फोनची रिंग वाजली म्हणून फोन उचलला .मोबाइलचा स्क्रीन अननोन नंबर  दाखवीत होता .मी फोन घेतला पलीकडून मी मानसशास्त्रज्ञ एकबोटे बोलत आहे असे सांगण्यात आले. त्यावर मी माफ करा राँग नंबर असे म्हटले व फोन बंद करणार होतो तेवढ्यात घाईघाईने पलीकडून नमू आहे का म्हणून विचारणा झाली .नमू म्हणजे नमिता माझी पत्नी. आमचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले होते .अजून माझी हिच्या माहेरच्या सर्व नातेवाईकांशी ओळख झाली नव्हती. लग्नातील ओळख ही खऱ्या अर्थाने ओळख नसतेच केवळ तो उपचार असतो. मी नमू म्हणून हाक मारली.नंतर बराच वेळ नमू त्या मानसरोगतज्ञ एकबोटेशी बोलत होती .

फोन बंद केल्यावर नमूने एकबोटे पुराण सुरू केले .हा एकबोटे तिचा मामेभाऊ तिच्याहून दहा पंधरा वर्षांनी मोठा ,हसतमुख व पंधरा वर्षांनी मोठा असूनही बरोबरीच्या नात्याने  मित्रासारखा नेहमी वागणारा इत्यादी इत्यादी .तर माधव एकबोटेने आम्हाला जेवण्यासाठी बोलाविले होते .त्या निमित्ताने त्याला माझ्याशी ओळख करून घ्यायची होती. रविवारी सर्वानाच सुट्टी असल्यामुळे त्या दिवशी दुपारी जेवण्यासाठी बोलाविले होते .या माधवचे क्लिनिक तर होतेच परंतु हॉस्पिटलही होते .हॉस्पिटलमध्ये मनोरुग्ण ठेवले जात .संमोहन, औषधे, वेळोवेळी सूचना, समुपदेश, इत्यादी मार्गांनी रुग्ण बरा केला जातो.जर एखादी केस बरी होण्याच्या पलीकडील असली तर ती  सरकारी मनोरुग्णालयात पाठविली जाते. माधव मानसरोगतज्ञांमध्ये दादा समजला जातो. तो देशात व परदेशात अनेक कॉन्फरन्ससाठी जात असतो.इत्यादी माहिती नमूकडून कळली.मलाही मानसरोगतज्ञांबद्दल कुतुहल होते .नमूच्या बोलण्यावरून हा माधव इंटरेस्टिंग केस वाटत होता.त्याला भेटण्याची त्याचे हॉस्पिटल पहाण्याची त्याचबरोबर त्याचे अनुभव ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली .

आम्ही रविवारी त्यांच्याकडे जेवायला गेलो .जेवण झाल्यावर गप्पा मारताना मी त्यांना विचारले की वेडा कुणाला म्हणावे ?ते पुढे म्हणाले आपल्यापैकी प्रत्येकजण वेडा असतो हे तुम्हाला माहीत आहे काय ?म्हणूनच अापण सिनेमाचे वेड वाचनाचे वेड खेळाचे वेड गप्पांचे वेड वगैरे शब्द वापरतो .आपल्या मनामध्ये कुठेतरी एक "धिस फार अँड नो फर्दर""इथपर्यंत आणि यांच्या पुढे नाही" अशी एक रेषा आखलेली असते.ती रेषा जो ओलांडतो त्याला वेड अशी संज्ञा आपण देतो . त्याच प्रमाणे समाजाची एक समतोल रेषा  असते .ती रेषा जो ओलांडतो त्याला वेड असे म्हटले जाते .आपल्यापैकी प्रत्येकजण केव्हा ना केव्हा ती रेषा ओलांडतो म्हणूनच मी सुरुवातीला म्हटले की आपल्यापैकी प्रत्येकजण वेडा आहे .केव्हा केव्हा  आपल्यापैकी प्रत्येकजण नेहमीच ही रेषा  ओलांडत असतो .

आपण जरी रेषा ओलांडली तरी आपल्याला इतर गोष्टींचे भान असते .रेषेबाहेरून पुन्हा आपण आत येतो .म्हणून त्या वेडाला छंद असा शब्द वापरला जातो .छंदाबरोबर आपण वाहावत जात नाही.

वेडा मनुष्य हे भान हे नियंत्रण हरवून बसलेला असतो .त्याचा समतोल ढळलेला असतो.  कित्येक वेळा वेडा मनुष्य शहाण्यासारखा वागत असतो .विशिष्ट शब्द विशिष्ट वस्तूंचे दर्शन विशिष्ट आठवण यानी तो  इतका उद्दीपित होतो की तो सर्व समतोल सर्व भान हरवून बसतो .वेडाचेही कमी जास्त असे अनेक प्रकार असतात .पुढे माधव म्हणाला जाऊ द्या मी तुम्हाला लेक्चर देण्याला सुरुवात केली .

एवढेच लक्षात ठेवा की शहाणा मनुष्य ही वेडा असतो व वेडा मनुष्य ही शहाणा असतो .उदाहरणार्थ आमच्या हॉस्पिटलमधील जयदीप हा अशा प्रकारचा वेडा आहे .तो नेहमी पूर्ण नॉर्मल असतो .सामान्य व्यक्तीप्रमाणे  त्याच्या सर्व हालचाली विचार असतात .फक्त रेल्वे बघितली की त्याचे डोके फिरते .जरी रेल्वेच्या संदर्भात रूळ स्टेशन इंजिन डबे त्याने काहीही प्रत्यक्ष किंवा चित्ररूपाने किंवा टीव्हीवर बघितले तरीही तो व्हायोलंट  होतो .फार तर आतापर्यंत होत असे असे म्हणूया.तुम्ही राजकारण समाजकारण अर्थकारण वाङ्मय इत्यादी कुठल्याही गोष्टींबद्दल चर्चा करा तो तुमच्या जवळ व्यवस्थित बोलेल.रेल्वेचा विषय आल्यावर मात्र तो लगेच व्हायोलंट होईल . किंवा होत असे,असे म्हणू या . हल्ली सुधारणा आहे .

एवढे सर्व जयदीपपुराण ऐकल्यानंतर मला त्या जयदीपबद्दल कुतूहल वाटू लागले .मी स्वाभाविकपणे विचारले की कोण हा जयदीप आणि त्याची गोष्ट काय आहे?तो रेल्वे बघितल्यावर व्हायोलंट का होतो ?

माधवने जयदीपची गोष्ट सांगण्यास सुरुवात केली . 

हा जयदीप अंधेरी पूर्वला रहातो.सचिवालयात नोकरीला आहे किंवा होता म्हणा.उच्च शिक्षित व मोठ्या पदावर नोकरीवर होता.घरचाही सुखवस्तू प्रथमश्रेणीने रोज चर्चगेटपर्यंत प्रवास .पावसाळी दिवस .स्टेशनमधून बाहेर पडत असताना समोर एक मुलगी चालत होती.अकस्मात तिचा पाय केळ्याच्या सालीवर पडला .ती पाण्यात पाय घसरून पडणार होती .जयदीपने तिला पटकन सावरले.अशा तर्‍हेने त्याची जयश्रीशी ओळख झाली.जयश्रीही सचिवालयात नोकरीला होती .ती  अंधेरी पश्चिमला राहात होती . तीही उच्चशिक्षित व सुखवस्तू घराण्यातील .स्वाभाविक रोज त्यांचे बरोबरच एका गाडीने प्रथमश्रेणीतून येणे जाणे सुरू झाले .त्यातून स्वभाव जुळले .आकर्षण वाढायला सुरुवात झाली.बरोबर फोर्टमध्ये फिरणे ,बरोबरच इंग्लिश सिनेमाला जाणे,चौपाटीवर फिरणे,पिकनिकला जाणे बरोबरच कॅन्टींगमध्ये जेवणे इत्यादी गोष्टी सुरू झाल्या. 

दोघानीही आपापल्या घरी परस्परांच्या ओळखी करून दिल्या.दोघे एक दिवस एकमेकांना प्रपोज करणार, संमती देणार ,लग्न करणार,हे सर्व गृहीत धरून चालले .कुणाचीही या लग्नाला आडकाठी नव्हती.दोघांनाही सर्व जग सुंदर दिसत होते . फुलांच्या पायघड्या घातल्या आहेत त्यावरून आपण चालत आहोत असे दोघांनाही वाटत होते .जगात दुःख नावाची काही चीज असेल असे त्याना वाटत नव्हते .दोघेही कोण पुढाकार घेतो ते पाहात होते .शेवटी एक दिवस समुद्रावर फिरत असताना जयदीपने पुढाकार घेतला. शेक्सपिअरियन हिरोच्या थाटात गुडघ्यावर बसून त्याने गुलाबाचे फूल तिला दिले. तू माझी होशील  का असे विचारले.अर्थातच तिचा होकार होता.

