घृतपंडित म्हणाला, ''पृथ्वीवर वास करणार्‍या किंवा कृत्रिम सशाची मी मुळींच अपेक्षा करीत नाहीं. परंतु चंद्रावर दिसत असलेल्या सशासाठीं मी ओरडत आहें. तो ससा आणवून दिला तरच माझा उन्माद नाहींसा होईल.''

वासुदेवाला भावाच्या वेडाबद्दल शंका राहिली नाहीं. तो मोठ्या दुःखित अंतःकरणानें म्हणाला, ''जो अप्राप्य वस्तूची प्रार्थना करितो त्याचा नाश होतो. तूं चंद्रावरील ससा मागतां मागतांच मरून जाशील आणि जीव दिला तरी तो तुला मिळणार नाहीं.''

घृतपंडित म्हणाला, ''दादा, हें तत्त्व जर तूं जाणत आहेस तर मेलेल्या पुत्राबद्दल इतका शोक घेऊन कां बसला आहेस ? चंद्रावरील ससा निदान दिसतो आहे तरी तूं त्याला अप्राप्य म्हणतोस ? तर मग तुझ्या मुलाच्या शरीराचें दहन केल्यावर त्याचा आत्मा कोणीकडे गेला याचा तुला पत्ता देखील लागत नाहीं. औषधांनीं, मंत्रांनीं किंवा अन्य उपायांनीं त्याला परत आणतां येत नाहीं. अशा त्या प्राण्याबद्दल शोक करणें अत्यंत वेडेपणा नव्हे काय ?

घृतपंडिताच्या या उपदेशानें वासुदेव ताळ्यावर आला आणि पुत्रशोक सोडून देऊन तो पूर्ववत् सर्व राज्यकारभार पाहूं लागला.

त्या काळीं मनुष्याचें आयुष्य २०,००० वर्षे होतें. वासुदेवानें आणि त्याच्या बंधूंनीं पुष्कळ वर्षे जंबुद्वीपाचें राज्य केलें. त्यांना पुत्रपौत्र पुष्कळ झाले. त्यांच्या संततीपैकीं कांहीं तरुणांना कृष्णद्वैपायन ॠषीच्या दिव्य-ज्ञानाबद्दल शंका आली. तो खरोखरच दिव्यदृष्टी आहे किंवा नाहीं हें पाहण्यासाठीं एका तरूण मनुष्याच्या पोटाला उशी बांधून त्याला गरोदर स्त्रीचा वेष देऊन कृष्णद्वैपायनाजवळ नेलें आणि ते म्हणाले, ''गुरुमहाराज, या स्त्रीला मुलगा होणार कीं मुलगी होणार हें सांगा.''



कृष्णद्वैपायनानें वासुदेवादिक दशबंधूंचा वंश नष्ट होण्याची वेळ आली आहे व आपलेंहि आयुष्य संपलें आहे असें जाणून उत्तर दिलें कीं, 'ही गोष्ट तुम्ही मला विचारू नका.' परंतु राजकुमारांनीं फारच आग्रह केल्यावर तो म्हणाला, ''याच्या उदरांतून सात दिवसांनीं खदिराचें पात्र निघेल आणि त्यापासून वासुदेवकुळाचा क्षय होईल. तथापि तुम्ही हें खदिरपात्र जाळून त्याची राख नदींत फेकून द्या.''

राजकुमारांला ॠषीच्या बोलण्याचा फार राग आला. ते म्हणाले, ''दांभिक जटिला, पुरुष कधीं प्रसूत होत असतो काय ?'' नंतर त्यांनीं कृष्णद्वैपायनाला जवळच्या वृक्षावर फांशीं दिलें.

हें वर्तमान त्यांच्या वडिलांना समजल्याबरोबर ते अत्यंत भयभीत झाले आणि द्वैपायनानें सांगितल्याप्रमाणें सातव्या दिवशीं त्या तरुण मनुष्याच्या उदरांतून निघालेल्या खदिरपात्राची त्यांनी व्यवस्था केली. परंतु नदींत टाकलेल्या त्या खदिरपात्राच्या रक्षेपासून नदीच्या तोंडावर एरक नावाचें गवत उगवलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to जातक कथासंग्रह


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
गावांतल्या गजाली
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
अजरामर कथा
भारताची महान'राज'रत्ने
जगातील अद्भूत रहस्ये
रत्नमहाल
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय