याच्या आधी काही दिवस रोममधील एका मित्राने मला लिहिले होते की, तुम्हाला भेटायला मुसोलिनीला आवडेल.  परंतु त्या वेळेस रोमला जाण्याचा माझ्यासमोर प्रश्नच नव्हता.  आणि त्या मित्रास त्याप्रमाणे मी कळविले.  नंतर विमानाने हिंदुस्थानात परत जाण्याचा मी विचार करीत असताना तोच निरोप थोडा अगत्याने, आग्रहपूर्वक आला.  परंतु ही मुलाखत मी टाळू इच्छित होतो.  तरी असभ्य नि अशिष्ट दिसायचीही मला इच्छा नव्हती.  एक प्रकारचा तिटकाराच होता.  परंतु सामान्य काळ असता, काही विलक्षण घडामोडी होत नसत्या तर तो तिटकाराही बाजूस ठेवून मुसोलिनी ही काय चीज आहे ते पाहायला मी गेलो असतो.  कारण ती जिज्ञासा मलाही होती.  परंतु त्याच वेळेस तिकडे अबिसीनियावर इटलीची स्वारी सुरू होती, आणि माझ्या भेटीपासून नानाप्रकारचे तर्क जगात काढण्यात आले असते यात शंका नाही.  फॅसिस्टांच्या प्रचारतंत्रात त्या गोष्टीचा खूप उपयोग केला गेला असता.  मी जरी मागून त्या गोष्टी नाकारल्या असत्या, असे काही झाले नाही असे म्हटले असते तरी त्याचा फारसा उपयोग मग नसतो.  इटली पाहायला गेलेल्या काही हिंदी विद्यार्थ्यांचा नि इतरही पाहुण्यांचा अशा रीतीने प्रचारासाठी उपयोग केला गेल्याचे मला माहीत होते.  त्यांच्या इच्छेविरुध्द नव्हे तर त्यांना न कळवता फॅसिस्ट प्रचारार्थ त्यांचा उपयोग केला गेला होता आणि १९३१ मध्ये इटॅलियन जर्नलमध्ये एक गांधीजींची मुलाखत खोटी प्रसिध्द झालेलीही माझ्या डोळ्यांसमोर होती.

मी माझ्या मित्राला, ''वाईट वाटते. येऊ शकत नाही.'' असे कळविले.  नंतर पुन्हा पत्र लिहिले.  टेलिफोनवरूनही सांगितले की, ''कृपा करून गैरसमज होऊ देऊ नका.''  हे सारे कमलाच्या निधनापूर्वी घडले होते.  तिच्या मृत्यूनंतर मी पुन्हा निरोप धाडला की, ''इतर काही कारणे असोत; परंतु कोणतीही मुलाखत घेण्याच्या मन:स्थितीत मी सध्या नाही.''

मी पुन:पुन्हा नकार पाठवीत होतो, कारण माझा विमानमार्ग रोमवरून होता.  एक संध्याकाळ नि एक रात्र रोममध्ये मला काढावी लागत होती.  जाताना वाटेवर रोम लागत होते व थोडा वेळ तेथे काढणे भाग होते म्हणून मी निक्षून नकार देत होतो.

माँट्रो येथे काही दिवस राहून मी जिनेव्हाला आलो नि तेथून मार्सेलिसला गेलो.  तेथे मी पूर्वेकडे जाणार्‍या विमानात चढलो व रोममध्ये तिसर्‍या प्रहरी उतरलो.  लगेच एक बडा अधिकारी खास लिफाफा घेऊन आला.  ते मुसोलिनीच्या मंत्रिमंडळाच्या प्रमुखाचे पत्र होते की, ''तुम्हाला भेटायला मुसोलिनींना फार आनंद होईल.  सायंकाळी सहाची वेळ भेटीसाठी ठरविली आहे.''  मी चकितच झालो.  मी पाठविलेल्या निरोपाची आलेल्या अधिकार्‍यास आठवण करून दिली.  परंतु त्याने आग्रह धरला की, सारे नक्की केले आहे, आता ते मोडून टाकता येणार नाही.  जर मुलाखत झाली नाही तर कदाचित आलेल्या त्या अधिकार्‍याला नालायक म्हणून काढूनही टाकण्यात आले असते.  ''वर्तमानपत्रात काही येणार नाही.  खात्री बाळगा.  तुम्ही चला.''  असा त्याने मला निर्वाळा दिला.  तो सांगे, ''मुसोलिनीला खुद्द स्वत: तुम्हाला भेटून तुमच्यावर आलेल्या दु:खद प्रसंगाबद्दल, त्याला स्वत:ला फार खेद वाटला आहे एवढेच बोलायचे आहे.''  असा त्या अधिकार्‍याचा व माझा अगदी सर्व शिष्टाचार संभाळीत एक तासभर वाद चालू होता.  आम्हा दोघांनाही त्या वादाचा होत असलेला त्रास क्षणोक्षणी वाढत होता.  त्या एका तासात मी तर अगदी थकून गेलोच, पण मला वाटते तो अधिकारी जास्तच थकला.  हे होता होता, नक्की ठरलेली भेटीची वेळ येऊन ठेपली, व माझ्या मनासारखे अखेर घडले.  मुसोलिनीकडे टेलिफोनवरून संदेश धाडण्यात आला की मी येऊ शकत नाही.

सायंकाळी मुसोलिनीस मी एक पत्र लिहिले की, ''आपण एवढा अगत्याने निरोप पाठवला पण माझा योग नव्हता याबद्दल फार खेद वाटतो.  आपण दाखविलेल्या सहानुभूतीबद्दल फार आभारी आहे.''

माझा प्रवास पुन्हा सुरू झाला.  कैरो येथे काही जुने स्नेही भेटायला आले होते.  नंतर पुन्हा पूर्वेकडे चाललो.  अनेक प्रसंगांत, प्रवासासंबंधी कराव्या लागणार्‍या अनेक कामांत आतापर्यंत माझे मन गुंतलेले होते.  परंतु कैरो सोडल्यावर तासचे तास त्या ओसाड वाळवंटावरून जात असता माझ्या मनाला आता कमला नाही, यापुढे आपण एकटेच, या भयंकर विचाराची एकदम मगरमिठी बसली व सारे शून्य, उदास वाटू लागले.  मी घरी एकटा परत जात होतो.  पण आता मला घर कसचे ?  पूर्वीचे का आता घर होते ?  माझ्या शेजारच्या करंडीत रक्षाकुंभ होता तेवढेच काय ते कमलाचे शिल्लक राहिले, आणि आमची दोघांची आशा-स्वप्ने मरून त्यांची ही राखच राहिली.  'यापुढे कमला नाही' 'यापुढे कमला नाही' हेच शब्द मन पुन्हा पुन्हा म्हणत होते.

मला माझे आत्मचरित्र, तो माझ्या जीवनाचा इतिहास आठवला.  भोवाली येथील आरोग्यधामात कमला होती तेव्हा तिच्या बरोबर या पुस्तकाविषयी मी चर्चा केली होती.  त्या वेळेस ती आत्मकथा मी लिहीत होतो.  एखादे प्रकरण काढून मी तिला वाचून दाखवीत असे.  ते सारे चरित्र तिने पाहिले नव्हते, सगळे ऐकलेही नव्हते व बाकी राहिलेले तिला कधी दिसायचे नव्हते.  जीवनाच्या ग्रंथात दोघांनी मिळून आणखी एखादे प्रकरण लिहिणे माझ्या भाग्यात उरलेलेच नाही.

बगदादला पोचल्यावर लंडनमधील माझ्या प्रकाशकांना मी तार दिली-पुस्तकाची अर्पणपत्रिका कोणाच्या नावावर ? ''कमला जी आज नाही''—

कराची आणि लोकांच्या झुंडी, ओळखीचे चेहरे आले.  शेवटी अलाहाबाद पोचून आम्ही तो अमोल करंडक घेऊन गंगेच्या धावत्या प्रवाहात शिरलो आणि रक्षा त्या पवित्र गंगामाईच्या स्वाधीन केली.

आमच्या कितीतरी पूर्वजांचे अवशेष तिने आतापर्यंत सागराकडे नेले असतील; आणि कितीतरीजणांची अखेरची यात्रा तिच्या प्रवाहाच्या कडेखांद्यावरून होईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भारताचा शोध


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
कथा: निर्णय
खुनाची वेळ
शिवाजी सावंत
पैलतीराच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल