१०. प्राण्याचा वध करून श्राद्ध करणें इष्ट आहे काय !

(मतकभत्त जातक नं. १८)

वाराणशीमध्यें एकदां एक वेदशास्त्रसंपन्न प्रख्यात ब्राह्मण रहात होता. त्याच्याजवळ वेदाध्ययन करण्यासाठीं पुष्कळ शिष्य रहात असत. वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशीं आपण बाळगलेल्या एका मेंढ्याला आपल्या शिष्यांच्या स्वाधीन करून तो म्हणाला, ''मुलांनों, ह्या मेंढ्याला नदीवर नेऊन स्नान घालून पंचांगुलिक * देऊन सजवून आणा. आज याला मारून मी पितरांचें श्राद्ध करणार आहें.''
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* रक्तचंदनांत हात भिजवून पांची बोटें उमटतील अशा रीतीनें जनावरांच्या पाठीवर मारणें ह्याला ''पंचांगुलिक'' म्हणत असत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
शिष्यांनीं त्या मेंढ्याला नदीवर नेऊन स्नान वगैरे घालून तांबड्या फुलांच्या मालांनीं सजवून आणि पंचांगुलिक देऊन नदीच्या कांठीं उभें केलें. तेव्हां तो मोठ्यानें हंसला; व नंतर मोठ्यानें रडला. तें पाहून त्या तरुणांना फार आश्चर्य वाटलें. ते म्हणाले, तूं पहिल्यानें हंसलास व नंतर रडलास याचें कारण काय ?

मेंढा म्हणाला, ''हा प्रश्न तुम्हीं आचार्यासमोर विचारा; म्हणजे मी तुम्हांला याचें उत्तर देईन.''

शिष्यांनीं त्या मेंढ्याला आपल्या आचार्याजवळ नेऊन नदीवर घडलेली सर्व गोष्ट त्याला कळविली. तेव्हां तो त्या मेंढ्याला म्हणाला, ''तूं प्रथमतः हंसलास व रडलास याचें कारण काय ?''

मेंढा म्हणाला, ''भो ब्राह्मण, मी पांचशें जन्मापूर्वी तुझ्या सारखाच मोठा प्रख्यात ब्राह्मण होतों. त्या जन्मीं वडीलांच्या श्राद्धासाठीं मी एकदांच काय तो एक मेंढा मारला होता. त्या कर्मामुळें मला पांचशें खेपा मेंढ्याच्या कुळांत जन्म घेऊन शिरच्छेद करून घ्यावा लागला. पण माझी शेवटची पाळी असल्यामुळें मी आज या पशुयोनींतून मुक्त होणार आहे, अशा विचारानें मला हर्ष झाला, व त्यामुळें माझें हंसे मला आवरता आलें नाहीं. पण जेव्हां आपली आठवण झाली तेव्हां मला अत्यंत खेद झाला. आपण ह्या जन्मीचे माझे अन्नदाते आहां, पालनकर्ते आहां, पण ह्या कर्मामुळें आपणाला माझ्यासारिखे मेंढयांच्या कुळांत पांचशें जन्म घ्यावे लागतील, व त्या प्रत्येक जन्मांत शिरच्छेदाचें दुःख भोगावें लागेल, या विचारानें माझें अंतःकरण कळवळलें, आणि माझा शोक अनावर झाल्यामुळें मला रडूं आलें

ब्राह्मण म्हणाला, ''शहाण्या मेंढ्या, भिऊं नकोस. मी तुझ्यासारख्या प्राण्याला मारून पशुयोनीत जन्म घेऊं इच्छीत नाहीं. तुझ्या या कळकळीबद्दल मी फार आभारी आहे. आणि आज मी माझ्या शिष्यांसह तुझें रक्षण करीन.'' मेंढा म्हणाला, ''तू आणि तुझ्या शिष्यांनीं माझें कितीहि रक्षण केलें तरी मी आज मरणापासून मुक्त होणार नाहीं. कां कीं, माझें पापच असे बलवत्तर आहे की, शिरच्छेदाचें दुःख भोगल्यावांचून ब्रह्मदेवदेखील त्या पांपातून मला मुक्त करूं शकणार नाहीं !''

ब्राह्मणानें मेंढ्याच्या म्हणण्याकडे लक्ष्य न देतां आपल्या शिष्यांसह त्याच्या रक्षणाचा बंदोबस्त केला. मेंढा गांवाबाहेर एका खडकाच्या बाजूला वाढलेल्या झुडुपाचा पाला खाऊं लागला. इतक्यांत मोठा कडकडाट होऊन त्या शिळेवर वीज पडली. व तिचें एक शकल उडून त्यानें मेंढ्याची मान धडापासून निराळी केली ! तें आश्चर्य पहाण्यासाठीं पुष्कळ लोक तेथें जमले.

आमचा बोधिसत्त्व या वेळीं तेथें एका वृक्षावर वृक्षदेवता होऊन रहात होता. तो त्या जमलेल्या लोकांना म्हणाला, ''मनुष्यप्राणी इहलोकीं जन्म पावणें दुःखकारक आहे असें जर जाणते, तर त्यांनीं इतर प्राण्याचा वध केला नसता ! प्राणघातामुळें किती दुःख भोगावें लागतें हें ह्या मेंढ्याच्या उदाहरणानें स्पष्ट होत आहे !''

बोधिसत्त्वाचा उपदेश ऐकून ते लोक प्राणघातापासून विरत झाले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to जातक कथासंग्रह


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
गावांतल्या गजाली
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
खुनाची वेळ
अजरामर कथा
भारताची महान'राज'रत्ने
जगातील अद्भूत रहस्ये
रत्नमहाल
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय