- २ -

नवें जर्मन साम्राज्य नीट सुसंघटित व बलिष्ठ करण्यासाठीं व वाढविण्यासाठीं बिस्मार्कनें फ्रान्सची कुरापत काढली. पण एकटा बिस्मार्कच युध्दप्रिय होता असें नव्हे, तर तिसर्‍या नेपोलियनलाहि युध्दाची खुमखुमी होतीच. भांडणाला नेहमीं दोघांची जरूरी असते. जर्मनीच्या वाढत्या शक्तीचा नेपोलियनला मत्सर वाटत होता. जर्मनीला चिरडून टाकणारा घाव घालावा अशी संधि नेपोलियन पाहत होता, त्याला बिस्मार्कनें संधि दिली व नेपोलियननें खरोखरच चिरडणारा घाव घातला; पण तो जर्मनीवर न पडतां फ्रान्सवरच पडला व फ्रान्स कोलमडला.

जर्मनी व फ्रान्स यांच्यांत आर्थिक तशीच राजकीय स्पर्धा सुरू होती व युध्दाचें हेंच मुख्य कारण होतें. एक क्षुद्रसें तात्कालिक कारणहि होतें; पण तात्कालिक कारणें हीं नेहमींच निमित्तें असतात. चढाऊ राष्ट्र पूर्ण तयारी करून युध्दास सज्ज झालें कीं तें युध्दासाठीं कांहीं तरी निमित्त शोधीतच असतें. १८७० सालीं स्पॅनिश लोकांनीं आपल्या व्यभिचारी राणीला हद्दपार करून लिओपोल्डला गादी दिली. लिओपोल्ड हा जर्मन राजाचा चुलतभाऊ होता. नेपोलियनला कांहीं तरी कलहकारण हवेंच होतें. लिओपोल्ड स्पेनच्या गादीचा वारस व्हावा ही गोष्ट नेपोलियनला मान्य नव्हती. बिस्मार्क युध्दोत्सुक होतांच तो म्हणाला, ''लिओपोल्ड हाच योग्य वारस आहे.'' नेपोलियननें जर्मनीचा राजा वुइल्यम याला लिओपोल्डची वारसदारी रद्द करण्यास सांगितलें, तर बिस्मार्कनें ''शक्य तें सर्व करून लिओपोल्डच राजा निवडला जाईल असें करा'', असें आपल्या राजाला सांगितलें.

जर्मनीचा राजा फारसा युध्दोत्सुक नव्हता. तो नेपोलियन व बिस्मार्क या दोघांनाहि संतुष्ट ठेवूं पाहत होता. खासगी रीतीनें त्यानें लिओपोल्डला स्पॅनिश गादीसाठीं उमेदवार म्हणून उभें न राहण्यास सांगितलें; पण त्यानें जाहीररीत्या मात्र त्याच्यावर कोणत्याहि रीतीनें वजन आणलें नाहीं. येथवर जर्मन राजा व फ्रेंच सम्राट दोघेहि अत्यंत सभ्यतेनें वागले. पण आतां बिस्मार्कनें सुत्रें हातीं घेऊन युध्द भडकेलसें केलें. नेपोलियनच्या एका सभ्य पत्राला वुइल्यम राजानें एक सभ्य भाषेंतील उत्तर तयार करून तें त्याला देण्यासाठीं बिस्मार्ककडे धाडलें. या वेळीं बिस्मार्क एम्स येथें औषधोपचार घेत होता. म्हणून तें उत्तर त्यानें बिस्मार्ककडे तारेनें पाठविलें होतें; पण बिस्मार्कनें त्यांतील कांहीं शब्द गाळून तें उत्तर अशा स्वरूपांत प्रसिध्द केलें कीं, फ्रेंचांना जर्मन व जर्मनांचा फ्रेंच डाकू वाटावे. बिस्मार्कचा हेतु सफल झाला व फ्रेंचांचें आणि जर्मनांचे युध्द जुंपलें; तें वस्तुत: अनावश्यक अतएव मूर्खपणाचें युध्द होतें. त्यांत फ्रेंचांचा मोड झाला व नेपोलियन पदच्युत झाला. दोहों बाजूंचे हजारो लोक ठार झाले. फ्रेंचांनीं रिपब्लिक जाहीर केलें. बिस्मार्कचा जय झाला. जर्मनींतील उत्तरेकडचीं व दक्षिणेकडचीं संस्थानें एक करून जर्मन साम्राज्य स्थापण्यांत आलें. वुइल्यम राजा पहिला केसर (सीझर) वुइल्यम झाला; बिस्मार्कचे घोडे गंगेंत न्हाले; त्याची कीर्ति शिगेला पोंचली, त्याचे मनोरथ पूर्ण झाले, त्याच्या वैभवावर कळस चढला : फ्रान्सचे अल्सेस व लॉरेन हे प्रांत बळकावण्यांत आले व १९१४ च्या महायुध्दाचें बीजारोपण करण्यांत आलें. १८७० च्या व्देषांत व १८७१ च्या तहांत १९१४ च्या महायुध्दाचीं बीजें होतीं.

युरोपचें प्रभुत्व लाभल्यावर बिस्मार्क वसाहतींकडे वळला. ''वसाहतींचा विस्तार'' या नवीन रूढ झालेल्या शब्दांचा अर्थ असा कीं, ''आशिया व आफ्रिका या खंडांतील दुबळया देशांना प्रबळ युरोपियन राष्ट्रानीं गुलाम करणें. पौर्वात्यांच्या या लूटमारीची बिस्मार्कला--त्या लुटीच्या पुरस्कर्त्याला--बिलकुल दिक्कत वाटत नसे. सार्‍या हयातींत त्यानें आपलें कुटुंब व आपला राजा यांपलीकडे कोणासहि व कधींहि सहानुभूति दाखविली नाहीं. इंग्लिश ज्ञानकोशांत प्रो० एपिक ब्रँडेनबर्ग लिहितो, ''मानवजातीसाठीं बिस्मार्कला कांहींहि वाटत नसे.''  त्याला नैतिक दृष्टि मुळीं नव्हतीच. स्वत:च्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेसाठीं मानवाना तो प्यादीं समजत असे. स्वत:चे हेतू पूर्ण करून घेण्यासाठीं तो मानवांच्या आशांची राखरांगोळी करी,  त्यांच्या प्राणांचे हत्याकांड मांडी. पण बिस्मार्कनें आपली कीर्ति पाहिली, तशीच ती नष्ट झालेलीहि पाहण्याचें त्याच्या कपाळीं आलें ! कैसर दुसरा वुइल्यम यानें राजा होताच बिस्मार्कला रजा दिली : आपण त्या लोखंडी, पोलादी मदतीशिवाय मानवजातीची नीट लूटमार करण्यास समर्थ आहों, असा आत्मविश्वास या नवीन तरुण राजाला वाटत असे.

एकाद्या जुनाट हत्याराप्रमाणें बिस्मार्कला फेंकून देण्यांत आल्यामुळें तो सम्राटाविरुध्द जळफळत होता व आपल्या दुर्दैवाला दोष देत होता. पण त्याचा क्रोध कर्मशून्य व विफल होता. २८ जुलै १८९८ रोजीं मृत्यु येईतों तो गंजलेल्या हत्याराप्रमाणें पडून राहिला. त्याला ब्यायशीं वर्षे आयुष्य लाभलें. रक्ताच्या पायावर त्यानें जर्मन साम्राज्याची उभारणी केली. पण हें सामर्थ्यसंपन्न साम्राज्य पन्नासच वर्षांत पुन: रक्तसागरांत बुडून गेलें ! तो अद्वितीय मुत्सद्दी होता; पण मुत्सद्देगिरींतील अगदीं प्राथमिक धडाहि तो शिकला नव्हता. हा धडा कोणता ? युध्दप्रिय बनून जग जिंकण्यास निघणें म्हणजे साम्राज्याच्या विनाशाचा खात्रीचा मार्ग.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय