परंतु आतापर्यंत जेवढे समजले आहे तेवढेही अत्यंत महत्त्वाचे आहे—सिंधू नदीच्या खोर्‍यात सापडलेली ही संस्कृती चांगलीच पुढारलेली होती.  त्या स्थितीला यावयाला हजारो वर्षे त्या संस्कृतीला लागली असतील. ही संस्कृती प्रामुख्याने धर्मातीत होती हे एक आश्चर्य; काही धार्मिक अंश तीत आहे, परंतु त्याला फारसे प्राधान्य दिसत नाही.  हिंदुस्थानातील पुढच्या सांस्कृतिक युगाची ही संस्कृती जननी होती हे स्पष्ट आहे.

सर जॉन मार्शल सांगतात, ''मोहेंजो-दारो आणि हराप्पा येथे जी संस्कृती सापडली आहे ती अगदी नवी होती असे नव्हे.  ती पुष्कळ जुनी झालेली आणि भारतीय भूमीत दृढमूल झालेली अशी होती.  या संस्कृतीच्या पाठीमागे हजारो वर्षांचे मानवी प्रयत्न असले पाहिजेत असे या अवशेषांवरून स्पष्ट व नि:संशय दिसते; आणि संस्कृतीचा आरंभ व नंतर विकास झालेल्या प्रदेशांत इराण, मेसापोटेमिया, इजिप्त या देशांप्रमाणे हिंदुस्थानचाही यापुढे उल्लेख करावयास पाहिजे.'' आणि हाच लेखक पुढे आणखी म्हणतो, ''सर्व हिंदुस्थानभर नसली तरी निदान पंजाब आणि सिंधमध्ये तरी एक नवल वाटण्यासारखी एका साच्याची व खूप प्रगती झालेली संस्कृती होती आणि मेसोपोटेमिया यातील समकालीन संस्कृतीपेक्षा ती संस्कृती निराळी होती व काही बाबतीत वरचढ होती.''

सिंधू नदीच्या खोर्‍यातील ह्या लाकांचा तत्कालीन सुमेरियन संस्कृतीशी पुष्कळसा संबंध होता,  आणि अक्कद येथे बहुदा काही हिंदी व्यापार्‍यांची एक वसाहतही होती असा काही पुरावा आहे.  सिंधू नदीच्या तीरावरील शहरांचा माल तैग्रीस-युफ्रातीस नद्यांच्या बाजारात जात असे.  उलट काही सुमेरियन कलांचे नमुने, मेसापोटेमियातील सौंदर्यप्रसाधने व लंबवर्तुळाकार शिक्का या गोष्टी सिंधू नदीच्या खोर्‍यातील लोकांनी तिकडून घेतलेल्या दिसतात.  कच्चा माल किंवा ऐषारामाची साधने येवढ्यापुरताच व्यापार मर्यादित नव्हता.  अरबस्थानच्या किनार्‍यावरून मोहेंजो-दारो येथे मासे पाठविण्यात येत आणि अन्नपुरवठ्यात भर पडे.  *

त्या अतिप्राचीन काळीही हिंदुस्थानात कापसाची वस्त्रे विणली जात होती.  मार्शलने इजिप्त आणि मेसापोटेमिया येथील समकालीन संस्कृतीशी सिंधूनदी संस्कृतीची पुढीलप्रमाणे तुलना केली आहे. ''काही ठळक मुद्दे सांगायचे झाले तर प्रथम हे सांगून टाकतो की, वस्त्रासाठी कापसाचा उपयोग ही गोष्ट त्या काळात फक्त हिंदुस्थानपुरतीच मर्यादित होती व पुढे दोनतीन हजार वर्षांनी ही गोष्ट पाश्चिमात्य जगाला माहीत झाली.  दुसरी गोष्ट म्हणजे इतिहास.  पूर्व इजिप्तमध्ये किंवा मेसापोटेमियात किंवा आशियाच्या पश्चिमेकडील कोणत्याही भागात मोहेंजो-दारो येथे नागरिकांची जी प्रशस्त  घरे  व  पक्की  बांधलेली  स्नानगृहे  सापडली  आहेत  तशी  कोठेही  नव्हती;  त्या हिंदुस्थानबाहेरच्या पश्चिमेकडील देशांत देव-देवतांची मंदिरे, राजवाडे, राजांच्या समाधी यांच्यावर अगणित संपत्ती खर्च करण्यात येई व तसल्या कामाचा अधिक विचार केलेला दिसे.  परंतु सर्वसाधारण लोकांची घरे साधी चिखलामातीचीच होती.  सिंधुतीरावर हे चित्र अगदी उलट आहे.  नागरिकांसाठी उभारलेली येथील घरे अत्यंत सुंदर अशी होती.  येथील सार्वजनिक आणि खाजगी स्नानगृहे, येथील सांडपाणी काढून देऊन त्याचा गावाबाहेर निकाल करण्याची पध्दत प्राचीन संशोधनात कोठेही आढळली नाही.  मोहेंजोदारो येथे पक्क्या विटांची बांधलेली दुमजली घरेही आहेत, त्यांना स्नानगृहे जोडलेली आहेत; पुढे देवडीवाल्याची जागा आहे, व वेगळ्या बिर्‍हाडाची सोय आहे.''

-----------------------
* गॉर्डन चाईल्ड : 'इतिहासात काय घडले ?' (What happened in History?) (पान ११२) पेलिकन पुस्तके.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारताचा शोध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल