राजाज्ञेप्रमाणें सर्व व्यवस्था होऊन कुमाराला राज्यभिषेक करण्यांत आला. सत्ता प्राप्‍त होऊन कांही दिवस लोटले नाहींत तोंच तरुण राजाला आपल्या गुरूची आठवण झाली. जणूं काय काठीच्या प्रहारानें त्याची पाठ दुखूं लागली. तेव्हां आचार्याला बोलावण्यासाठीं त्यानें दूत पाठविले आणि त्यांना असें सांगितलें कीं, ''माझ्या आचार्याला मी आपल्या दर्शनाला अत्यंत उत्कंठित झालों आहे असें सांगा. नुकताच मला राज्यपदाचा लाभ झाला आहे. अशा प्रसंगीं येथें येऊन मला सन्मार्गाचा उपदेश करणें, हें आपलें कर्तव्य आहे.''

त्याप्रमाणें दूतांनीं आचार्याला निरोप कळविल्यावर तरुण वयांत राजाला उपदेश करणें आपलें कर्तव्य आहे असें जाणून कांहीं दिवसांसाठीं आचार्य वाराणसीला आला. तेथें पोहोंचल्यावर राजद्वारी जाऊन तक्षशिलेहून अमुक आचार्य आला आहे असा त्यानें राजाला निरोप पाठविला, राजानें त्याला सभेंत बोलावून नेलें. परंतु त्याला बसावयास आसन न देतां अत्यंत संतप्‍त होऊन राजा आपल्या अमात्यांना म्हणाला, ''भो, या आचार्यानें केलेल्या प्रहारांनीं माझी पाठ जणूं काय अद्यापि ठाणकत आहे ! हा आपल्या कपाळावर मृत्यु घेऊनच आला असावा ! आतां याला जिवंत जाऊं देऊं नका !''

तें तरुण राजाचें भाषण ऐकून आचार्य निर्भयपणें म्हणाला, ''चांगलें वळण लावण्यासाठीं जे दंड करितात त्यांचा थोर पुरुष राग मानीत नाहींत. कां कीं, हा दंड दुष्टपणानें केला जात नाहीं. आतां तूं राज्यावर बसून पुष्कळ लोकांना यथान्याय दंड करितोस. तो केवळ सूड उगविण्याच्या बुद्धीनें करीत नाहींस. आणि एवढ्यासाठीं जर तुझी प्रजा तुझ्यावर रागावली तर त्यांना लोक मूर्ख म्हणतील. प्रजेच्या कल्याणासाठीं तूं दंड करीत आहेस. प्रजेंत तंटे बखेडे उपस्थित होऊं नयेत, व सुव्यवस्था रहावी म्हणून तूं दंडाचें अवलंबन करितोस तो न्याय मला लावून पहा. मीं जर माझ्या शिष्यांना योग्य वळण लावण्यासाठीं दंडाचा प्रयोग केला, तर मला कोण दोष लावील ! माझ्या फायद्यासाठीं मी तुझ्यावर प्रहार केला नसून तो तुझ्याच फायद्यासाठीं केला होता. समज, मी त्यावेळीं तुला दंड न करितां हंसलों असतों, आणि परस्पर त्या बाईचें समाधान केलें असतें, तर तुझ्या खोडी वाढत गेल्या असत्या; हळूं हळूं तूं लोकांची भांडीकुंडीं चोरलीं असतीस आणि त्यामुळें राजपुरुषांच्या हातीं लागून तुला त्यांनी दंड केला असता; अशा कृत्यांनीं निर्लज्ज बनून तूं मोठा बंडखोर झाला असतास, आणि जर हें तुझें वर्तन तुझ्या पित्याच्या कानीं आलें असतें तर त्यानें तुला कधींहि राज्य दिलें नसतें. म्हणून मी तुझ्या लोभाला मुळांतच खोडून टाकिलें हें योग्य केलें असें समज, आणि माझ्याविषयी विनाकारण वैरभाव बाळगूं नकोस. राज्यपदावर बसलेल्या माणसानें सूड उगविण्याची बुद्धि न बाळगतां योग्यायोग्यतेचा निस्पृहपणें विचार केला पाहिजे.''

हें आचार्याचें भाषण ऐकून तरुण राजा अत्यंत लज्जित झाला. अमात्यहि म्हणाले, ''महाराज, आचार्यानें योग्यवेळीं आपणांस दंड केल्यामुळें या वैभवाचें आपण भागी झालां ही गोष्ट खरी आहे. आचार्यानें योग्य कर्म केलें असेंच आम्हांस वाटतें.''

तेव्हां सिंहासनावरून उठून गुरूचे पाय धरून राजा म्हणाला, ''महाराज, आपणाला हें सर्व राज्यवैभव मी दान देत आहें. याचें ग्रहण करा.''

आचार्य म्हणाला, ''मजसारख्या विद्याव्यासंगी ब्राह्मणाला राज्य घेऊन काय करावयाचें आहे ? तूं तरुण आहेस, आणि विद्याविनयानें संपन्न आहेस तेव्हां तूंच हें राज्य कर.''

राजा म्हणाला, ''गुरुजी आतां एवढी तरी माझी विनंति मान्य करा. आपण वृद्ध झाला आहां. अध्यापनाचा भार आपणाला सहन होत नाहीं. तेव्हां सहकुटुंब येथें येऊन विश्रांति घेत बसा, व फावल्या वेळांत राज्यकारभारांत मला सल्ला द्या.''

आचार्यानें ही गोष्ट मान्य केली. राजानें त्याचें कुटुंब तक्षशिलेहून वाराणसीला आणविलें; आणि त्याला आपला पुरोहित करून त्याच्या उपदेशाप्रमाणें राज्यकारभार चालविला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to जातक कथासंग्रह


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
गावांतल्या गजाली
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
अजरामर कथा
भारताची महान'राज'रत्ने
जगातील अद्भूत रहस्ये
रत्नमहाल
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय