ब्राह्मणकुमारानें पुष्कळ खटपट केली, परंतु बिचार्‍याला एक अक्षर देखील आठवेना. पण राजाला ही गोष्ट कळूं न देतां तो म्हणाला, ''महाराज, आज नक्षत्रयोग नीट जुळत नाहीं व त्यामुळें आंबे तयार करिता येत नाहींत. पुनः योग्य मुहूर्त सांपडल्याबरोबर मी आंबे तयार करून आपणास अर्पण करीन.''

राजानें यांत कांहीं लबाडी आहे हें तेव्हांच ताडलें आणि तो म्हणाला, ''हे तरूण ब्राह्मणा, यापूर्वी पुष्कळ वेळां तूं आंबे तयार केलेस पण नक्षत्राची सबब कधींही पुढें केली नाहींस. तेव्हां आज यांत कांहींतरी लबाडी आहे हें स्पष्ट दिसत आहे.''

राजाला ठकविणें शक्य नाहीं असें जाणून ब्राह्मणकुमार म्हणाला, ''महाराज, माझा मंत्रगुरू चांडाल असतां अभिमानाला वश होऊन मी सर्वलोकांसमक्ष खोटें बोललों व त्यामुळें माझा मंत्र अंतर्धान पावला.''

राजा म्हणाला, ''एरंड, निंब वगैरे झाडांपासून जर कोणाला मध मिळाला तर त्यानें त्याच वृक्षाला श्रेष्ठत्व दिलें पाहिजे. त्याचप्रमाणें कोणत्याहि जातीच्या मनुष्यापासून जर आपण विद्या शिकलों तर त्याला गुरू म्हणण्यास लाजतां कामा नये.'' असें बोलून राजा आपल्या नोकराकडे वळून म्हणाला, ''या नीच माणसाला धक्के मारून बाहेर हाकून द्या. उत्तमार्थाचा लाभ झाला असतां यानें गर्वानें फुगून जाऊन आणि खोटें बोलून तो आपल्या हातचा गमावला आहे. तेव्हां याला येथून घालवून देणें हेंच योग्य आहे.''

याप्रमाणें राजाकडून अर्धचंद्र मिळाल्यावर तो तरूण शोकानें अत्यंत संतप्‍त होऊन इतस्ततः भटकत फिरूं लागला. शेवटीं पुनरपि आपल्या चांडाळ गुरूला शरण जाऊन पुनः मंत्रप्राप्ति होत असल्यास पहावी अशा बेतानें तो गुरू रहात असलेल्या चांडाळग्रामाला आला.

त्याला पाहिल्याबरोबर बोधिसत्त्व आपल्या भार्येला म्हणाला, ''अग पाहिलेंस काय, हा तरूण मनुष्य मंत्रभ्रष्ट होऊन पुनः परत येत आहे.'' कुमारानें आचार्याला पाहिल्याबरोबर साष्टांग प्रणिपात केला. व कुशलादिक प्रश्न विचारण्यांत येऊन आचार्यानें एकाएकीं येण्याचे कारण काय असें विचारल्यावर तो म्हणाला, ''समान भूमिभाग असें समजून कड्यावरून खालीं उडी टाकावी किंवा दोरीचा भास होऊन काळसर्पाच्या शेंपटीवर पाय द्यावा किंवा अंधानें जळती ज्योत कवटाळावी तद्वत् मी आपल्या आज्ञेचें उल्लंघन करून भयंकर अपराध केला आहे. तथापि या सर्व पापांची क्षमा करून आपल्या पदरी घ्यावें अशी माझी विनवणी आहे. केवळ अभिमानानें खोटें बोलल्यामुळें माझ्या मंत्राचा नाश झाला आहे व तो पुनः प्राप्‍त करून देणें हें आपल्यावाचून दुसर्‍या कोणालाहि शक्य नाहीं. वाराणसींतील नागरिकांसमोर आणि राजासमोर मी आपलें प्रत्याख्यान केलें याची मला क्षमा करा.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''धर्माला अनुसरून तुला मी मंत्र शिकविला. तूंहि धार्मिक बुद्धीनेंच त्याचें ग्रहण केलेंस. परंतु ज्या अर्थी सर्व राज्यसभेंत खोटें बोलून आणि गुरूचें प्रत्याख्यान करून तूं आपला अमोलिक मंत्र गमाविलास त्याअर्थी सद्धर्माला तूं मुकलास व अधार्मिक बनल्यामुळें पुनः मंत्रग्रहण करण्याला तूं अपात्र झाला आहेस. अशा तुला मंत्राचा उपदेश केला असतां मीहि निंद्य ठरेन म्हणून मजपासून कांहींएक अपेक्षा न करिता तूं येथून चालता हो.''

गुरूच्या या भाषणानें अत्यंत निराश होऊन तो ब्राह्मणकुमार मोठ्या अरण्यांत शिरला व तेथें अन्नपाणी वर्ज्य करून त्यानें देहत्याग केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to जातक कथासंग्रह


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
गावांतल्या गजाली
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
अजरामर कथा
भारताची महान'राज'रत्ने
जगातील अद्भूत रहस्ये
रत्नमहाल
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय