चोरांनीं त्याच्या सांगण्याप्रमाणें केल्यावर ब्राह्मणानें मंत्रजप करून आकाशाकडे पाहिलें. तत्क्षणीं आकाशांतून सुवर्णरजतादिकांचा पाऊस पडला ! चोरांनीं तें द्रव्य गोळा करून आपल्या उपरण्यांनीं गांठोडी बांधिलीं व तेथून प्रयाण केलें. ब्राह्मणाला त्यांनी तेथेंच सोडून दिलें.

त्या चोरांला वाटेंत दुसर्‍या पांचशें चोरांनी गांठलें, व त्यांची मोठमोठाली गांठोडीं पाहून ते त्यांना म्हणालें, ''हें द्रव्य तुम्ही कसें मिळविलें ? याचा जर आम्हास वांटा द्याल तरच तुम्हास आम्हीं सोडून देऊं; नाहीं तर सर्वांना येथें ठार करूं.''

द्रव्याचीं गांठोडीं वहाणारे चोर म्हणाले, ''बाबांनो, आमच्याशीं लढाई करून आमच्या नाशाला कां प्रवृत्त होतां ? हा आमच्या मागोमाग येणारा ब्राह्मण केवळ आकाशाकडे पाहून द्रव्याचा पाऊस पाडूं शकतो ! त्यानेंच मंत्रसामर्थ्यानें हें धन आम्हास दिलें आहे.''

तेव्हां त्या रिकाम्या चोरांनीं धनवान चोरांना सोडून देऊन त्यांच्या मागोमाग जाणार्‍या ब्राह्मणास गांठलें, व ते त्याला म्हणाले ''हे ब्राह्मणश्रेष्ठा, मंत्रसामर्थ्याच्या योगानें तूं धनाची वृष्टि करूं शकतोस असें आमच्या व्यवसाय बंधूंनीं आम्हाला सांगितलें आहे. तेव्हां आतां मंत्राचा तप करून द्रव्याचा पाऊस पडेल असें कर.''

ब्राह्मण म्हणाला, ''चोरहो, मी तुम्हाला मोठ्या खुषीनें द्रव्य दिलें असतें; परंतु या वर्षी नक्षत्राचा योग जुळून येण्याचा संभव दिसत नाहीं. पुढल्या वर्षी जर तुम्हीं मला भेटाल, तर नक्षत्राचा योग पाहून मीं तुमच्यावर सुवर्णादिकांचा पाऊस पाडीन.''

हे ब्राह्मणाचे शब्द ऐकून चोर अत्यंत संतापले, व त्यांनीं तेथेंच त्या ब्राह्मणाचा वध केला. पुढें गेलेल्या चोरांजवळ अवजड गांठोडी असल्यामुळें ते त्वरेनें जाऊं शकले नाहींत. त्या रिकाम्या चोरांनीं त्यांजवर एकाएकीं घाला घालून सर्वांना ठार मारलें, व सर्व धन हिरावून घेतलें. पुनः या पांचशें चोरांत दोन तट पडून कलहास सुरुवात झाली, व परस्परांत यादवी माजून दोन सोडून बाकी सर्व चोरांचा नाश झाला ! शिल्लक राहिलेल्या दोन चोरांनीं असा विचार केला कीं, हे धन घरीं घेऊन जाणें शक्य नाहीं. तेव्हां तें या अरण्यांतच कोठेंतरी लपवून ठेवावें. त्यांनीं ती सर्व गांठोडीं एका गुहेंत गोळा केलीं व एक नागवी तरवार घेऊन तेथें पहारा करण्यास उभा राहिला. दुसरा जेवण घेऊन येण्यासाठीं गांवांत गेला.

लोभ विनाशाचें मूळ होय. पहारा करणार्‍या चोरांच्या मनांत असा विचार आला कीं, ''हा दुसरा चोर परत आल्यावर मला या धनाचा अर्धा वांटा त्याला द्यावा लागेल त्यापेक्षां तो येथें येतांच जर मीं त्याला ठार केलें तर हें सर्व धन माझ्या एकट्याच्या मालकीचें होईल.'' गांवांत गेलेल्या चोरानें विचार केला कीं, ''त्या धनाचे दोन भाग होण्यापेक्षां तें सर्व आपणालाच मिळालें तर फार चांगलें'' परत येतांना त्यानें आपल्या साथीदारासाठीं आणलेल्या जेवणांत तीव्र विष घातलें. तो जवळ आल्याबरोबर पहारा करणार्‍या चोरानें त्याचीं दोन शकलें केलीं, व स्वतः तें विषमिश्रित अन्न खाऊन मरण पावला !

बोधिसत्त्व एक दोन दिवसांनीं तेथें आला व त्यानें आपल्या गुरूचें मार्गांत पडलेले प्रेत पाहिलें. पुढें वाटेंत चोरांची प्रेतें आढळलीं. तसाच सुगावा काढीत काढीत तो त्या गुहेच्या द्वाराशीं आला, व तेथें घडलेले प्रकार पाहून त्यानें चोरांची वाट कशी झाली याचें अनुमान केलें, आणि हे उद्‍गार काढले, ''आमच्या आचार्यांनीं आपल्या सामर्थ्याचा अकाली उपयोग केल्यामुळें ही अनर्थपरंपरा ओढली ! भलत्याच वेळीं सामर्थ्याचा उपयोग करूं नये हा धडा या गोष्टीपासून शिकला पाहिजे.''

बोधिसत्त्वानें ते धन आपल्या घरीं नेलें, व दानधर्म करून सदाचरणानें आयुष्याचा सदुपयोग केला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to जातक कथासंग्रह


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
गावांतल्या गजाली
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
अजरामर कथा
भारताची महान'राज'रत्ने
जगातील अद्भूत रहस्ये
रत्नमहाल
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय