तो वाडा गल्लीच्या एका टोकाला होता.वाडा पडीक होता जुना होता .ऐसपैस  पसरलेला होता.शहराचा विस्तार होत असताना आसपास सुंदर सुंदर बंगले सदनिका उभ्या राहात होत्या.या सुंदर नजार्‍याकडे आकाशातून पाहिले, पक्षी नेत्र दृष्टीक्षेप(बर्ड्स आय व्ह्यू )टाकला तर या वाड्याचा परिसर एखाद्या चट्ट्या सारखा विद्रुप दिसत असे .वाड्याला लागून असलेल्या रस्त्यावर  एक पिंपळाचे झाड होते . वाडा कुणाचा होता याबद्दल निरनिराळ्या अफवा होत्या परंतु  निश्चित माहिती कुणालाही नव्हती. लोकांना तरी नव्हती.

काही जण म्हणत की इथे पूर्वी शहराचा विस्तार होण्याअगोदर  एक जमीनदार रहात होता. तो सावकारीही करीत असे.  तो कर्ज देताना तारण म्हणून  जमिनी लिहून घेत असे.व्याजाचा दर भरमसाठ लावीत असे .शेवटी जमिनी तो आपल्या घशात घाली.स्त्रियांकडे पाहण्याची त्याची नजर चांगली नव्हती .कित्येक  स्त्रिया त्याच्या अत्याचाराला बळी पडत असत. त्याच्या अत्याचाराला कंटाळून शेवटी रयत अत्यंत चिडली आणि त्या सावकाराच्या सर्व कुटुंबीयांचा  खून करण्यात आला.त्याला कुणीही वारस उरला नाही .तेव्हापासून तो वाडा असा आहे.

आणखी एक अफवा अशी होती की हा वाडा मालकाने मोठ्या कौतुकाने बांधला .वाड्यात सर्व  कुटुंबीय  राहायला आले.त्यानंतर इथे विचित्र घटना घडू लागल्या .कुटुंबीयांच्या स्वप्नात आलटून पालटून एक भयानक आकृती येत असे.हा वाडा माझा आहे तुम्ही इथून निघून जा म्हणून तो सांगत असे .शेवटी घाबरून मालकाने हा वाडा तसाच सोडला तो दुसरीकडे निघून गेला.इथे कुणीही भाडेकरू राहायला तयार नसल्यामुळे हा वाडा ओसाड पडला तो तसाच आहे .

आणखीही एक अफवा अशी होती की पोटा पाण्याची सोय पाहण्यासाठी मालक मुंबईला निघून गेला.तो तिकडेच स्थिरावला त्यानंतर इकडे कुणीही आले नाही .तेव्हापासून वाडा ओसाड आहे .

आणखी एक अफवा अशी होती की वाडा बांधून येथे रहायला आल्यानंतर त्या वाडय़ात सतत कुणी ना कुणी आजारी पडत असे.एक दोन अकाली मृत्यूही झाले .आपल्याला हा वाडा साहत नाही असे म्हणून, वाडा तसाच टाकून मालक परागंदा झाला .

कुणी काही कुणी काही सांगत असे .जो तो आपल्या कल्पनाशक्तीला ताण देऊन निरनिराळया कथा सांगत असे .सत्य काय ते कुणालाच माहीत नव्हते .

पडका वाडा म्हणूनच तो ओळखला जात असे. आजूबाजूला  उंच सदनिका उभ्या राहात होत्या.मॉल थिएटर्स शोरूम्स दुकाने सर्व काही चकाचक होते.

वस्तुस्थिती अशी होती कि कित्येक  वर्षांपूर्वी वाड्याचा मालक पोटापाण्याची सोय पाहण्यासाठी  वाडा सोडून निघून गेला होता . त्याने वाड्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले .अत्यंत अल्प किंमत मिळत असल्यामुळे त्याने तो विकलाही नाही.ही तीन चार पिढ्या पूर्वीची गोष्ट .    

मूळ  मालकाला चार मुलगे व दोन मुली होत्या .पुढे प्रत्येकाचा वंश विस्तार वाढत गेला .कोण कुठे कोण कुठे स्थिरावला.एकाचे दोन दोनाचे चार चाराचे सोळा अशा गतीने वंशविस्तार वाढत गेला.अनेक वाटेकरी ,अनेक मालक, असंख्य ठिकाणी स्थिरावलेले ,कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही.अश्या  परिस्थितीत  अनेक बिल्डर ती जागा विकत घेण्यासाठी प्रयत्न करीत होते .शहर विस्तारामुळे ही जागा आता मोक्याच्या ठिकाणी होती.तिथे बांधकाम करून भरपूर पैसे मिळू शकले असते . बिल्डरने कितीही प्रयत्न केले तरी असंख्य वारसांमध्ये  एकवाक्यता होत नव्हती.सौदा जुळत नव्हता .

