शिंदेंनी ऋषीला बेड्या ठोकल्या होत्या. मकरंद आणि प्रतिमा घरातुन बाहेर पाडले. आता घराला पिवळी पोलिसटेप लाऊन बंद केलं होतं. माईची डेडबॉडी पडलेली जागा पांढर्‍या रंगाने आखुन घेतली होती. घरात आता फॉरेनसिक आणि पोलिसांची माणसं आली होती.

"साहेब आता तुमचं घर तपास पुर्ण होईपर्यंत आमच्या ताब्यात राहील." कदमांनी सांगितलं

"ताईचे अंत्यसंस्कार कधी करु शकतो...??" मकरंदने विचारलं.

"आता ते पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यावरच सांगु शकेन" कदम बोलात होते.

हे सगळं संभाषण चालु असताना ऋचा वर आली. तिने ऋषिकेशला नेताना पाहिलं.

"बाबा, दादाला कुठे नेतायत...?? काय झालं आई...?" ऋचाने आश्चर्यचकित होऊन विचारलं. 

ती हे सगळं पाहुन भांबावली होती. 

"माई आत्याला मारलं कुणीतरी...!" प्रतिमा म्हणाली.

"कुणीतरी काय...? तुझ्या लाडक्या मुलाने मारलंय.. कबुलीजवाब दिलाय त्याने..!" मकरंद रागात म्हणाला.

"दादाने...?? पण कसं शक्य आहे...?? तो तर...!!" ऋचा अस्पष्ट काहीतरी पुटपुटली. 

"ताई, तुमच्या आई-बाबांना घेऊन या स्टेशनाला...!" शिंदे बोलले. 

घरात प्रवेश करायल बंदी होती. बाबांची ऑफिस बॅग, आईची पर्स आणि ऋचाची  बॅग इतकच घेऊन ते निघालो. आता रात्रीचे दहा वाजले होते. डोंबिवली आता जरा पेंगुळली होती. ते पोलिस ठाण्यात गेले. 

"रात्र बरीच झाली आहे. तुम्ही बेसिक माहीती द्या आणि आमच्या एका ट्रांझिटमध्ये रहा."कदमांनी सांगितलं.

"ट्रांझिटमध्ये कशाला...? नुकताच आम्ही एक ब्लॉक घेतला आहे ,लोढा हेव्हनजवळ तिथे जाऊन राहिलं तर चालेल का??" प्रतिमाने विचारलं.

"आता रहा पण, आम्ही बोलवु तेंव्हा यावं लागेल. तुमच्या सगळ्यांना वेगवेगळं इंट्रोगेशनसाठी यावं लागेल. शिंदे यांचे स्टेटमेंट लिहुन घ्या आणि सोडा त्यांना. या ऋषिकेश देशपांडेच स्टेटमेंट शेवटी घेऊ." कदम म्हणाले.

"साहेब चार्जशीट कधी फाईल करायची...??" शिंदेंनी विचारलं

"हे प्रकरण मिटवुन यांना पाठवा. चार्जशीट आपण करु. घोरपडेंना जरा जेवण मागवायला सांगा. मी केबीनमध्ये बसलोय."असं म्हणत कदम आपल्या केबीनमध्ये गेले.

"हां...! या बसा.. चहा मागवु का..? लोखंडे, दोन चहा सांग पेशल..! बसा साहेब सांगा काय पाहिलं आणि किती वाजता आलात सगळं सांगा.! ते माई ताई कधी पासुन होत्या ते पण... " शिंदे म्हणाले. 

त्यांनी रजिस्टर घेतलं आणि मकरंदचे स्टेटमेंट लिहून घेऊ लागले.

“मी मकरंद दत्तात्रय देशपांडे. राहणार तीनशे तीन  तिसरा मजला , निलगिरी अपार्टमेंट, गोग्रसवाडी, डोंबिवली. मी एम. आय. डी. सी मध्ये एस इंजिनियरिंग वर्क्स मध्ये मेंटेनन्स इंजिनियर आहे. माझी शिफ्ट रोज सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत असते. नंतर मी घरी येतो. आज मी नेहमी प्रमाणे साडे सातला घरी आलो. दारात प्रतिमा रडत बसलेली होती. हॉलमध्ये माई पडलेली होती. किचनच्याजवळ ऋषिकेश बसला होता.  त्याच्या कपड्यांना रक्त लागलेलं होतं.  मला हे बघून खूप वाईट वाटलं. ऋषिकेशचं अवतार बघून राहवलं नाही. मी त्याच्या जवळ गेलो आणि दोन कानशिलात लगावल्या त्याला.” मकरंदने सांगितलं.

“बाब्बो, साहेब डायरेक मारलं तुम्ही पोराला. का बरं...? आधी पण केलेलं का त्याने असं काही.? तुम्हाला कसा माहिती त्यानेच मारलंय...?” शिंदेनी पोलिसी खाक्यात विचारलं.

“त्यानेच कबूल केलं ना आत्ता... तुमच्यासमोर ...” मकरंद म्हणाला.

“ते आम्ही आल्यावर सांगितलं ना कि आधीच बोललेला तो...?” शिंदेनी विचारलं

“नाही ते तुम्ही आल्यावरच कबूल केलं पण हे असं रक्त लागलेलं त्याच्या कपड्यांवर म्हणजे त्यानेच मारलं असणार. असं मला वाटलं.” मकरंद जरा शंकित सुरात म्हणाला.

“नाही म्हणजे त्याचा रेकॉर्ड आहे का असा काही?? त्याने आधी मारामाऱ्या काही केल्यात का??” शिंदेनी विचारलं

“हो म्हणजे मारलं नाहीये पण मारामाऱ्या केल्यात. आमच्याकडे हे चालत नाही हो साहेब. आम्ही मध्यमवर्गीय लोकं आहोत.” मकरंद हात जोडून म्हणाला.

“ठीक आहे. तुम्ही बसा. तावडे मॅडम त्या मिसेस देशपांडेंना पाठवा.” शिंदेनी ते स्टेटमेंट बाजूला ठेवलं आणि नवीन कागद पेन घेतलं.

प्रतिमा आपली पर्स सावरत आली. जे काही घडलं होतं ते सगळं तिच्या आकलनापलीकडलं होतं. ती घाबरंतच खुर्चीत बसली. समोर ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासकडे  एकटक पाहू लागली.

“घ्याना ताई पाणी प्या. आरामशीर बसा.काळजी करू नका.” शिंदेनी दिलासा देत म्हणाले.

“धन्यवाद, मी म्हणजे अहो दादा तो वाईट नाहीये हो. म्हणजे बघाना हे असं सगळं कसं झालं ते आम्हाला माहिती नाही.” तिने घाबरत बोलायला सुरुवात केली.

“हो ताई, समजतंय आम्हाला पण त्याने काबुल केलंय, तुम्ही पाणी प्या आधी आणि जरा निवांत बसा. आपण स्टेटमेंट घेऊ. तावडे मॅडम तुम्ही पण बस जरा शेजारी त्यांच्या. ताई तुम्ही न घाबरता सगळं सांगा. जे काही  पाहिलंत जे काही ऐकलंत... तुम्हाला ऋषिकेश काही बोलला का ते सगळं.?” शिंदेनी लेडी कोंस्टेबलना बसायला सांगितलं.

“म्हणजे मी दार उघडलं....” प्रतिमा सांगायला लागली.

“तसं नाही ताई तुमच पूर्ण नाव, पत्ता, कुठे काम करता आणि रोजच शेड्युल. तुम्ही घरी पोहोचलात तेंव्हा काय पाहिलंत? असं सांगा.” शिंदेनी प्रतिमाला समजावलं

“मी प्रतिमा मकरंद देशपांडे. गोग्रास अपार्टमेंट मध्ये तीनशे तीन नंबरच्या रूमध्ये राहते डोंबिवलीमध्ये. मी चारकोपला एका कंपनीमध्ये  अकाऊंट सांभाळते. माझं ऑफीस सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपार्यंत असंत. रोज मी ऑफिसमधून जरा लवकर निघते. म्हणजे तसं आमच्या सरांनी सांगितले आहे कि त्या दिवसांचे अकाऊंट क्लियर करून मी घरी गेले तरी चालणार. मग मी जसं काम पूर्ण होईल तसं निघाते. आजपण मी चार वाजताच निघालेले. ट्रेनच्या गोंधळामुळे मला घरी पोहोचायला सात वाजले असतील. नाहीतर मी रोज सातच्या आत घरी येते. मी काही भाजी बीजी घेतली नाही. माईच खरेदी करायच्या. माई म्हणजे आमच्या नणंदबाई त्या आमच्याकडेच रहायच्या. मग त्या सगळं घर सांभाळायच्या. मला वेळ नसतो ना मग, त्याच जेवण आणि बाजारहाट करायच्या. मग मी घरी आले तेव्हा दरवाजा उघडून आत गेले  आणि.....” 

“म्हणजे दरवाजाला लॅच होतं का??” शिंदेनी प्रतिमाला मध्येच थांबवत विचारलं.

“हो. म्हणजे मी सवयीनुसार उघडला दरवाजा आणि  हो तो लॉकच होता.” प्रतिमाने सांगितलं

“हं... पुढे काय झालं...??” शिंदेनी लिहायला सुरुवात केली.

