८.  अज्झत्तं अरूपसञ्ञी एको बहिद्धा रुपाणि पस्सति ओदातानि ओदातवण्णानि ओदातनिदस्सनानि ओदातनिभासानि-सेय्यथा पि नाम ओ सधितारका ओदाता ओदातवण्णा ओदातनिदस्सना ओदातनिभासा-सेय्यथा वा पन तं वत्थं बाराणसेय्यकं उभतोभाविमट्ठं ओदातं ओदातवण्णं ओदातनिवस्सनं ओदातनिभासं-एकमेव अज्झतं अरूपसञ्ञी एको बहिद्धा रूपानि पस्सति ओदातानि ओदातवण्णानि ओदातनिदस्सनानि ओदातनिभासानि, तानि अभिभुय्य जानामि पस्सामीति एवसञ्ञी होति, इदं अट्ठमं अभिभायतनं ।  आभ्यंतरी रूपाचा विचार न करता एखादा मनुष्य बाह्यसृष्टीतील शुभ्रवर्ण रूपे पहातो- उदाहरणार्थ ओषधितारका१ किंवा दोन्ही बाजूला इस्तरी केलेले वाराणसीचे पांढरे वस्त्र-याप्रमाणे आभ्यंतरी रूपाचा विचार न करता एखादा मनुष्य बाह्यसृष्टीतील शुभ्रवर्ण (सुंदर) रूपे पहातो. आणि त्याचे अभिभवन करून मी जाणतो आणि पहातो अशा बुद्धीने वागतो.  हे आठवे अभिभ्वायतन होय.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१  या तारकेचा उल्लेख सुत्तपिटकांत बर्‍याच ठिकाणी आला आहे. परंतु अट्ठकथाकाराने त्याचा स्पष्ट अर्थ केलेला नाही.  खालील वर्णनावरून हा शुक्राचा तारा असावा असे वाटते ः-  सेय्यथा पि नाम सरदसमये विद्धे विगतवलाहके देवे रत्तिया पच्चूससमये ओसधितारका भासते च तपते च विरोचति च ।  (देवपुत्तसंयुत्त)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बौद्ध धर्माची स्थापना झाल्यानंतर बर्‍याच वर्षापर्यंत भिक्षूला रहाण्यास विहार नसत.  ते कोठे तरी एखाद्या उपवनात किंवा जंगलांत पर्णकुटिकेत रहात असत.  अनाथपिण्डिकाच्या आरामासारखे जे थोडे बहुत विहार बुद्धाच्या हयातीत अस्तित्वात आले होते, त्यातहि भिक्षु चातुर्मास्याचे तेवढे चार महिने रहात असत; बाकी आठ महिने इतस्ततः संचार करून धर्मोपदेश करीत असत.  अशा वेळी विशुद्धिमार्गात सांगितलेली कृत्रिम कसिणे करण्याची पद्धति अस्तित्वात येणे शक्य नव्हते.  बौद्धांचे प्राचीन विहार खोदताना काही वर्तुळाकार पाषाणाची कसिणे सापडली आहेत.  त्यावरून असे दिसून येते की, कृत्रिम कसिणे करण्याची पद्धती अशोककालानंतर प्रचारात आली.  त्यापूर्वी वरील अभिभ्वायतनांचीच भावना भिक्षु करीत असावे.  त्याचे विधानहि वरील उतार्‍यातच आले आहे.

एखादा भिक्षु एकांत स्थळी बसला आणि 'मी रूपी आहे म्हणजे चतुर्भूतांचा बनलेलो आहे आणि बाह्यसृष्टीत दिसणारे ते रूप तेहि चतुर्भूतात्मक आहे, असा विचार करून थोड्याशा परिमित बाह्य देखाव्यावर ध्यान करून तन्मय होऊ शकला व त्यावर ताबा मिळवू शकला, तर त्याला पहिले अभिभ्वायतन साध्य झाले, असे म्हटले पाहिजे.  या भिक्षूला विविक्षित रूप पाहिजे असे नाही.  एखादी गवताची गंजी, एखादे चित्रविचित्र फुलांनी आणि पानांनी भरलेले झाड, कमलांनी भरलेला हौद, किंवा असाच काहीतरी मर्यादित देखावा त्याच्यासमोर असला म्हणजे पुरे आहे.  परंतु दुसरे अभिभ्वायतन साध्य करणार्‍याला असा मर्यादित देखावा कामाचा नाही.  विस्तीर्ण वनराजि, अफाट समुद्र, अमर्याद पर्वतांच्या रांगा, भव्य आकाश, असा काही तरी मोठा अपरिमित देखावा त्याच्यासमोर असावयास पाहिजे.  पहिल्या आणि तिसर्‍या आयतनात फरक एवढाच की पहिल्याला आपण रूपी आहे ही जाणीव असते, व तिसरा केवळ बाह्यसृष्टीत तन्मय होऊन जातो.  हीच गोष्ट बाकीच्या सर्वांना लागू आहे.  शेवटली चार अभिभ्वायतने आणि या नावाची चार कसिणे एकच आहेत.  परंतु कसिणांचे जे कृत्रिम विधान सांगण्यात आले आहे, ते त्यांच्यात नाही.  निळ्या, पिवळ्या, तांबड्या किंवा पांढर्‍या फुलांचा विस्तीर्ण मळा पाहून किंवा अशाच तर्‍हेचे दुसरे रम्य देखावे पाहून त्याजवर ध्यान करून ही अभिभ्वायतने साध्य करता येतात.  अशा देखाव्यांवर कसिणेहि साध्य होतात, असे अट्ठकथाकारांनी म्हटले आहे.  तरी पण बुद्धघोषाचार्याच्या वेळी कृत्रिम कसिणे तयार करण्यांकडेच विशेष लक्ष होते असे दिसते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to समाधिमार्ग