प्रत्येक गावांत लोकांचे काही तरी स्टीरीओटाईप असतातच. कंजूष पणा हा त्यातीलच एक. काही लोक महाकंजुस असतात त्यातीलच एक आपले डोंगरे आजोबा होते. ह्यांचा संपूर्ण परिवारच विचित्र होता. डोंगरे आजोबांची एक सायीकल होती जी त्यांना म्हणे हुंड्यात मिळाली होती. डोंगरे आजोबानी कधीही त्याचे ब्रेक्स वापरले नाहीत कारण वापरल्याने ते झिजले असते. ह्यांचा कंजूषपणा इतका सुप्रसिद्ध होता लोक ह्यांच्या नावांवर अनेक विनोद खपवायचे. आणि ह्यांची एकूण पर्सनॅलिटी अशी होती कि ते खपून सुद्धा जायचे.

एकदा काही कोर्ट कचेरीचा मामला होता. माझ्या वडिलांनी पुढाकार घेतला होता. काही हजार पानाचे झेरॉक्स मारून धावपळ करून सबमिट करायचे होते. त्यामुळे डोंगरे आजोबांचे काम सुद्धा माझ्या वडिलांनी केले आणि व्यवस्थित हिशोब दिला. साधारण ८०० रुपये खर्च झाला असेल. डोंगरे आजोबानी मग रिसिटस आपल्या गृहमंत्रालय म्हणजे डोंगरे आजीकडे दिला. ह्यांचा परिवार मातृसत्ताक होता. ती मग आपल्या पतींना आंत घेऊन गेली. वडिलांना वाटले ह्यांना ८०० रुपये जास्त वाटले असावेत. पण हिशोब बरोबर चोख होता. त्याशिवाय वडिलांनी आपले वाहन आणि वेळ वाया घातला होता ते वगैरे फ्री होते.

मग डोंगरे आजोबा बाहेर आले. त्यांनी कचाकचा ८०० रुपये वडिलांच्या हाती दिले. मग थोडा घुटमळत, त्यांनी "नाही हो आमची हि म्हणाली कि तुम्ही एव्हडे कष्ट घेतले आहेत. त्यामुळे काही तरी दिलेच पाहिजे. म्हणून वरून त्यांनी ५ रुपये काढून वरून वडिलांच्या हाती दिले." मी फिदीफिदी हसले. वडिलांची विनोदबुद्धी तल्लख. "अहो डोंगरे आजोबा, अश्या पद्धतीने आपले पैसे उधळणार काय ? शेजार धर्मच आहे आपला. कशाला उगाच आणि ते सुद्धा अक्खे ५ रुपये उधळायचे ? मी एक काम करतो तुम्हाला इतके मनाला लागेलच तर तुमच्या बागेंतील काही जास्वंदीची फुले घेऊन जातो.". (त्या काळी एक साधी टॉफी ५० पैश्याना मिळायची तर कोक ची छोटी बॉटल २००ml ५ रुपये होती)

वडिलांचे हे बोलणे ऐकून डोंगरे आजी मोठ्याने म्हनालया. "पहिले ? मी सांगितलेच होते तुम्हाला ५ रुपये जास्त होतील म्हणून." मग आम्ही तेथून काढता पाय घेतला.

ह्यांच्या घरी चहा मिळणे म्हणजे साक्षांत मोहिनीच्या हातून अमृत पिणे होय. चहांत ते अत्यंत कमी साखर घालत. आणि साखर डब्यातून काढताना एखाद दुसरा कण पडला ओट्यावर तर मग तो बोटाने अलगद वेचून पुन्हा डब्यांत जायचा. बरे चहाचा कप तर साक्षांत विश्वकर्माने बनवला होता. कारण तिचे अमेरिकेत मोठ्ठे कोफी मग असतात ना तसा तो स्टील चा मग. त्यांत चहा मिळेल असे पाहून बहुतेक पाहुणे "अहो नको हो इतका चहा, खूप मोठा कप आहे" असे म्हणत. पण प्रत्यक्षांत तो एक फाल्स मग होता. म्हणजे बाहेरून मोठा वाटला तरी त्यांचे बूड खूपच जाड होते त्यामुळे आंतील भाग फारच कमी वोल्युम चा होता. "अर्धा कप चहा पुरे" म्हणणारा पाहुणा मग बर्या पैकी पश्चात्तापग्रस्त व्हायचा.

जगाच्या तुलनेत हि मंडळी सुमारे १० वर्षे मागे चालायची. सर्वत्र रंगीत टीव्ही होता तेंव्हा ह्यांनी कृष्णधवल टीव्ही घेतला. म्हणजे कुणी तरी त्यांना दिला. मग रंग पाहिजे म्हणून ह्यांनी त्याला बाहेरून लाल रंगाचे ट्रान्स्परन्ट कागद लावले.त्यातून म्हणे एक रंग जास्त वाढतो.

ह्यांच्या घराचा कुत्रा, खरे तर त्या कुत्र्याने मागील जन्मांत काही महा पाप केले असावे म्हणून ह्यांच्या घरी पोचला. त्याने बिचार्याने काहीही नॉन वेग प्रकार पहिलाच नव्हता. हाडे वगैरे काहीच नाही. त्या कुत्र्याची गत अशी होती कि वाड्यावरील इतर कुत्र्यांनी त्याला वाळीत टाकला होता. आमच्या घराजवळ आला तेव्हा मुध्दाम हुन मी त्याला काही चिकन ची हाडे दिली तेंव्हा तो बिचारा आनंदाने नाचू लागला. शेवटी प्लास्टिक खाऊन मेला बिचारा. डोंगरे आजोबा पेपर आमच्या घरी येऊन वाचत. त्यांच्या मते पेपर वाले लबाड होते. विकत घेताना एक रुपये पण रद्दी ला काहीही भाव देत नाहीत. (मी अतिशयोक्ती करत नाही). मी वडिलांना अनेकदा सांगून पहिले कि ह्यांच्याकडून महिन्याला पेपर चे भाडे घेतले पाहिजे पण त्यांनी ऐकले नाही.

माणसाने काटकसरी असणे कधीही चांगलेच पण ५ पैश्यासाठी ५० रुपयांचे नुकसान करून घेणे म्हणजे मूर्खपणा हे ह्यांना समजत नसे. बागेची देखरेख करायला गडी नको म्हणून कंबरेचे दुखणे असून सुद्धा ते मारून काम करत. त्यांचा मुलगाल गोविंद आणि मुलगी विद्या दोघेही तसेच एक नंबरचे कंजूष. बस चे पैसे नको म्हणून पाच किलोमीटर चालत जात. मग कुणी फुकट लिफ्ट देतो का म्हणून पाहत. एकदा गोविंदाला हायवे वर ट्रक ने लिफ्ट दिली आणि मग निर्जन ठिकाणी थांबवून लुटले. ह्याच्या खिशांत फक्त एक रुपया. तो सुद्धा देवाला द्यायला (काही तरी मोठ्ठा नवस केला असेल). मग त्या चोराने फक्त एक रुपया खिशांत ठेवून तू तालुक्याच्या गावी गेलाच कसा म्हणून बडवले. कुठेही पाहण्यात न येणारे अल्युमिनियम चे वीस पैसे, पांच पैसे ह्यांच्या घरांत असत. देवालयाची डबी उघडून हिशोब करताना वडील मग हि नाणी मोजून डोंगरे परिवार देवळांत कितीदा आला ह्याचा हिशोब मांडता येत असे म्हणत. मग हीच नाणी घेऊन त्याच्या घरी जाऊन रुपये घेत असत.

ह्यांची सायकल दशको दशके चालत असे. त्याचे टायर झरू नयेत म्हणून फक्त गरज असेल तेंव्हाच डोंगरे आजोबा चालवायचे. घंटा कधीही वाजवायची नाही कारण जास्त बजावल्याने ती खराब होते. आमचा शानू गुराखी म्हणायचा कि हिरो सायकल कंपनीने (कंपनीचे नाव आठवत नाही, हिरो नव्हती) बातमी ऐकली कि डोंगरे आजोबानी त्यांची सायकल ५० वर्षे चालवली तर ते तातडीची मिटिंग बोलावून त्याची सखोल चौकशी करून तो मॉडेलच बंद करतील कारण सर्वच भारतीय अशी सायकल वापरू लागले तर कंपनी बंद पडेल.

डोंगरे आजोबा ३ दा वारले. दुसर्या वेळेला तर चक्क डॉक्टर ने येऊन मृत्य झाल्याची घोषणा केली होती. पण काही वेळाने हालचाल झाली. तिसऱ्या वेळेला लोकांनी जास्त काळ वाट पहिली नाही. लवकरच अंत्यविधी उरकला. डोंगरे आजोबांचे सर्व दात पडले होते. दांत बसवायला खर्च येतो म्हणून ते आपले द्रव्य आहारच करत.

ह्यांच्या कंजूष पणाचा एक फायदा होता. जगांत कुठेच न मिळणाऱ्या गोष्टी मी ह्यांच्या घरांत पहिल्या. मर्फी नावाचा रेडिओ. कोकमाच्या बियापासून करणारे सुमारे अर्धा शतक जुने तेल भिंडडेल (हे मेणा प्रमाणे असते). मग ह्यांच्या घरांत एक अत्यंत जुनी फेणीची बाटली होती. म्हणजे त्या प्रकारच्या काचेची बाटली पोर्तुगीजांनी सुद्धा पहिली नसेल असे वडील म्हणत. आणि अननसाचा हलवा. हा कितीही काळ टिकतो म्हणून एका बरणीत घालून त्यांनी तो माळ्यावर गुप्त ठिकाणी ठेवला होता. आमच्या वडिलांच्या मते ते लहान असताना सुद्धा त्या बरणीत तो हलवा होता. मला कधी खोकला वगैरे आला तर डोंगरे आजी. 'बाळ, घरी ये मी तुला चमचा भर चांगला अननसाचा हलवा देते, ठीक होईल तुझा खोकला" असे म्हणत असे. त्या भयानेच माझा खोकला दूर होत असे. कधी कधी खरोखरच जाऊन ह्यांच्या हातून काही ग्राम तरी हलवा सुटेल का अशी परीक्षा घ्यावी असा विचार होता पण विषाची परीक्षा घेऊ नये म्हणून आईने मला बजावले.

गाडी चालवायला पाहिजे ( मी परवाना वगैरे च्या नादात कधीच पडले नाही, आणि वया प्रमाणे परवाना मिळाला हि नसता) तर गाढू धुवायला सुद्धा पाहिजे हा वडिलांचा नियम त्यामुळे मी कधी कधी गाडी धूत असे. एकदा गोविंद असाच चालला होता. त्याने मी गाडी धुताना पहिले. (तो माझ्या पेक्षा किमान २० वर्षे मोठा होता). "अग ह्या गाडीची किंमत साधारण किती असेल ? " त्याने मला विचारले. मी सुद्धा खोचक पणे "गोविंद दादा, कार हे प्रकरण खूपच महाग असते बरे का, ह्या गाडीला किमान हजार रुपये पडतील" असे म्हटले. हजार रुपये ऐकूनच ह्याला भोवळ वगैरे येईल अशी माझी अपेक्षा पण ह्याने माझ्यावरच बार उलटवला. "मला ९०० रुपयांत विकतील का तुझे बाबा?' त्याने विचारले आणि मी सुद्धा "विचारून पाहायला काय हरकत आहे ? " म्हणून वेळ मारून नेली.

तर आमची बंदूक होती आणि वापर सुद्धा भरपूर होता. त्यामुळे घरांत काडतुसे असायची. पण ती महाग असल्याने आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही कधीच कुणाला लोडेड शॉटगन देत नसू. पण डोंगरे आजोबा महा कंजूस असल्याने ते कधीही काडतुसे विकत घेणार नाहीत हे ठाऊक होते त्यामुळे फक्त माकडांना "दाखवायला" म्हणून ते कधी कधी रिकामी बंदूक घेऊन जात. आपली सायकल प्रेमाने वापरणारे आजोबा बंदूक किम १०% प्रेमाने वापरतील अशी अपेक्षा होती. पण ह्यांनी किंवा गोविंद ने त्यावर प्रयोग केले असावेत. त्याच्या नळीतून ह्यांनी काय घातले ठाऊक नाही पण बंदुकीचे रायफलींग खराब झाले आणि ट्रिगर सुद्धा मोडला. मग आम्हाला खर्च आला तो वेगळा.

२०१२ साली डोंगरे आजोबाना कुणी तरी लक्स साबण दिला. (हे घरी राख लावून अंघोळ करायचे). तर त्या दिवशी ह्यांनी बाजारांत जाऊन "हल्ली वास येणारा साबण येऊ लागलाय म्हणे गावांत" असे चार चौघांना म्हटले. (डोंगरे परिवाराच्या घरी टीव्ही फक्त बातम्यांसाठी लावला जायचा, त्याशिवाय आणखीन काहीही ते पाहत नसत).

डोंगरे आजोबाना कुणी तरी एक जुना टेप रिकोर्डर दिला होता. काही सणावाराच्या दिवशी तो ते बाहेर काढून त्यांच्या कडे असणारी गणेश आरत्यांची एकमेव कॅसेट लावत. कॅसेट हा प्रकार नामशेष झाला तरी ह्यांचा तो टेप रिकोर्डर आणि ती टेप ह्यांच्या प्रमाणेच एक्सपायरी होऊन सुद्धा चालू होता. मग मी त्यांच्या घरी गेले असताना माझ्या कडे जुना आयपॉड (मिनी) होता तो दाखवला. ह्यांच्यांत साधारण ५० हजार गाणी आहेत असे मी त्यांना सांगितले. ते थक्क झाले त्यांचा विश्वासच बसेना. मग मी त्यांच्या कानाला लावून एक ५० गाणी ऐकवली. त्यांनी आपला जाड भिंगाचा चष्मां लावून खूप निरीक्षण केले आणि मग "फटावले हो मला, किती खोटारडे माणूस आहेत ? माझ्या एव्हड्या मोठ्या टेप मध्ये दहाच गाणी कशी बरे ? " त्यांच्या मते त्यांच्या टेप च्या साईझ च्या नुसार किमंत लक्षभर गाणी तरी असायला हवी होती.

चाणाक्ष वाचकांनी चष्मा हा शब्द वाचला असेल. दात न बसणवणारा म्हातारा चषमा घेतो ? तर नाही. ह्यांच्या घरांत एकच चष्मा होता आणि दोन्ही नवरा बायको आळी पाळीने तोच वापरात. आता तुम्ही म्हणाल कि एकाच चषमा दुसऱ्याला कसा बरे लागेल ? तर हा चष्मा दोघांनाही लागत नव्हता कारण तो होता आणखीन कुणाचा. उगाच चष्मा लावला म्हणून चालत नाही तो योग्य नंबर चा घ्यावा लागतो वगैरे खूप लोकांनी सांगून पहिले पण जोडपे बधले नाही. वाचता आले तर पुरेसे आहे इतकेच काय ते म्हणायचे.

कंजूष पणा इतका प्रचंड कि मुलगी लग्नाची झाली तर खर्च होतो म्हणून कुणी विशेष कार्यक्रम ना करता घेऊन जातो काय म्हणून पाहायचे. मग एक विधुराशी लग्न करून दिले. इतके गुप्तपणे कि लग्न झाल्यावर लोकांना सांगितले.

सर्व पैसे मंडळी बँकेत ठेवायची आणि एकूण बँक व्यवहारा बाबत प्रचंड गुप्तता. गांवातील पुरोहिताने तोंड लपवत लावणीला जाणे त्या प्रकारे गोविंद बँकेत जायचा. खोटे बोलत नाही. पासबुक अपडेट करून घ्यायचा. कुणीही बँक व्यवहारा बाबत काहीही प्रश्न केला तर हा पोबारा करायचा अगदी बँक कर्मचारी सुद्धा आपले पैसे चोरायला बसले आहेत अशी ह्याची समजूत. त्यामुळे फिक्स्ड डिपॉजिट वगैरे काही असते हे ठाऊकच नव्हते सर्व पैसा सेविंग्स मध्ये पडून होता.

बँक मॅनेजर विनोदाने म्हणायचा कि हि मंडळी पैसा बँकेत ठेवतात म्हणून टाटा वगैरेंना लोन मिळते. कारण ह्यांनी कधीही बँकेतून चार पैसे काढले नसावेत. मॅनेजरने एकदा त्यांना FD करा म्हणून सांगायचा प्रयत्न केला पण मॅनेजर काही तरी ठगू पाहतोय अश्या पद्धतीने त्यांनी तो विषय टाळला.

एक दिवस माझ्या वडिलांनी काही कारणासाठी लोन काढले होते. हे ह्यांच्या कानावर गेले तर डोंगरे आजी आईला सांत्वन देऊ लागल्या. आईला समजेना झाले काय.आई तिच्यावर भडकली. मग डोंगरे आजीनी आपल्या खास कपाटांतील एक अत्यंत जुने श्यामची आई पुस्तक मला दिले. "बाय वाच हो, आणि वडिलांना सांग, कर्जाच्या भानगडीत पडू नका" मी कपाळावर हात मारला.

डोंगरे आजोबांचा एक किस्सा म्हणून सांगितला जातो पण हाच किस्सा मी इतरांच्या नावाने ऐकला आहे त्यामुळे खरा नसावा. तर डोंगरे आजोबा एक दिवस बराच वेळ चालून रात्री देवळांत पूजेला गेले. अर्ध्या वाटेवर त्यांना आठवण झाली कि त्यांच्या खोलीतील तेलाचा दिवा पेटत आहे. मग तेल वाया जाऊ नये म्हणून डोंगरे आजोबा लवकर घरी आले. डोंगरे आजी थोड्या चकित झाल्या. "अहो तुम्ही एव्हड्या लवकर का आलात ?" तर मग आजोबानी कारण सांगितले. त्यावर डोंगरे आजीनी कपाळावर हात मारला "फुटके माझे नशीब म्हणून असला नवरा मिळाला. अहो तेल वाचवायचा नादांत सायकल चे टायर नाही काहो झिजले जास्त ?" त्यावर डोंगरे आजोबा सुद्धा. "खुळा समजतेस कि काय मला, मी सायकल तिथेच देवळाजवळ सोडून आलोय आता पळत जाईन, आणि हे बघ चप्पल सुद्धा झिजू नये म्हणून हातांत घेऊन आलोय"

तर असे हे कंजूष डोंगरे आजोबा आणि त्यांचे कुटुंब.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen on Youtube.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to गावांतल्या गजाली


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
झोंबडी पूल
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
अजरामर कथा
गांवाकडच्या गोष्टी
श्यामची आई
खुनाची वेळ
 भवानी तलवारीचे रहस्य
पैलतीराच्या गोष्टी
वाड्याचे रहस्य
भूते पकडणारा  तात्या नाव्ही
लोकभ्रमाच्या दंतकथा