याप्रमाणे अनित्यताभावनेच्यायोगे दुःखता आणि अनात्मता स्पष्ट दिसून आल्यावर योग्याच्या चित्तांत अप्रतिम आनंद उत्पन्न होतो. त्याचे वर्णन धम्मपदांत येणेप्रमाणे केले आहे ः-

सुभागारं पविट्ठस्स सन्तचित्तस्स भिक्खुनो ।
अमानुसी रती होति सम्मा धम्मं विपस्सतो ॥
यतो यतो सम्मसति खन्धानं उदयब्बयं ।
लभती पीतिपामोज्जं अमतं तं विजानतं ॥


एकान्तस्थळी जाऊन शांत चित्ताने यथार्थतया पदार्थाचे निरीक्षण करणार्‍या भिक्षूला अमानुष (दैवी) आनंद प्राप्‍त होतो.  जो जो तो स्कन्धांचा उदय आणि व्यय यांचे निरीक्षण करतो तो तो त्याला प्रीतिप्रमोद मिळत जातो. सुज्ञांना हे अमृत वाटते.

एखादा उत्तम वादक तंतुवाद्य वाजवू लागला व त्यातून त्याच्या कलेला अनुसरून बारीक मोठे स्वर निघू लागले म्हणजे आपण क्षणभर तल्लीन होऊन जात असतो; आपणाला उपचारसमाधि प्राप्‍त होते, तर मग पदार्थमात्राला हालवणारी जी अनित्यता तिच्याशी तादात्म्य पावल्याने योग्याला अत्युच्च प्रकारची अमृततुल्य समाधि प्राप्‍त झाली तर त्यात नवल कसले ?  अर्थात् या विपश्यनाभावनेने योग्याला चारहि ध्याने प्राप्‍त होतात, एवढेच नव्हे तर आर्य अष्टांगिक मार्गाचे त्याला सजासहजी ज्ञान होते.  आर्य अष्टांगिक मार्ग, सम्यक् दृष्टि, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्त (कर्म), सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति आणि सम्यक् समाधि, या आठ अंगांचा बनला आहे.  त्याची व्याख्या मी एक दोन ठिकाणी१ केली असल्यामुळे तिची येथे पुनरुक्ति करीत नाही.  गायनवादनात ज्याप्रमाणे तालसुराची समता असावी लागते त्याप्रमाणे परिवर्तनशील जगात आर्य अष्टांगिक मार्गाच्यायोगेच साम्य२ ठेवणे शक्य आहे; आणि ज्याला अनित्यतेचे रहस्य समजले त्याला हे काम अगदी सोपे आहे.  अनित्यतेच्यायोगे वर्तमान जगताशी आपण तादात्म्य पावतो, एवढेच नव्हे तर अतीत आणि अनागत जगताशी तादात्म्य पावण्याला समर्थ होतो, व मनुष्यजातीच्या श्रेष्ठ सेवेचे वैयक्तिक कर्तव्य आपणाला पूर्णपणे अवगत होते; व त्या ज्ञानाचा विकास अष्टांगिक मार्गाच्या रूपाने होत असतो.  हा मार्ग त्या ज्ञानाचे दृश्य फळ होय.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  'बुद्ध धर्म आणि संघ' परिशिष्ट ३ रे, व बुद्धचरित्र-लेखमालेतील चवथा लेख पहावा.
**  अन्तं दुक्खस्स पप्पुय्य चरन्ति विसमे समं । (देवतासंयुत्त)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to समाधिमार्ग