आई मुलाला भरवते तेव्हा गायी, म्हशी, चिमण्या, कावळे, फुलेपाने सारे दाखवीत असते :

अंगणात गाय            दाखवीते माय
गोड घास खाय                तान्हेबाळ ॥
बघ रे चिमणी            करीते चींव चींव
म्हणते तुला जेव            तान्हेबाळा ॥

लहान मुलाबरोबर सारी सृष्टी बोलते, सारी सृष्टी खेळते. गांधीसेवासंघाचे थोर अध्यक्ष श्री.किशोरलालभाई मश्रूवाला यांनी “केळवणीना पाया” - शिक्षणाचा पाया म्हणून ग्रंथ लिहिला आहे. त्यांनी इसापनीती वगैरे गोष्टी सत्याच्या दृष्टीने अव्हेरिल्या आहेत. ते म्हणतात, “कुत्रा का बोलतो, घार का बोलते ?” होय. लहान मुलांजवळ चराचरा बोलते. इसापच्या गोष्टीचा यातच तर मोठेपणा आहे. माणूस मोठा झाला म्हणजे त्याला माणसाचीच भाषा फक्त थोडीफार समजते. त्याची दृष्टी मर्यादित होते. तसे मुलाचे नाही. सारे चैतन्य त्याच्याजवळ हसते बोलते :

माझ्या अंगणात        नाचते चिमणी
बाळाला खेळणी            देवाजीचीं ॥
माझ्या अंगणात        कावळा का का करी
बाळाला हांका मारी        खेळायला ॥

रवीन्द्रनाथांच्या ‘शिशु’ या काव्यात देवाने आकाशातील रंग, झाडावरची फुलेफळे हे सारे आपल्या या लेकरासाठी दिले आहे अशी कल्पना आहे. ते म्हणतात, “आई आपल्या मुलाला रंगीत खेळणी देते. ते पाहून आकाशात सुंदर रंग का हे आज मला समजले.” रवींद्रनाथांची ही कल्पना स्त्रियांनी या ओव्यांत ओतली आहे. माता म्हणते, “ही पाखरे म्हणजे देवाघरची बाळासाठी पाठविलेली खेळणी.”

परंतु लहान बाळ केवळ कावळे, चिमण्या, वासरे या निष्पाप प्राण्यांजवळ का खेळतो ? नाही. तो सापाजवळ सुध्दा खेळतो. विंचवाजवळ बसतो. लहान मुलाचा सर्वांवर विश्वास :

माझ्या अंगणात         पांचफणी नाग डोले
त्याच्या संगं खेळे            तान्हे बाळ ॥

माता येऊन पाहते तो पाच फणांच्या सापाजवळ हा बाळकृष्ण खेळत आहे. हजारो फणांचा नाग आला तरीही त्याच्याशी बाळ खेळेल.

अंगणात कावळयांची गर्दी व्हावी, का, का, का करीत असावेत. आई त्यांना म्हणते, “कावळयांनो, कशाला हाका मारता ? आज बाळाला बरे नाही हो.”

माझ्या अंगणात            कावळयांची गर्दी
बाळाला माझ्या सर्दी            सांगा त्यांना ॥

घरी मामा आलेला असतो. आई म्हणते, “मामा, भाच्याला खेळव, हिंडव. त्याला नाना फुले दाखव. पाखरे दाखव.”

असा हा खेळकर बाळ कधी खोडया करतो. त्याच्या हातून चूक होते. लोक नावे ठेवतात, म्हणून बाळ रडतो. आईचे हृदय गहिवरते :

टोचून बोलती            परके चटाचटा
बाळाच्या डोळयांना            पाणी येई पटापटा ॥
इवलासा गुन्हा            किती बाळाला बोलती
मेरू मोहरीचा करिती            लोक मेले ॥

तसेच मातीत वगैरे मळून जर बाळ आले तर सारे रागावतात. परंतु भूमातेच्या मांडीवर लोळून आलेले बाळ आईला अधिकच गोड वाटते :

मातीनें मढलें            मांडीयें चढलें
मायेने मानीलें                मोक्षसुख ॥

ही ओवी किती सहृदय आहे ! कालिदासाचा

“धन्यास्तदंगरजसा मलिनींभवन्ति ॥”

हा चरणही येथे मागे पडतो. मुलाच्या अंगाला लागलेली माती पाहून माता काय म्हणते ऐका :

माती का लागली        माती ना तो रे बुका
चुंबीन तुझ्या मुखा            तान्हेबाळा ॥
माती लागली            तिची झाली रे कस्तुरी
सोन्याच्या शरीरीं            तुझ्या बाळा ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to स्त्रीजीवन


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
अजरामर कथा
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
सापळा
पैलतीराच्या गोष्टी
खुनाची वेळ
गांवाकडच्या गोष्टी
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
लोकभ्रमाच्या दंतकथा