त्याला दिसून आलें कीं, सारासीन अजून बरेच दूर असले तरी मारामारी जवळच आहे.  ज्यूंची कत्तलहि त्याला इष्टच होती.  त्यांचा देव ख्रिश्चनांचा देव थोडाच होता ? म्हणून त्यानें आधीं ज्यूंविरुध्दच क्रूसेड सुरू केलें.  जेथें जेथें तो जाई तेथें तेथें ज्यूंची वस्ती असली तर तो त्या सर्वांची कत्तल करी व नंतर 'शांन्ति: शान्ति: शान्ति: !' असें म्हणे.  त्याचे साथीदार-तीं पवित्रयुध्दवालीं स्त्री-पुरुष-मुलें-कोणालाहि शिल्लक ठेवीत नसत.  ज्यूंना कोठेंहि जातां येत नसे.  कारण, या वेताळांचे लोंढे चोहोंकडून धों धों करीत येत.  क्वचित् कोणीं ज्यूंनीं सर्व संपत्ति देऊं केली तर एकादा बिशप त्याच्या रक्षणार्थ पुढें येई ; पण तोहि ज्यूंची धनदौलत बळकावल्यावर पुन: त्या अकिंचनांना क्रूसेडर्सच्याच हवालीं करी.  ट्रीव्ह्ज् शहरीं ज्यू तेथल्या बिशपच्या दारीं आश्रयासाठीं गेले ; पण बिशप राजवाड्याचे सर्व दरवाजे बंद करून घेऊन गच्चीवरून म्हणाला, ''नीचांनो, हतपतितांनो, तुमचींच पापें तुमच्यावर उलटलीं आहेत.  तुम्हीं ईश्वराच्या पुत्राची निंदा केली आहे,  माता मेरी हिची अवहेलना केली आहे.  जा. मरा.''

या हतभांगी ज्यूंनीं कधीं कधीं तर अलौकिक धैर्य दाखविलें ! कत्तली करणार्‍या या माथेफिरूंचा हा रक्ताळ धर्म स्वीकारण्यापेक्षां किती तरी ज्यू शांतपणें मरणाला तयार होत.  नाझरेथ येथील त्या शांति-मूर्ति येशूचा संदेश क्रूसेडर्सना कळला होता येवढेंच नव्हें, तर तो कृतींतहि आणीत होते.  एका मध्ययुगीन बखरींत पुढील वर्णन आहे :—''शांतीच्या ईश्वराला हांक मारून जणूं या बाया धैर्यानें पदर बांधून उभ्या राहत, आपल्या हातांनीं आपलीं मुळेंबाळें ठार मारीत व नंतर स्वत:ला ठार मारीत.  पुष्कळ पुरुषहि धैर्याचा अवलंब करून प्रथम आपल्या बायकांस ठार मारीत, मग मुलेंबाळें व नोकरचाकर यांसहि ठार करीत.  कोमल स्वभावाच्या व शांत वृत्तीच्या सतीहि आपलीं मुलें ठार मारीत.  परस्परांवर प्रेम जडलेलीं व विवाहबध्द होऊं इच्छिणारीं तरुण जोडपीं खिडक्यांतून बाहेर पाहत व म्हणत, ''हे प्रभो, तुझ्या नांवाचें पावित्र्य राखण्यासाठीं हें पाहा आम्ही काय करीत आहों !'' आणि रक्ताचा पूर वाहूं लागे ! स्त्रियांचें रक्त पुरुषांच्या रक्तांत, तसेंच आई-बापांचें मुलांच्या रक्तांत मिसळे; भावांचें रक्त बहिणींच्या रक्ताला, तर गुरुजनांचें शिष्याच्या रक्ताला मिळे ! त्या एकाच दिवशीं अकराशें जीवांचें हनन झालें.''

ज्यू धर्मोपदेशक यिट्झॅक बेन अशेर याच्या कन्येची वीर व करुण रसांनीं भरलेली कथा कोणीं ऐकली आहे का ? अशी कहाणी जगांत कोणासहि ऐकावयास मिळाली नसेल.  ज्यू धर्मोपदशेक येहुदा याची शूर व निर्भय पत्नी आपल्या मित्रांना विनवून म्हणाली, ''माझीं चार मुलें आहेत, तीं ख्रिश्चनांच्या हातीं जिवंतपणीं पाडतां कामा नये. ते माझ्या बाळांना डाकू, गळेकापू बनवतील ; त्यापेक्षां तीं मरूं देत, ईश्वराच्या नांवाच्या पावित्र्यार्थ बळी जाऊं देत.'' पण जेव्हां एका मित्रानें एका मुलास ठार करण्यासाठीं सुरा उगारला, तेव्हां ती तरुण माता दु:खानें हंबरडा फोडून, कपाळ आपटून घेऊन व छाती पिटून म्हणाली, ''प्रभो, कुठं आहे तुझी प्रेमळ दया व उदार आणि वस्तल करुणा ?'' नंतर ती निराशेनें आपल्या मित्रास म्हणाली, ''या मुलांना एकमेकांच्या डोळ्यांसमोर तरी नको रे मारूं ! आरॉनच्या समक्ष ऐझॅकला मारूं नको, ऐझॅकला आरॉनचं मरण दिसतां कामा नये.  तो पाहाना आरॉन दूर गेला ? '' मग तिनें ऐझॅकला हातांत घेतलें.  तो लहान व दिसण्यास कोंवळा व सुकुमार होता.  तिनें त्याला ठार मारून त्याचें रक्त भांड्यांत धरावें तसें आपल्या बाह्यांत घेतलें.  आरॉननें हें दुरून पाहिलें.  तो एका पेटीमागें लपूं पाहत होता.  त्या बाईला बेला व याड्रोना नामक दोन सुंदर लहान मुली होत्या.  त्यांनीं आपण होऊन धार लावलेले सुरे आईच्या हातीं आणून दिले व खालीं माना घालून आईनें हनन करावें म्हणून त्या तिच्यासमोर वांकल्या.  रॅचेलनें अशा रीतीनें ऐझॅक व दोन मुली त्यांचें बलिदान करून उरलेल्या आरॉनला हांक मारली. 'बाळ, कुठें आहेस तूं ? मी नाहीं हो तुला वांचवूं शकत ?' असें म्हणून तिनें त्याला पेटीमागून ओढलें व त्याचाहि देवाला बळी दिला.  तिच्या पतीनें त्या चार सुकुमार मुलांचें बलिदान पाहून तरवारीवर पडून आत्मबलिदान केलें.  त्याचीं आंतडीं बाहेर आलीं. त्यांतून रक्त वाहत होते.  त्या बाईनें एकेका बाहींत दोन दोन मुलें लपविलीं.  ती तेथें बसून विलाप करीत असतां क्रूसेडर्स त्या खोलींत आले व गर्जले, ''ज्यू डाकिणी, दे सगळें धन.  बाह्यांत लपवून ठेवतेस काय ?'' पण झडती घेतां बाह्यांत त्यांना तीं मृत बाळें दिसलीं.  एकाच घावासरशीं त्यांनीं तिलाहि मुलांच्या भेटीला पाठविलें.  एकच घाव आणि ती मेली ! किंकाळीं फोडण्यासहि तिला वेळ नव्हता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय