शहराची जशी अंडरबेली असते तशीच गावाची पण असते. नाही असे नाही. लोक जास्त बोलायला जात नाहीत. आमच्या घराचे वातावरण थोडे मुक्त होते, त्यामुळे सहसा मुलांशी बोलले न जाणारे विषय सुद्धा घरी चर्चिले जात. सत्यकथा हिंदी मासिक, पोलीस टाईम्स आणि अश्या प्रकारचे प्रचंड साहित्य घरांत असायचे, (मुद्राराक्षसाचे विनोद असे सेक्शन असलेली काही जुनी मासिके होती, नाव आठवत नाही मिपाकरांना ठाऊक असल्यास सांगावे) नाहीतर शानू गुराख्याची पुस्तकें मी उधार घेऊन (त्याच्या माहिती शिवाय) मी वाचत असे. त्यामुळे डार्क ह्युमर हे अंगात मुरले होते (आहे). खून, मारामारी, बदला वगैरे गोष्टी ह्या बहुतेक लोकांना घाबरावतात तिथे मी मात्र अगदी चवीने वाचून आनंद घ्यायचे. कधी कधी वडिलांना भीती सुद्धा वाटायची. मग त्यांनी थोडी मेहनत घेऊन माझी मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न केला. मग माझ्यात एम्पथी वगैरे गुण आहेत हे लक्षांत घेऊन त्यांनी जास्त निर्बंध आणले नाहीत. त्याशिवाय बुद्धिमत्ता थोडी तल्लख होती. इथे मी स्वतःची स्तुती करत आहे असे मिपाकरांना वाटेल पण तसे अजिबात नाही. मुळांत बार अगदीच खाली होता. आम्ही ज्या शाळेंत जायचो तिथे एकूण १२ मुले इयत्ता १ ते इयत्ता ४ पर्यंत होती. त्यातील दहावी पास होणारी मी दुसरी. त्यामुळे ह्या निकषावर मी खूपच वर होते. आमच्या शाळेंत एक असा मुलगा होता जो वर्गांत दोन मोठे बेडूक घेऊन यायचा. ह्याला आम्ही "सरला का बेटा" म्हणायचो कारण त्याकाळी दूरदर्शन मध्ये आयोडीन नमक ची जाहिरात यायची त्यांत "सरलाका बेटा पता है ना ?" म्हणून एका अधू मुलाला दाखवायचे. हा तसाच होता. दर चार वर्षांनी शाळेची बाई ह्याला वेगळ्या नावाने शाळेंत दाखला द्यायची. शाळेची पटसंख्या कमी झाल्यास शाळा बंद पडेल म्हणून हा एक पर्मनन्ट मेम्बर त्यांनी केला होता. (हाच पुढे गावाचा उपसरपंच झाला, त्याची कथा वेगळी लिहीन).

गावच्या काळ्या जगताची गोष्ट वेगळी. इथे ती पाहण्याची दृष्टी पाहिजे. मारुती कांबळेचे काय झाले हा प्रश्न विचारणे सोपे आहे, उत्तर शोधणे अवघड आणि त्या शोधाच्या नादांत काय सापडेल सांगवत नाही. आणि जे सापडेल ते उत्तरा पेक्षा जास्त प्रश्न निर्माण करतील ह्याची शक्यता जास्त. "येथे सर्व रोगांचे समाधान मिळेल" म्हणून बोर्ड लावून जे लोक तंबू घालून बसलेले असतांत त्यांत शहाण्या माणसाने पाऊल ठेवू नयेच. हि कथा तशीच आहे.

तर हि कथा आहे रत्नाची. रत्ना म्हणजे नक्की काय ह्यावर मला १००% माहिती नाही कारण हिच्याबद्दल बोलायला कुणीच उत्सुक नसे. पण इतके ठाऊक होते कि हिच्या युवा अवस्थेंत ह्या स्त्रीला गावांत महाप्रचंड महत्व होते. हि देवदासी असावी असे मला आधी वाटले पण तश्यांतलाही प्रकार नव्हता. गांवात देवदासी होत्या आणि खूप म्हाताऱ्या होत्या. त्यांची मुले चांगल्या नोकरी धंद्यांत होती आणि देवदासी म्हणून ह्यांचे कर्तव्य देवालयांत काही काम करणे आणि त्या बदल्यांत ह्यांना काही विशेष मान. पण रत्ना त्यांच्या तुलनेत बरीच युवा होती. माझ्या लहानपणात ती साधारण ४२ ची असावी. आमचा ड्रायवर सांगत होता कि हि म्हणे साधारण २२ वर्षांची असताना हीच रुबाब असा होता कि हिने कुणाचा अपमान केल्यास त्या माणसाला सारा गांव वाळीत टाकत असे (प्रतीकात्मक रित्या).

तर रत्ना कुणाची तरी ठेवलेली बाई होती तिच्या तरुणपणी. "ठेवणे" म्हणजे काय ह्या विषयाचे ज्ञान चित्रपट आणि पुस्तकें ह्यातून जरी मला जास्त झाले असले तरी गावांतील ह्या प्रकारचा अनुभव पुस्तकी माहितीपेक्षा वेगळा वाटतो. पहिली गोष्ट म्हणजे कुणाला ठेवणे हि सर्वच पुरुषांना जमणारी बाब नव्हती. त्याशिवाय ठेवणे हा प्रकार थोडा fuzzy म्हणजे एकदमच, फेल्ट भाड्याने घेण्याप्रमाणे नव्हता (लहानपणी तशी समजूत होती पण नंतर सत्य पाहून बदलली). पण माझ्या लहानपणी आणि रत्नाच्या उतारवयात ती गांवातील एका प्रख्यात शेतकऱ्याच्या विमल काकांच्या घरांत राहत होती. त्याच्या आधी ती आणखीन कुणा श्रीमंतांची ठेवलेली होती. थोडक्यांत पाटलांनी घेतलेली गावाची शान नवी कोरी मारुती १० वर्षांनी कुणा पाव वाल्याने विकत घेऊन चालवावी अशी तिची अवस्था होती.

विमल काकांचा "प्रेम विवाह" हा गावची स्मिता पाटील म्हणजे दीपा ह्यांच्याशी ठरला आहे हि बातमी सगळीकडे पसरली आणि गावांत एकाच हल्लकल्लोळ माजला. दीपा हि गांवातील बलराम भाऊंच्या दुसऱ्या पत्नीची सर्वांत छोटी मुलगी. दिसायला अत्यंत सुंदर, खरेच जणू काही स्मिता पाटील. हिच्याशी लग्न करणारा माणूस खरोखरच भाग्यवान असे आमच्या घरी सुद्धा म्हणायचे म्हणे. अनेक लोकांची तिला सून म्हणून आणण्याचे प्लॅनिंग सुरु होतेच. मान खाली घालून चालणारी दीपा साधारण २० वर्षांची असेल तेंव्हा हा प्रेम विवाह झाला. बलराम दादा च्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती. कोयता घेऊन ते दीपाला मारायला गेले होते. लोकांनी बळजबरीने पकडून थोडे शांत केले. विमल काका तिच्यापेक्षा साधारण १५-२० वर्षांनी मोठे असावेत. हे सर्व प्रकरण म्हणजे गावाचे बोफोर्स प्रकरण. ह्या सर्वांची कथा आजीने मला किमान १०० वेळा तरी सांगितली असेल. वडील आणि शानू गुराखी वेगळ्या दृष्टिकोनातून हीच कथा सांगत.

बलराम दादांचा राग इतका भयंकर होता कि तो शांत करण्यासाठी गांवातील किमान दोन डझन लोक हजर झाले होते. आमच्या आजी भांबावून गेलेल्या दीपाला धीर देत होत्या. बलराम काकांची भूमिका खरी तर रास्त होती. मुलीच्या विवाहाला त्यांचा विरोध नव्हता आणि प्रेमालाही. त्यांचा विरोध होता कि आधी ह्या वयस्क माणसाचे इतक्या तरुण मुलीशी "प्रेम" जमावे तरी कसे ? आणि ज्या माणसाने घरी रत्ना बाई "ठेवली" आहे त्याच्याशी कुठल्या तोंडाने म्हणून बापाने आपल्या मुलीचे लग्न करून द्यावे ? (अशी भूमिका माझ्या आजीची. ह्या विषयावरील आपल्या नोट्स वडील आणि आजी कदाचित शेयर करत नसत त्यामुळे त्यांच्या एकमेकांच्या मतांत बरीच तफावत आहे).

गांवातील बरीच मंडळी मग ह्यांत गुरफटली. प्रत्येकाला एकच प्रश्न. ह्याचे प्रेम जमले कसे आणि कुठे ? शक्य तरी कसे होते ? आमच्या घरी सुद्धा सर्वाना हाच प्रश्न. शेवटी गांवातील वडिलधाऱ्यांनी मांडवली केली. विमल काकांनी रत्ना बाईना घरांतून हाकलून लावले पाहिजे त्यानंतरच बलराम दादा आपल्या मुलीचे लग्न करून देतील. विमल काकांनी ह्याला साफ नकार दिला आणि सर्वांच्या जखमेवर मीठ चोळावे तसे रत्ना बाई घरांत राहतीलच पण त्यासोबत सर्वांच्या नाकावर टिच्चून मी दीपाशी विवाह करिन हे त्यांनी बलराम दादांना ठणकावून सांगितले.

हा काळ स्त्री सुधाराचा होता. सर्वत्र स्त्रियांचे सशक्तीकरण वगैरे विषयांचे चर्वित चर्वण सुरु होते. प्रेम विवाह ह्या विषयावर लोक बोलत होते पण प्रकार तसा होता कमी. त्यामुळे ह्या घटनेकडे विविध राजकारणी, आंदोलनजीवी मंडळी नजर ठेवून होती. गांवातील सर्वांचेच मत ह्या विवाहाच्या विरोधांत असले तरी, बळजबरी करून हे लग्न अडवायची तयारी कुणाचीच नव्हती. मग एक दिवस दीपा सरळ विमल काकांच्या घरी राहायला गेली. मग ते कुठे तरी गेले आणि म्हणे विवाह करून आले. हिच्या गळ्यांत मंगळसूत्र आणि कपाळावर कुंकू आले. ह्याला विवाहाचे लाइसेंन्स म्हणून गावांतील महिलांनी मान्यता दिलीच.

प्रकार कितीही बेढब वाटला तरी माझ्या आजीच्या मते मुलीने दाखवलेली हिम्मत खरोखरच दाद देणारी होती. माझ्या वडिलांना ह्या सर्व प्रकरणात काही तरी काळंबेर वाटत होते. पण वर्षभर सर्व काही सुरळीत चालले. विमल आणि बलराम दादा ह्यांची कमालीची दुश्मनी झाली असली तरी गांवातील लोकांनी ह्याकडे आता दुर्लक्ष केले होते. बलराम काकांनी मुलीला पूर्णपणे वाळीत टाकले होते आणि तिच्याकडे ढुंकून सुद्धा ते पाहत नव्हते. बलराम काकांची दुसरी बायको दीपाला जन्म देतानाच स्वर्गवासी झाली होती आणि त्यांची तिसरी बायको बरीच खाष्ट होती. तिला दीपा आधीपासूनच आवडत नव्हती. त्यामुळे तिचे जास्तच फावले. दीपाचा सावत्र भाऊ सुदर्शन फारच चांगल्या मनाचा होता तो, कधी कधी गुपचूप जाऊन दीपाला भेटतो म्हणून वडिलांनी त्याची किमान एकदा तरी जबरदस्त धुलाई केली होती (म्हणे).

हळू हळू वातावरण बदलले. दीपाचा प्रचंड छळ होत असावा अशी शंका माझ्या आजीच्या मनात आली. का तर तिच्या हातावर तिला व्रण दिसायचे. आजीने जास्त चौकशी केली तर तिने सारवासारव केली. दिवसेंदिवस दीपा कृश होत होती. नक्की चाललेय काय हे कुणालाच ठाऊक नव्हते.

मग एक दिवस दीपा गायब. गायब म्हणजे हवेंतून गायब व्हावी तशी गायब. मग विमल काका सर्वत्र हिला शोधात वेड्याप्रमाणे फिरू लागले. मुलीचे तोंड मेल्यावर सुद्धा पाहणार नाही म्हणणारे बलराम दादा सुद्धा आता तिला शोधू लागले. मुलीच्या नखाला जरी धक्का लागला तर तुझा जीव घेईन म्हणून त्यांनी पुन्हा एकदा भांडणाची तोफ डागली. आधी गावांत, लोकांच्या घरी, बाजारांत, देवालयांत, जंगलात सुरु असणारे शोधकार्य विस्ताराने आता विहिरी नदी कडे पोचले.

(टीप : अनेक लोक तुमचा गांव कुठला वगैरे विचारणा करतात पण मी मुद्दाम हुन ह्यावर काहीही माहिती देणार नाही कारण एकाचे गॉसिप ती दुसऱ्याची व्यथा असू शकते. ह्या कथांतील माणसे आणि त्यांच्या व्यथा सत्य आहेत त्यामुळे त्यांची आइडेंटिटी मुद्दाम न सांगता मी ह्या कथा लिहीत आहे. काही गोष्टी विनोदी किंवा लेखिकेच्या दृष्टिकोनातून भावनारहित वाटल्या तरी प्रत्यक्षांत लोकांच्या वेदनांना माझी सहानुभूती आहे.)

मला ठाऊक नाही आपण कुणाला असला अनुभव असेल तर, पण जेंव्हा गायब व्यक्तीचा शोध विहिरीत आणि नदीत सुरु होतो तेंव्हा एक कमालीची उदासीनता आणि सावट गावांत पसरते.

धडधडत्या हृदयाने सुदर्शन, बलराम, विमल आणि गांवातील अनेक लोक प्रत्येक ठिकाणी शोध घेत होते. पण दीपा कुठेही मिळाली नाही. हे शोधकार्य बराच काळ चालले. आठवड्या नंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्याकाळी हुंडाबळी वगैरे प्रकार बरेच चालायचे त्यामुळे पोलीस सुद्धा हे विषय बराच गांभीर्याने घेत. आंदोलनजीवी मंडळी जी आधी गिधाडा प्रमाणे विषयावर लक्ष देऊन होती ती आता विमल काका वर उलटली. ह्यांनीच आपल्या पत्नीचा खून केला असावा असे आरोप करण्यात आले.

वरून कठोर असणारा बाप बलराम दादा ह्या घटनेने पूर्ण पणे खचला. ८० वर्षे जरी बलराम दादा जगला तरी एके काली खमक्या असणारा हा माणूस मला एक अतिशय गरीब आणि खचलेला म्हणून आठवतो. पोलिसांना बलराम दादा कडून काहीही विशेष सहकार्य मिळाले नाही कारण त्यांची मानसिक स्थिती प्रचंड खराब झाली होती. त्यांच्या पत्नीला दीपा मध्ये काहीच रस नव्हता. पोलिसांनी अनेक जबान्या घेतल्या केस निर्माण करण्याची खूप खटपट केली. पण दोन गोष्टी प्रामुख्याने आडव्या आल्या. पहिली म्हणजे दीपाचे शव काही प्राप्त नाही झाले. दुसरी गोष्ट म्हणजे विमल काका दीपाच्या मृत्यूने खरोखर प्रचंड दुःखी होते असे बहुतेकांच्या आणि पोलिसांच्या निदर्शनास आले.

काही वर्षांनी ह्या केस चा तपास करणारे अधिकारी आमच्या घरी आले असता मी त्यांची काही बोलणी ऐकली होती. दीपाला काही आरोग्याच्या समस्या होत्या पण विशेष काही नव्हते. घराच्या संपूर्ण झाडाझडतीत पोलिसांना काहीही विशेष पुरावे मिळाले नव्हते (त्याकाळी फॉरेन्सिक असे काही नव्हते सुद्धा). दीपा फक्त घातलेले कपडे घेऊन घरांत अली असल्याने हुंडा किंवा तिचे स्त्रीधन ह्यांचा अँगल नव्हता. पोलिसांनी दीपा आणि विमल ह्यांचे प्रेम कसे जमले ह्यावर प्रश्न केले असता विमल ह्यांनी काहीही उत्तर देण्यास नकार दिला होता. फक्त रडवेल्या तोंडाने आपले खरोखरचे प्रेम होते इतकेच म्हणे सांगितले होते. पुराव्याअभावी कोर्टाने केस रद्द केली आणि काही महिन्यातच गावांतील एका दुसऱ्या प्रतिष्ठित व्यक्तीने आपल्या मुलीचे लग्न विमल काकांशी करून दिले.

एक चांगली युवती अश्या प्रकारे गावाच्या विस्मृतीतून गायब झाली, गाडी चालवत असताना एक थेम्ब अचानक काचेवर आदळवा आणि आपण त्याला डोळ्याने ट्रेक करत असताना तो अचानक हवेत विरावा तसेच काहीतरी. संपूर्ण गावाने हि घटना विस्मृतीत घालवली.

मला हि कशी ठाऊक तर संध्याकाळी वीज गेली कि मग अश्या कथा सुरु व्हायच्या. शानू गुराखी असला तर मग तो आपल्या "थेयर्या" सांगायचं, वडील मत व्यक्त करायचे आणि आजी जणूकाही सर्व घटना तिने स्वतः पहिल्या आहेत अश्या प्रकारे सांगायची. जासूसी गोष्टींवर वाढलेल्या मला ह्या कथेचे भयंकर अप्रूप. ज्या गावांत कुठेच काही घडत नाही तिथे अशी घटना घडावी आणि त्याचा पाठपुरावा कुणीच करू नये ह्याचे एका दृष्टिकोनातून मला दुःख सुद्धा वाटत होते.

बलराम खूप वर्षे जगून वारले. मरण्याच्या काही दिवस आधी त्यांनी भ्रमित अवस्थेंत ह्या घटनेचे काही दुवे आपल्या सुनेला सांगितले. ते दीपाची कळवळीने माफी मागत होते. ते भ्रमित असल्याने सुनेला दीपा समजत होते. सून सुशिक्षित आणि शहरांतील होती आणि माझी चांगली ओळख होती. सुनेला दीपा विषयी काहीही माहिती नव्हती. मग मीच तिला मला ठाऊक असलेली हकीगत सांगितली. मग तिने सासरे जे बडबडत होते त्यातील काही दुवे सांगितले. मी ते जोडून पाहिले. मग वडिलांना काही गोष्टी सांगितल्या. मग त्यांनाही काही माहिती होती जी त्यांनी अद्याप मला सांगितली नव्हती तीही मिळाली. मग काही दुवे मी कल्पनेने जोडले. रत्नाबाई खूपच वयस्क झाल्यावर अपमानित करून त्यांना विमल काकांच्या मुलांनी हाकलले. त्याच्या भरांत आणखीन काही गोष्टी उजेडांत आल्या आणि "दीपाचे काय झाले ?" ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्या पुरते तरी सोडवले गेले.

तारुण्याच्या भरांत रत्नाबाई एका उधळलेल्या घोडीप्रमाणे होत्या ज्यांना काबूत ठेवणे त्यांच्या मूळ धन्याला सुद्धा शक्य होत नसे. मग रत्नाबाई थोड्या प्रयोगशील होत असत. आता आमच्या आधुनिक मनाला अनेक गोष्टी सुचत असतील तरी त्याकाळी नक्की काय होत असेल ह्याची फक्त कल्पनाच आम्ही करू शकतो. तर त्या काळी विशीतील रत्नाबाईची ओळख नुकत्याच मिसरूड फुटू लागलेल्या विमलशी झाली. नक्की काय झाले ठाऊक नाही पण मालक घरी नसताना ड्रायव्हर ने गाडी घेऊन आपल्या मित्रांना फिरवून आणावे तसा काही प्रकार सुरु झाला. बलराम दादा त्या काळी पत्नीविरहाने व्याकुळ आणि गुरु चंद्र युती घडावी तशी बलराम दादांची ओळख रत्नाबाईशी झाली आणि विमल त्यांतील महत्वाचा दुवा होता. हि सर्व माहिती कुणालाच नव्हती कारण रत्नाबाईचे मूळ धनी त्या काळी बरेच शक्तिशाली असावेत आणि हा सर्व मामला गुप्त राहावा ह्यांत सर्वांचेच हित असावे. नाहीतर गावांत असल्या भानगडी सर्वानाच ठाऊक होतात.

बलरामदादांनी तिसरे लग्न केले आणि त्यांची गरज संपली. रत्नाबाई वरची मूळ धन्याची मर्जी गेली असावी आणि आणखीन काही आता प्रौढ झालेल्या विमल ने मग बिनदिक्कत तिला घरी आणले. बलराम दादांना वाटले असेल कि प्रकरण संपले. पण गोष्ट तिथे थांबली नाही. बलराम दादांची बेडरूम मधील बरीच माहिती रत्नाबाई आणि विमल दोघांनाही होती. त्यातील काहीतरी माहिती वापरून मग विमल ने दीपाशी सूत जुळवले. बलराम दादांचा प्रचंड संताप हा लग्नापेक्षा कदाचित मुलीला नक्की काय करावे लागेल ह्यांत होता पण दुसऱ्या बाजूला हे अवघड जागीच दुखणे होते.

विमल, रत्नाबाई आणि दीपा ह्यांच्यांत त्यांच्या घरांत काय होत असावे ह्याची कदाचित खूपच जास्त कल्पना बलराम दादांना होती. आपली कन्या गायब झाली तेंव्हा त्यांना खरेतर खरोखर विमलकाका वर प्रचंड संताप, सूड वगैरे भावना निर्माण झाल्या पाहिजे होत्या पण एक तर दीपा शरमेने पळून गेली असावी किंवा तिचे अपघाती निधन झाले असावे हे त्यांना कळून चुकले.

आमच्या वडिलांच्या मते दीपाचा मृत्यू अपघाती मृत्यू होता. दीपा मेल्यानंतर विमल आणि रत्ना प्रचंड घाबरली असावीत. विमल आणि रत्ना ह्यांनी पूर्वाश्रमीच्या बरीच कनेक्शने केली असल्याने त्यातील एक कनेक्शन वापरून त्यांनी दीपाचे शव पूर्णपणे गायब केले. (शानू गुराख्याच्या मते दीपाचे शव कोटणिसांच्या पडक्या वाड्यातील चौकीत पुरले गेले आहे.) बदल्यांत त्या कनेक्शन ने आपली लग्न न झालेली थोराड पोरगी विमलच्या गळ्यांत काही महिन्यांनी बांधली आणि बरेच पैसे उकळले.

पोलिसांच्या तपासणीत ह्याच कनेक्शन ने हिरीरीने भाग घेऊन पोलिसाना विविध पुरावे वगैरे देण्यासाठी पुढाकार घेतला होता. केस संपल्यानंतर कनेक्शन ने आपलीच पोरगी ह्याच्या गळ्यांत बांधली हे ऐकून पोलीस अधिकारी सुद्धा चक्रावला होता.

माझ्या मते विमल, रत्ना, बलराम किंवा दीपा ह्यांच्यापैकी कुणीच वाईट किंवा कुकर्मी असे नव्हते. काहीतरी "विकृती" असावी ज्यांच्या आहारी सर्वच मंडळी असावी आणि दीपाचा मृत्यू ह्या प्रकारांत अपघाती पद्धतीने झाला असावा.

किंवा कदाचित मी इथे ओव्हरथींक केले असावे.

वाचून आवडली तर प्रतिक्रिया द्या. विशेषतः खालील प्रश्नाची उत्तरे पाहिजेत.

- लेखिका कथा स्वतः भोवती विणते हे आवडते कि आवडत नाही ? (म्हणजे कथेंत लेखील स्वतः आणि स्वतःच्या परिवाराला काही स्थान देते)
- ह्या कथांतील लोकांची वाताहत झाली. ह्याबद्दल लिहून ह्या लोकांचा अनादर होतो असे वाटते का ? कि अश्या न बोलल्या जाणाऱ्या घटना बद्दल लिहिले तर "नाही चिरा नाही पणती" प्रकाराने ह्या लोकांना एक प्रकारची श्रद्धांजली प्राप्त होते ?
- लिहीत असताना मी लेखन स्वातंत्र्य घेऊन गोष्टी अतिरंजित केल्या किंवा स्वतःचा मसाला घातला तर ते योग्य ठरेल का कि निव्वळ सत्याशी प्रामाणिक राहून लिहावे ? (अर्थांत कायदेशीर दृष्टिकोनातून कथा, कथेतील पात्रें आणि स्थळे आणि जागा सर्व १००% काल्पनिक समजाव्यात)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to गावांतल्या गजाली


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
झोंबडी पूल
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
अजरामर कथा
गांवाकडच्या गोष्टी
श्यामची आई
खुनाची वेळ
 भवानी तलवारीचे रहस्य
पैलतीराच्या गोष्टी
वाड्याचे रहस्य
भूते पकडणारा  तात्या नाव्ही
लोकभ्रमाच्या दंतकथा