एक आटपाट नगर होते .पाट म्हणजे विभाग पेठ बहुधा आठवी पेठ सदाशिवपेठ असावी.त्या नगरात अनेक उद्योग कारखाने दुकाने वगैरे होती .त्यातील एक व्यवसाय आस्थापन होते .त्याचे नाव होते क्ष. त्यात अनेक कामगार काम करत होते .एका कामगाराचे नाव होते क .त्या आस्थापनांमध्ये एक स्वागतिका होती .तिचे नाव होते स .स दिसायला तशी चांगली फटाकडी होती . क मात्र दिसायला चारचौघांसारखा होता . स च्या पुढ्यात हजेरी देण्यासाठी एक लहान यंत्र ठेवलेले होते .येणारा प्रत्येक कामगार त्यावर अंगठा ठेवून आपली हजेरी देत असे.येणाऱ्या कामगाराचे नाव व वेळ लगेच दर्शवली जाई आणि नोंद केली जाई.रोज क आला की तो स कडे बघून शुभ प्रभात म्हणत असे.तीही शुभ प्रभात म्हणून त्याला उत्तर देत असे .हळू हळू त्यांच्या हसण्याचा पोत बदलण्याला सुरुवात झाली .ते हास्य सर्वसाधारण हास्य न राहता थोडे स्पेशल होऊ लागले .दुरून बघणाऱ्याला देखील इतर कामगारांकडे बघून केलेले हास्य व स ने क कडे व क ने स कडे बघून केलेले हास्य यांमधील फरक लक्षात येत असे.

कुणी कुणाच्या प्रेमात पडावे याचा काही अलिखित नियम नाही . स दिसायला चांगली असली आणि क सामान्य असला तरी ती दोघे एकमेकांच्या प्रेमात पडली हे आपण आत्तापर्यंत ओळखले असेलच . एक दिवस क ने धीर करून स ला कॉफी घेण्याला येणार का असे विचारले . स ने किंचित विचार करून होय असे सांगितले.हळूहळू दोघांच्या भेटीगाठी वाढू लागल्या .नाटक सिनेमा चौपाटीवर फिरायला जाणे एरवीच विना उद्देश्य भटकत राहणे,वगैरे गोष्टी सुरू झाल्या .एक दिवस क ने स ला प्रपोज केले. स त्याचीच वाट पाहात होती तिने होकार दिला .आता सर्वाना सांगून विचारून दाखवून संमती घेऊन निश्चित करणे एवढीच गोष्ट शिल्लक राहिली होती .

त्या कारखान्याचा मालक म ही स वर प्रेम करीत होता .कारखान्याचा मालक म्हटल्यानंतर तो अर्थातच क हून खूपच श्रीमंत होता . स चे वडील शाळेमध्ये शिक्षक होते . म हा त्यांच्या हाताखाली शिकला होता. म हा तिच्या वडिलांचा आवडता विद्यार्थी होता.हुषार सुस्वभावी आज्ञाधारक इत्यादी इत्यादी . म ला अर्थातच स चे वडील त्याचे आवडते शिक्षक आहेत याची कल्पना नव्हती . स चे वडील एक दिवस रस्ता क्रॉस करीत होते.त्याच वेळी म आपल्या मोटारीतून येत होता. स चे वडील कोणत्यातरी विचारांमध्ये असल्यामुळे येणार्‍या जाणाऱ्या मोटारीकडे त्यांचे लक्ष नव्हते.ते म च्या मोटारीखालीच यायचे परंतु म ने जोरात ब्रेक दाबल्यामुळे ते वाचले.सहज एक शिवी म च्या तोंडात आली होती.तेवढ्यात त्याने आपले आवडते सर बघितल्यामुळे ती शिवी गिळून टाकली .मोटार बाजूला थांबवून त्यांने सरांची भेट घेतली .सरांनी अर्थातच त्याला ओळखले नाही .कारण त्यावेळच्या म मध्ये आणि आतांच्या म मध्ये जमीन अस्मानाचा फरक पडला होता. म ने मी अमुक अमुक अमक्या वर्षी तुमच्या अमक्या वर्गात होतो अशी ओळख सांगितली.आणि तो त्यांच्या पाया पडला .त्याने त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडले . स चे वडिल अर्थातच त्याला प्रेमाने आपल्याकडे चहाला घेऊन गेले .त्या वेळी स घरांमध्ये नव्हती. परंतु तिचा फोटो फ्रेममध्ये टेबलावर ठेवलेला होता. म ने ही कोण? असे विचारता त्यांनी माझी मुलगी अमुकअमुक कारखान्यात काम करते असे सांगितले. म ने त्या कारखान्याचा मालक मीच असे सांगितले नाही.फक्त केवळ हास्य केले.

पुन्हा केव्हातरी आपण त्यांना ते सांगू असे त्याने मनात ठरविले. कारखान्यात स लाही त्यांनी तसे कधी दर्शविले नाही . क आणि स ची नेहमीची नेत्र भेट म च्या कधी लक्षात आली नव्हती .असेच दिवस महिने चालले होते . म चे प्रेम तसेच सुप्त राहिले होते .

एक दिवस स अगोदर न सांगता कामावर आली नाही. म ला चौकशी करावी असे वाटत होते.एवढ्यात स चा फोन आला . स रडत होती. तिच्या वडिलांना काल रात्री हार्टअटॅक आला होता.त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते .त्यामुळे ती आज आणि पुढचे काही दिवस कामावर येऊ शकणार नव्हती . म ने हॉस्पिटलचे नाव विचारले आणि ठीक असे म्हणून फोन ठेवून दिला.

ताबडतोब मोटार काढून तो (म) हॉस्पिटलमध्ये गेला. स व तिची आई हॉस्पिटलमध्येच होत्या.ताबडतोब बायपास करणे आवश्यक होते.त्यासाठी पाच लाख रुपये डिपॉझिट म्हणून हॉस्पिटलमध्ये जमा करणे आवश्यक होते.साध्या शाळा मास्तरजवळ तेवढे पैसे कॅश असणे अशक्य होते.मास्तर निवृत्त झालेले होते . स ही त्यांची एकुलती एक मुलगी होती. तिच्यावरच सर्व कुटुंबाचा भार होता. स चा धाकटा भाऊ शिकत होता म ने उशीर न करता लगेच तेवढी रक्कम हॉस्पिटलमध्ये जमा केली.एवढेच काय परंतु डॉक्टरांना भेटून त्यांना स्पेशल रूम मिळेल अशी व्यवस्था केली .मास्तर पूर्ण बरे होऊन घरी येईपर्यंत लागेल तो सर्व खर्च म ने केला.आत्ता कुठे स ला म हा आपल्या वडिलांचा आवडता विद्यार्थी आहे हे कळले.आणि त्याच्या डोळ्यातून त्याचे तिच्यावरील प्रेमही कळले.अशा गोष्टी बायकांच्या जास्त लवकर लक्षात येतात . 

सरांना भेटण्याच्या निमित्ताने म चे वारंवार स कडे येणे जाणे होऊ लागले. म चे स वरील प्रेम आणि त्याची तिच्याशी लग्न करण्याची इच्छा स च्या आई वडिलांच्या लक्षात आली. म ची इच्छा, म चे प्रेम, म चे उपकार, आई वडिलांची इच्छा, यांच्या पुढे स काहीही बोलू शकत नव्हती.तिने लग्नाला मूक होकार दिला .

बिचारा क हॉस्पिटलमध्ये येऊन स ला भेटू शकत नव्हता .ना त्याला स च्या घरी येता येत होते . स कित्येक दिवस रजेवरच होती .दोघांचेही फक्त मोबाइलवर बोलणे होत असे .वडिलांच्या आजारपणामुळे दोघे भेटू शकत नव्हती .त्यातच ही नवी गुंतागुंत झाली . क ला कसे समजावून सांगावे? क ला काय वाटेल? क शी कसे बोलावे?असा गहन प्रश्न स ला पडला होता.फोनवर अशा गोष्टी बोलणे कठीण होते .त्याच्यावर काय परिणाम होईल याची तिला भीती होती .तिने त्याला आपल्या नेहमीच्या जागी भेटण्यासाठी बोलाविले.तिथे भेटल्यावर तिने त्याला सर्व काही सुरुवातीपासून सांगितले. माझा नाईलाज आहे. मी उपकाराच्या ओझ्याखाली दबून गेले आहे.मी आई वडिलांचे मन दुखवू शकत नाही .जर आपण बंड केले तर माझी व तुझी दोघांच्याही नोकऱ्या जातील .आई वडिलांना माझ्याशिवाय दुसरा आधार नाही.जर तू व मी दुसरीकडे कुठे नोकरी करीत असतो तर कदाचित आपल्याला वेगळा विचार करता आला असता .तू मला विसरून जा .ही तुझी व माझी शेवटची भेट.

या सगळ्या बोलण्यावर क चिडेल रागवेल कदाचित रडेल असे स ला वाटत होते .यातील काहीच न करता क ने अश्रूपूर्ण नयनांनी गंभीरपणे स ला निरोप दिला .फक्त तो एवढेच म्हणाला की मी जर श्रीमंत असतो तर म चे कर्ज लगेच फेडून टाकले असते .आपण तुझ्या आई वडिलांकडे जाऊन सर्व परिस्थिती स्पष्ट केली असती .त्यांनीही तुझ्यावरील प्रेमामुळे आपल्याला होकार दिला असता .परंतू प्राप्त परिस्थितीत दुसरा कुठला मार्ग दिसत नाही .

हे सर्व संभाषण समुद्रावर जे अनेक मोठे खडक होते त्यातील एका खडकामागे चालले होते.तेच त्यांचे नेहमींचे एकांतात भेटण्याचे ठिकाण होते .

दुसऱया दिवशी क ला एक फोन कॉल आला.त्यामध्ये त्याला स च्या घरी भेटायला बोलाविले होते.कोण बोलत आहे असे विचारता ती व्यक्ती मी स चे वडील असे म्हणाली .विशेष काही विचार न करता किंवा स ला फोन करून खरेच तिच्या वडिलांनी फोन केला होता का हे न विचारता क स च्या घरी गेला.

दबकत दबकत तिथे गेल्यावर त्याला तिथे म बसलेला आढळून आला. म ने त्याला हात धरून आपल्या शेजारी बसविले . क इथे कां आला ते स ला कळेना. क कोण हे स च्या आई वडिलांना अर्थातच माहीत नव्हते .कुणीतरी आपले दोघांचे प्रेम म ला सांगितले असे दोघांना वाटले.आता रागाने म काय करतो असे दोघांनाही वाटले .आपल्या नोकऱ्या जाणार .दुसऱ्या नोकऱ्या चटकन् मिळणे कठीण .आई वडील अर्थातच रागावणार.परंतु त्याचबरोबर म शी ठरलेले लग्न मोडणार याचा कुठेतरी सूक्ष्म आनंदही त्यांना होता.

प्रत्यक्षात यातील काहीच झाले नाही . म स ला म्हणाला खरे प्रेम हे त्यागातही असते .तू मला सत्य परिस्थिती का सांगितली नाही ?मी तुम्हाला खलनायक वाटलो का ?मी तुझ्याशी लग्न करून दोन, दोन काय तीन जिवांना दुःखी केले असते .तू, क, व मी.तुमच्या दोघांच्याही नोकऱ्या सुरक्षित आहेत .मला उपकाराच्या ओझ्याखाली दबलेली ,नाइलाजाने लग्न करणारी ,तू नको होतीस.तर माझ्यावर खरंच प्रेम करणारी पत्नी म्हणून तू हवी होतीस. सराना तो म्हणाला गुरुजी तुमच्या सर्व काही लक्षात आले असेलच. तुम्ही या दोघांच्या लग्नाला मोकळ्या मनाने संमती द्या .मी तुमच्यासाठी खर्च केलेल्या पैशांचा अजिबात विचार करू नका .मी ती गुरुदक्षिणा समजतो .

असे म्हणून म ने स ला हाक मारली. स चा हात क च्या हातात दिला. हे सर्व करताना म च्या चेहऱ्यावर अभ्रे दाटून आली होती.त्या सगळ्यांचा निरोप घेऊन म निघाला.

*दरवाज्यात पोचल्यावर तो वळला आणि म्हणाला जर मी त्या दिवशी तुम्ही ज्या दगडा जवळ बसून बोलत होता त्याच्या पलीकडे बसलेला नसतो तर नकळत मोठ्या पापाचा धनी झालो असतो .*

८/३/२०१९©प्रभाकर पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to प्रेमकथा भाग २


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
झोंबडी पूल
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
खुनाची वेळ
श्यामची आई
वाड्याचे रहस्य
त्या वळणावरचा पाऊस
कौटुंबिक प्रेमकथा भाग १
गांवाकडच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत
रत्नमहाल
पैलतीराच्या गोष्टी