- २ -

फ्लॉरेन्समध्यें सेर पिअरो अ‍ॅन्टोनिओ नांवाचा वकील होता, त्याचा अनौरस पुत्र लिओनार्डो. हा अ‍ॅन्टोनिओ व्हिन्सी किल्ल्याच्या टस्कन टेंकड्यांत राहत असे. सभोंवतालचे दगडाळ रस्ते पाहून लिओनार्डोच्या मनावर परिणाम झाला असेल. टेंकड्यांवर होणार्‍या छाया-प्रकाशांच्या खेळांचाहि त्याच्या आत्म्यावर खूप परिणाम झाला असेल. लिओनार्डोचें मन, त्याची बुध्दि व त्याचा आत्मा त्या निसर्गावर पोसलीं जात होतीं. लहानपणीं लिओनार्डो अतीव सुंदर होता. त्याचें लावण्य पाहून सारे दिपून जात. त्याचे केस सोनेरी होते. तो अंगांत गुलाबी रंगाचा झगा घाली. तो जणूं मेघांतून खालीं उतरलेला एकादा देवदूतच भासे ! आणि तो गाणें तरी किती सुंदर गाई !—जणूं गंधर्वच स्वर्गांतून उतरलासें वाटे ! अगदीं लहानपणींच तो फ्ल्यूट वाजवावयास शिकला. बापाकडे येणार्‍या पाहुण्यांना तो गाऊन दाखवी; पण गातांना व वाजवितांना मूळच्या शब्दांत तो सुधारणा करी व संगीतांत नावीन्य ओती, त्यायोगें पाहुणे चकित होत !

पण केवळ संगीतांतच अपूर्वता दाखवून लिओनार्डोचें समाधान झालें नाहीं. त्यानें मानवी विचाराच्या प्रत्येक क्षेत्रांत पारंगत व्हावयाचें ठरविलें व तो त्यासाठीं प्रयत्न करूं लागला. लिओनार्डोचें मन गणितज्ञाचें होतें, बोटें कुशल यंत्रज्ञाचीं होतीं, आत्मा कलावन्ताचा होता. (हृदय कलावन्ताचें होतें, बुध्दि गणितज्ञाची होती, बोटें मेकॅनिकची-यंत्रज्ञाचीं-होतीं.) त्या काळीं अ‍ॅन्ड्री डेल व्हेरोशिया हा प्रसिध्द कलावन्त होता. तो चित्रकार, शिल्पकार, मूर्तिकार होता. त्याच्या कलाभवनांत लिओनार्डो वयाच्या अठराव्या वर्षी इ.स. १४०० मध्यें शिरला आणि थोड्या वर्षांतच त्यानें या तिन्ही कलांत आपल्या गुरूला मागें टाकलें. वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्यानें मिलनच्या ड्यूकला एक पत्र लिहिलें. या पत्रांत त्यानें आपणाला शांतीच्या कला व युध्दाचीं शस्त्रास्त्रें यांचा मिलनमधील मुख्य डायरेक्टर नेमावें अशी मागणी केली होती. या ड्यूकचें नांव लुडोव्हिको स्फोर्झा. या पत्रांत लिओनार्डोनें आपल्या अंगच्या गुणांचें वर्णन केलें आहे. 'हें पत्र लिहिणारा एक तर अपूर्व बुध्दीचा तरी असला पाहिजे, नाहीं तर मूर्ख तरी असला पाहिजे असें कोणालाहि वाटलें असतें' असें जीन पॉल रिक्टर म्हणतो. हा आश्चर्यकारक तरुण, ड्यूकला साध्या व स्पष्ट शब्दांत लिहितो, ''शत्रूचा पाठलाग करतांना बरोबर घेऊन जातां येतील असे पूल मी बांधून देऊं शकेन. तसेंच शत्रूचे पूल मी नष्ट करूं शकेन. मी नद्या व दलदली बुजवूं शकेन,  कोरड्या करूं शकेन, दगडी पायावर न बांधलेला कोणताहि किल्ला मी उध्वस्त करूं शकेन. मी नवीन प्रकारची तोफ बनवूं शकेन. नद्यांच्या खालून आवाज न करतां बोगदे कसे बांधावे हें मीं शोधून काढलें आहे. शत्रूवर हल्ला करण्यासाठीं आच्छादित रणगाडे कसें बांधावे हें मला माहीत आहे. पाण्याखालून लढण्याची, बचावाचीं व चढाईचें शस्त्रें करण्याची आश्चर्यकारक योजना माझ्याजवळ आहे. तद्वतच शांततेच्या काळांत मी शिल्पकामांत कोणाचीहि बरोबरी करूं शकेन; चित्रकलेंतहि उत्तामोत्तमांच्या तोडीचें काम मी करूं शकेन; आणि तुमच्या (स्फोर्झाच्या) कीर्तिमान् वडिलांचा घोड्यावर बसलेला पुतळा जगांत कोणींहि पाहिला नसेल इतका सुंदर मी करून देईन.

त्या तरुण लिओनार्डोला जवळच्या वेड्यांच्या दवाखान्यांत न पाठवितां ड्यूकनें त्याला आपल्या राजवाड्यांत बोलावलें. लिओनार्डो आला. राजवाड्यांतील पुरुषमंडळीवर त्यानें प्रभाव पाडला आणि महिला मण्डळाचा तो आवडता झाला. लुडोव्हिको स्फोर्झा याच्या दरबारीं लिओनार्डो वीस वर्षे राहिला.

मिलन येथें तो सरकारी एंजिनिअर होता आणि आनंदोत्सवाचा अनधिकृत आचार्य होता. तो करमणुकीच्या योजना आंखी, संगीत रची, पडदे रंगवी, पोषाखांच्या नवीन नवीन पध्दती निर्मी व दरबारांत होणार्‍या सार्‍या करमणुकींच्या कार्यक्रमांत स्वत: प्रमुखपणें भाग घेई. त्याच्या काळच्या प्रक्षुब्ध जीवनांत त्यानें खूप अ‍ॅक्टिव्ह काम केलें. तो नेहमीं पुढें असे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय