अनुराधपुराजवळ कोरण्डक नावाचा गाव होता.  त्या गावाच्या शेजारी असलेल्या विहारालाहि कोरण्डकविहार म्हणत असत.  तेथे जो स्थविर भिक्षु रहात असे त्याच्या भाच्याने त्याजपाशी प्रव्रज्या घेतली, व तो पाच वर्षेपर्यंत अध्ययन करून पुढे अभ्यास करण्यासाठी दक्षिणभागात (याला रोहणप्रदेश म्हणत) गेला व तेथे काही वर्षे राहिला.  त्याची आईबापे कोरण्डक गावात रहात असत.  आई आपल्या भावाला (विहारातील स्थविर भिक्षूला) वारंवार त्याची प्रवृत्ती विचारीत असे.  काही वर्षानंतर पावसाळ्यापूर्वी भाचा काय करतो हे जाणण्यासाठी स्थविर रोहणप्रदेशाला जाण्यास निघाला.  इकडे तरुण भिक्षूहि आचार्याला भेटण्याच्या उद्देशाने रोहणप्रदेशातून कोरण्डकग्रामाला जाण्यास निघाला होता.  महागंगेच्या* काठी त्या दोघांची गाठ पडली.  तेथे एका झाडाखाली तरुण भिक्षूने स्थविराचे आदरातिथ्य केले.  तेव्हा स्थविर त्याला म्हणाला, 'तुझी आई वारंवार आठवण करीत असते.  तेवढ्याचसाठी मी रोहणास जाण्यास निघालो हातो.  पण आता ज्याअर्थी मि निघालो त्याअर्थी हा वर्षकाल रोहणप्रदेशातच घालवीन; व तू कोरण्डकविहारात जाऊन रहा.'  त्याप्रमाणे तरुण भिक्षु कोरण्डकविहारात आला.  बरीच वर्षे इतर ठिकाणी राहिल्यामुळे त्याला कोणी ओळखले नाही.  त्याच्या बापाने तयार केलेल्या खोलीतच त्याला जागा देण्यात आली.  दुसरा दिवस म्हणजे चातुर्मास्याचा पहिला दिवस होता.  त्या दिवशी त्याच्या बापाने विहारात येऊन आपल्या जागी कोण राहतो याची चौकशी केली.  आणि कोणी एक आगंतुक तरुण भिक्षु रहात आहे असे समजल्यावर त्याजपाशी येऊन तो त्याला म्हणाला, भदन्त माझ्या जागेत चातुर्मास्यासाठी जो भिक्षु राहतो त्याला एक कर्तव्य आहे.'  ते कोणते ?  असा प्रश्न केल्यावर तो म्हणाला, त्याने चातुर्मास्यांत रोज माझ्याच घरी भिक्षा घेतली पाहिजे; व चातुर्मास्य संपल्यावर जाण्याच्यापूर्वी आम्हाला कळवले पाहिजे.  तरुण भिक्षु मुकाट्याने राहिला म्हणजे त्या गृहस्थाची विनंती त्याने मान्य केली.  चातुर्मास्य आईबापांच्या घरी भिक्षा ग्रहण करून तेथून जाण्यापूर्वी त्याने आपला बेत त्यांना कळवला.  दुसर्‍या दिवशी त्याला आमंत्रण करून आईबापांनी चांगले जेवण दिले; व वाटेत उपयोगासाठी एक गुळाचा तुकडा आणि चीवर बनविण्यासाठी नव हात लांबीचे एक वस्त्र देऊन त्याची रवानगी केली.  कोरण्डक गावातून निघून तो रोहणप्रदेशाकडे वळला.  वर्षाकाल संपल्यावर त्याचा मामाही कोरण्डकगावाला जाण्यास निघाला होता, त्या दोघांची पूर्वीच्याच ठिकाणी गाठ पडली.  तरुण भिक्षूने स्थविराचे स्वागत करून गूळाचे पानक करून दिले; व ते वस्त्रहि त्यालाच देऊन टाकले.  तो म्हणाला 'मी माझ्या आप्ताला पाहून आलो.  मला कोरण्डकगावापेक्षा रोहणप्रदेशच अधिक आवडतो, तेव्हा मी तिकडेच जातो.'
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  सिंहलद्वीपात नदीला गंगाच म्हणतात, व त्यांपैकी सर्वांत मोठ्या नदीला महागंगा किंवा नुसती गंगा असे म्हणतात.  ही नदी क्याडी शहरावरून वहात जाऊन पूर्वसमुद्राला मिळते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इकडे आपला भाऊ मुलाला घेऊन येईल अशा विचाराने त्याची आई सारखी मार्गप्रतीक्षा करीत होती.  स्थविर कोरण्डकविहारात पोचल्यावर दुसर्‍या दिवशी भिक्षेसाठी गावात गेला.  त्याला एकट्यालाच पाहून, आपला मुलगा निवर्तला असावा, अशा समजुतीने ती बाई कंठ मोकळा करून रडू लागली.  तेव्हा स्थविर म्हणाला, 'तू रडतोस का !'  ती म्हणाली, माझ्या मुलाला आणण्यासाठी तुम्ही गेला होता. पण त्याला न आणता एकाकीच आलात यावरून त्याचे काय झाले हे समजत नाही.  स्थविर म्हणाला, 'अग, तुझा मुलगा तीन महिने येथेच होता; व रोज तुझ्याच घरी भिक्षेला येत होता.  असे असता त्याने जर तुला आई म्हटले नाही तर ते केवळ निःस्पृहतेमुळे असले पाहिजे.  थोड्या विचाराअंती तोच आपला मुलगा होता हे त्या बाईला समजले, सानंदाश्चर्याने ती उद्‍गारली, आज जर बुद्ध भगवान हयात असता, तर त्याने निःस्पृहतेच्या कमालीबद्दल माझ्या मुलाचे खात्रीने अभिनंदन केले असते !'
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to समाधिमार्ग