दोघांनीही आपापल्या घरी सांगितले .वडील मंडळींची रीतसर बैठक झाली .साखरपुडा व लग्न यांच्या तारखाही ठरल्या .साखरपुडा आनंदात पार पडला .दोघेही कबुतरांच्या जोडी प्रमाणे मुंबईमध्ये फिरत घुमत होती .लग्नासाठी दोघांनीही एक महिन्याची रजा काढली .मधुचंद्राला कुठे जायचे किती दिवस वगैरे दोघांनीही एकत्र बसून ठरविले .त्याप्रमाणे हॉटेल रिझर्व्हेशन विमान बुकिंग वगैरे सर्व पार पडले.

आणि मग तो काळाकुट्ट दिवस उजाडला .रात्रीची वेळ होती .गाडी अजून का येत नाही म्हणून जयश्री वाकून बघत होती .समोर काही झुडपे वाढलेली होती .त्यामुळे गाडी येताना प्लॅटफॉर्मवरील काही भागावरून गाडी दिसत नसे.दुर्दैवाने जयश्री त्या जागीच प्लॅटफॉर्मवर उभी होती .तिला गाडी दिसली नाही .वाकून बघताना एकदम गाडी अंगावर आली .ती दचकली व मागे सरकत असतांना घसरून रुळांवर पडली.शेजारीच जयदीप उभा होता तो तिला सावरून  आपल्याकडे ओढू शकला नाही .बघता बघता जयश्री गाडी खाली गेली .समोरील विदारक दृश्य पाहून त्याने एक किंकाळी फोडली आणि तो बेशुद्ध झाला .तो शुद्धीवर आल्यावर त्याने जयश्री कुठे आहे म्हणून विचारले. दुसऱ्याच क्षणी त्याला सर्व घटना आठवली .आणि दातओठ  खाऊन रुळावरील दगड उचलून ते तो रेल्वेवर फेकू लागला .त्याचे संतुलन पूर्णपणे बिघडले होते .

त्याला त्याचे कुटुंबीय हवापालटासाठी काही दिवस कोकणात त्यांच्या वडिलोपार्जित घरी घेऊन गेले होते.जाताना रेल्वेने न जाता ते सर्व मोटारीने गेले.तो पूर्ण सुधारला नॉर्मल झाला असे वाटल्यावर ते त्याला घेऊन पुन्हा मुंबईत येऊ लागले .येताना रेल्वेने येणार होते .रेल्वे स्टेशनमध्ये आल्याबरोबर तो अस्वस्थ झाला .त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले .तो दात ओठ खाऊ लागला .रेल्वे येताना बघितल्याबरोबर तर तो कुणालाच आवरेनासा झाला .त्याला चार पाच जणांनी घट्ट धरून ठेवला होता .अन्यथा तो एक रेल्वेखाली तरी गेला असता किंवा डब्यावर डोके आपटून ते त्याने फोडून घेतले असते .

याला एक महिना झाला. तेव्हापासून तो माझ्या हॉस्पिटलमध्ये आहे .काही त्यांच्या कुटुंबीयांकडून काही स्वतः त्याच्याकडून अशी मला सर्व हकिकत कळली.सुरुवातीला तो रेल्वेचे चित्र बघितले तरी व्हायोलंट  होत असे .हल्ली चित्र ,टीव्हीवर रेल्वे, रेल्वेची शिटी,इत्यादींमुळे तो व्हायोलंट  होत नाही.औषधोपचार चालू आहेत .तो बरा होईल याची मला खात्री आहे .पूर्ण बरे वाटल्यानंतर त्याला आम्ही खबरदारीने रेल्वेमधून घेऊन जाऊ .त्यावेळी तो व्यवस्थित असला म्हणजे पूर्ण बरा झाला असे म्हणता येईल .पूर्वी आणि आताही तो रेल्वे हा विषय सोडला तर पूर्ण नॉर्मल होता व आहे.हल्ली त्यांची प्रगती झपाट्याने व समाधानकारक आहे .बघूया काय होते ते .असे म्हणून माधवने गोष्टींचा समारोप केला .

लवकरात लवकर त्याला पूर्ण बरे वाटू दे व भविष्य काळात त्याला नॉर्मल जीवन जगण्याचे सामर्थ्य मिळूदे अशी प्रार्थना करून आम्ही माधवकडून आमच्या घरी येण्यासाठी निघालो .

३०/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to प्रेमकथा भाग २


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
झोंबडी पूल
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
खुनाची वेळ
श्यामची आई
वाड्याचे रहस्य
त्या वळणावरचा पाऊस
कौटुंबिक प्रेमकथा भाग १
गांवाकडच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत
रत्नमहाल
पैलतीराच्या गोष्टी