला.  बौध्दधर्म, जैनधर्म आणि ज्यातून पुढे षड्दर्शने तयार झाली, ते नाना विचारप्रवाह याच काळातले.  ह्या तात्त्विक विचारांचे वेगवेगळे थर होते.  त्यात केव्हा केव्हा एका थरातून दुसरा थर निघे.  तर केव्हा केव्हा एकाच ठिकाणी वेगवेगळ्या थरांचे मिश्रण होई.  बौध्दधर्माबरोबर तत्त्वज्ञानातील इतर विविध संप्रदायही जन्मले.  बौध्दधर्मातही भेद पडले व त्यामुळे निरनिराळे पंथ अस्तित्वात आले.  तत्त्वजिज्ञासूंची वृत्ती हळूहळू लोपली आणि शाब्दिक वाद मात्र वाढले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारताचा शोध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल