विज्ञानानंत्य आयतनाचे विधान येणेप्रमाणे :- सब्बसो आकासानञ्चयतनं समतिक्कम्म अनन्तं विञ्ञाणं ति विञ्ञाणञ्चायतनं उपसंपज्ज विहरति ।

सर्व प्रकारे आकाशानन्त्य आयतनाचा समतिक्रम करून अनन्त विज्ञान या भावनेने विज्ञानानन्त्य आयतन प्राप्‍त करून घेतो.

आकाशाची कल्पनाहि विज्ञानमयच आहे, आकाशाची जी अनंत मर्यादा तीच विज्ञानाची आहे, अशा भावनेने आकाशाचा विचार सोडून देऊन विज्ञानात तल्लीन झाल्यावर योग्याला या आयतनाचा लाभ होतो. एवढाच काय तो फारक.  बाकी सर्व वरीलप्रमाणे समजावे.

आकिंचन्य आयतनाचे विधान :-  सब्बसो विञ्ञणज्चायतनं समतिक्कम नत्थि किञ्ची ति आकिच्चञ्ञायतनं अपसंपज्ज विहरति ।  सर्व प्रकारे विज्ञानानंत्य आयतनाचा समतिक्रम करून काही नाही या भावनेने आकिंचन्य आयतन प्राप्‍त करून घेतो.

अभाव विज्ञानापेक्षाहि बलवान आहे.  जेथपर्यंत विज्ञानाची गति तेथपर्यंत अभावाचीहि असावयाचीच, असा अभाव सर्व विश्वास भरला आहे, या कल्पनेने योगी जेव्हा विज्ञानावर जय मिळवतो, तेव्हा त्याला या आयतनाचा लाभ होतो. 

नैवसंज्ञानासंज्ञा आयतनाचे विधान येणेप्रमाणे :-  सब्बसो आकिच्चञ्ञायतनं समतिक्कम्म नेवसञ्ञानासञ्ञायतनं उपसम्पज्ज विहरति ।

सर्व प्रकारे आकिचन्य आयतनाचा समतिक्रम करून नैवसंज्ञानासंज्ञा आयतन प्राप्‍त करून घेतो.

अभावाची जरी बळकट कल्पना किंवा संज्ञा असतेच.  परन्तु त्याच्यावरची पायरी म्हणजे संज्ञा नाही किंवा असंज्ञाहि नाही, अशा तर्‍हेचे हे आयतन होय. संज्ञा आहे असेहि नाही आणि नाही असेही नाही, हे कसे होऊ शकते ?  याबद्दल विशुद्धिमार्गात दोन उपमा दिल्या आहेत.

शिष्याने लोहपात्राला तेल लावून ठेवले होते.  यवागू (पेज) पिण्याच्या वेळी गुरूने ते मागितले तेव्हा शिष्य म्हणाला, ''भदंत, पात्रांत तेल आहे.''  गुरु म्हणाला, 'तर मग घेऊन ये.  आपण ते नळकांड्यात भरू.'  शिष्य म्हणाला, तसे करण्याला तेल नाही.''  ज्याप्रमाणे यवागू मलिन करण्यापुरते तेल आहे, पण नळकांडे भरण्यापुरते नाही, त्याप्रमाणे या चवथ्या आयतनात संज्ञावशेष शिल्लक रहातो; परंतु तो संज्ञेचा कार्यभाग करू शकत नाही.

दुसरी उपमा पाण्याची आहे. गुरु आणि शिष्य रस्त्यांतून चालले होते. वाटेत थोडेसे पाणी होते.  शिष्य म्हणाला, ''गुरुजी पाणी आहे, वहाणा काढा.''  गुरु म्हणाला, ''तर मग स्नानाचा पंचा दे, मी स्नान करतो.''  शिष्य म्हणाला, ''स्नानाला पाणी नाही.''  जसे वहाणा भिजण्यापुरते पाणी आहे, पण स्नानाला नाही, तसा या चवथ्या आयतनांत संज्ञेचा अंश आहे, परंतु तो संज्ञेचे कार्य करण्यापुरता नाही.

हे आयतन प्राप्‍त झाल्यावर योग्याला निरोधसमापत्ति मिळवता येते.  निरोधसमापत्ति म्हणजे मनोवृत्तीचा आत्यंतिक निरोध. अशा स्थितीत योगी सात दिवसापर्यंत राहू शकतो.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to समाधिमार्ग