“म्हणजे मी आत गेले तर समोर माई पडल्या होत्या. सगळं रक्त-रक्त झालं होतं घरात. ऋषी तिथे किचनजवळ बसला होता. पण त्याने काही नाही केलंय. ऋषी तसं करणं शक्यच नाही..!” प्रतिमाने तिथे बसल्या बसल्या रडायलाच सुरुवात केली. 

“रडू नका. आपण ते पाहूच आता काय करता येईल ते. तुमच्या मुलाने तर कबुलीजवाब दिला आहे. त्याच्या इंट्रोगेशनमध्ये पुढचं काय प्रकरण आहे ते उलगडेल.” शिंदेनी प्रतिमाला सांगितलं

“माझा मुलगा खुनी नाहीये.” प्रतिमाने रडत सांगितलं

“तावडे मॅडम, त्या पोरीला बोलवा आणि ह्यांना बसावा तिथे. ताई चहा मागवू का??” शिंदेनी प्रतिमाला विचारलं.

प्रतिमा रडतच बाहेरच्या बाकड्यावर बसायला गेली. तिने ऋचाला मिठी मारली आणि हुंदके देऊन रडू लागली. ऋचाने तिला बाजूला केलं म्हणाली.

“मी आत जाऊन येते. बाबा आणि आई इथेच थांबा मी येते.” असं म्हणून ऋचा लेडी कॉनस्टेबल तावडेबरोबर आत निघून गेली.

“बसा. नाव.वय,काय करता सगळं सांगा. आणि काय पाहिलं ते पण सांगा.” शिंदेनी ऋचाला विचारलं

“मी ऋचा मकरंद देशपांडे. माझं वय पण एकवीस. आम्ही जुळे आहोत. मी सायाकॉलॉजी शिकते. वझे-केळकर कॉलेजमध्ये जाते. माझं कॉलेज सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत असतं. मग मी घरी येते. जेवते,  झोपते जरा पंधरा मिनिटं. मग माझा गाण्याचा क्लास असतो. मी शास्त्रीय संगीत शिकते. मग संध्याकाळी सात साडेसातपर्यंत येते.” ऋचाने सांगितलं.

“म्हणजे तुम्ही आज दुपारी घरात होता...??” शिंदेनी ऋचाला विचारलं.

“हो म्हणजे दादा आला तेंव्हा मी घरात होते. आम्ही जेवलो आणि मी क्लाससाठी निघून गेले. माई आत्या आणि दादा दोघंच होते घरात.” ऋचाने सांगितलं 

“ठीक आहे. आता जा नंतर गरज लागली तर तुम्हाला बोलावू.” शिंदेनी सांगितलं

ऋचा, मकरंद, प्रतिमा बाहेच्या बाकड्यावर बसले होते. कुणीही कुणाशी बोलत नव्हते. प्रतिमा सारखीच कुरकुर चालू होती. ऋचा आपल्याच तंद्रीत शून्यात पाहत बसली होती. मकरंदच्या डोक्यात सगळे भूतकाळातले विचार चालू होते. तो सतत एका पायाची हालचाल करत होतं. त्याच्या बॉडी लँग्वेजवरून कदमंनी ओळखले कि काहीतरी गडबड आहे. तेंव्हा ते काहीच बोलले नाहीत. त्यांना ऋषिकेशचा कबुलीजवाब घ्यायचा होता. या लोकांना डिटेल इंट्रोगेशनसाठी परत बोलवावे लागणार होते.

“शिंदे यांना गाडीतून त्यांच्या दुसऱ्या घरी सोडून या.” कदमांनी ऑर्डर दिली.

“नको साहेब, या मुलाने केली तेवढी नाचक्की पुरे आहे. पोलिसांच्या गाडीतून उतरलो तर उरलेली अब्रू पण जाईल. माफ करा माझं काही चुकलं असेल तर पण नको. आम्ही रिक्षाने जातो.” मकरंद हात जोडून बोलला.

शिंदेनी रिक्षा मागवली. ते सगळे पोलिस स्टेशनातून निघून गेले.

“शिंदे गंम्मत बघ, पोरगा आत आलाय आणि परिवार एवढा निवांत...? जसं काही हे सगळं आधी पण घडलंय. तो मकरंद देशपांडे तर एकदा सुद्धा बोलला नाही कि मी थांबतो. माझं पोलिसी इन्सटिंक्ट सांगतंय कि, या केसमध्ये काहीतरी मोठा गेम आहे. तपासाला लागा शिंदे. कळेल सगळं...!”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to प्रतिबिंब


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
अजरामर कथा
वाड्याचे रहस्य
खुनाची वेळ
श्यामची आई
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल
गांवाकडच्या गोष्टी
कल्पनारम्य कथा भाग १
विनोदी कथा भाग १