वस्तुस्थिती अशी होती की कुणाही मालकाला त्या वाड्याचे देणे घेणे नव्हते.सर्व मालकांकडून तो दुर्लक्षित होता .परंतु मालकी हक्क मात्र कुणीही सोडायला तयार नव्हता .विक्री खतावर सही करण्यासाठी ,प्रत्येकाला त्या होणाऱ्या सदनिकेत एक एक सदनिका हवी होती .त्या जागेत एवढ्या एकूण सदनिका होणारच नव्हत्या तर प्रत्येकाला सदनिका कशी देणार? आणि बिल्डरला त्यात काय मिळणार ? काही काही तथाकथित मालकांकडे एक पै एवढीच मालकी होती.(जुन्या काळी मालकीहक्क असा दाखविला जात असे.३पै=१पैसा,४पैसे=१आणा,१६आणे=१रुपया. पै हे नाणे अस्तित्वात होते .)  शेवटी बिल्डर लोकांनी त्या वाड्याचा नाद सोडून दिला.आसपास झाडी वाढली. गवत वाढले . एकूणच इस्टेटीची रया गेली.

कुणी रखवालदार नाही.  येथे  का आलात म्हणून विचारणारा कुणी नाही.अश्या  परिस्थितीत भिकारी, जुगारी, दारुडे, गुंड, वारयोषिता, यांचा  तो वाडा आश्रयस्थान बनला. रस्त्यावर रहाण्यापेक्षा वाड्यात, पडक्या का होईना, मळक्या का होईना ,रहाणे अर्थातच श्रेयस्कर ,असा विचार करून तिथे अनेक जण रहात होते. .वाडा ऐसपैस पसरलेला असल्यामुळे सर्वजण सुखाने तिथे नांदत होते.जोपर्यंत एखादा गुन्हा होत नव्हता,तोपर्यंत पोलिसांनाही तिकडे लक्ष देण्याचे कारण नव्हते .

एक दिवस तर एकाने तिथे दारूची भट्टी लावली .तिथे दारू तयार  होऊन ती ठिकठिकाणी पोचवली जात असे.त्याचप्रमाणे रसिक मंडळी तिथे घ्यायला येत असत .असा सर्व आनंदी आनंद चालला होता.वाड्याच्या शेजारील पिंपळाच्या झाडावर एक  

*समंध*ही

रहात होता. जोपर्यंत वाड्यात सर्वकाही परस्परांच्या मर्जीने चालले होते. कुणाची कुणावर जबरदस्ती होत नव्हती तोपर्यंत समंधाचे तिकडे लक्ष नव्हते.वाड्यातील गर्दी गडबड गोंधळ याचा थोडा त्रास समंधाला जरूर होत असे.समंध मुळात शांत स्वभावाचा असल्यामुळे तो तिकडे विशेष लक्ष देत नसे.

यानंतर आणखी एक घटना घडली .रस्ता रुंदीचे काम चालू होते .त्यामध्ये एक दिवस बुलडोझरने पिंपळ अाडवा केला.समंध अल्लद वाड्याच्या वरच्या मजल्यावर राहण्यास आला.आता तर त्याला वाड्यातील गडबड गोंधळाचा त्रास जास्तच होऊ लागला.आवाज वर्दळ यापेक्षा तिथे ज्या गोष्टी चालत त्या समंधाला अज्जिबात पसंत नव्हत्या .तरीही समंध शांत स्वभावाचा असल्यामुळे तो तिकडे विशेष लक्ष देत नव्हता.     

एक दिवस कुणी तरी पोलिसांत त्या वाड्यात चालणार्‍या  व्यवहारांबद्दल तक्रार केली.पोलिसांनी एक दिवस त्या वाड्यावर रेड टाकली .भिकाऱ्यांना हाकलून लावले .गुंडांना व वेश्याना पकडून नेले.दोन दणके देऊन गुंडांना सोडण्यात आले तर वेश्याना थोडी बहुत चिरीमिरी घेऊन सोडण्यात आले.दारूची भट्टी पोलिसांना दिसलीच नाही .  कदाचित भट्टी चालवणाऱ्याने पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी बांधली असावी.त्याचा धंदा सुखेनैव चालू होता .

पोलिसांच्या रेडनंतर वाड्यातील गर्दी बरीच कमी झाली .फक्त दारू तयार होत असे. तिथून ती निरनिराळ्या ठिकाणी पोचविली जात असे.मधून मधून पोलीसांची नजर त्या वाड्यावर आहे असे लक्षात आल्यावर सर्वच प्रकारची वर्दळ बरीच कमी झाली होती. 

एक दिवस दोन मुलानी फूस लावून, वेगळ्याच बहाण्याने , एका मुलीला वाड्यात आणले.त्यांचा इरादा ठीक दिसत नव्हता.मुलांचा पवित्रा बघून ती मुलगी घाबरली.तिला लगेच निघून जायचे होते परंतु ती मुले तिला जाऊ देत नव्हती .समंधाला हळूहळू त्या मुलांचा राग येऊ लागला होता. 

(क्रमशः)

८/१२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भूतकथा भाग २


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
वाड्याचे रहस्य
सापळा
विनोदी कथा भाग १
झोंबडी पूल
अजरामर कथा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी