"अहो ऐकलंत का? राहूलचा डबा नेऊन देता का जरा कंपनीत?"


"का राहूलने नेला नाही डबा?" शरदरावांनी विचारलं.


"अहो आज कूळधर्माचा साग्रसंगीत स्वयंपाक. तो इतक्या सकाळी कसा होणार? आणि आज राहूलच्या कंपनीचे चेअरमन येत आहेत म्हणून राहूल सकाळी सातलाच गेलाय कंपनीत."


"ठीक आहे. देतो मी नेऊन."

शरदरावांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि ते कपडे घालण्यासाठी आतमध्ये गेले.

पुष्पाबाईंनी सुटकेचा निःश्वास सोडला.


शरदराव तयार झाले म्हणजे त्यांचा आणि राहूलचा झालेला वाद त्यांनी ऐकला नव्हता. वाद कसला, राहूलचं नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांवर आगपाखड करणं आणि पुष्पाबाईंचं नवऱ्याची बाजू घेणं. विषयही तोच 'वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही.'


"आई माझ्या मित्राचे वडीलही शिक्षक होते, पण किती मोठा बंगला बांधलाय् बघ. नाहीतर नाना! अजूनही आम्हांला भाड्याच्या घरात ठेवत आहेत."

राहूल तावातावाने बोलत होता.


"राहूल तुला माहीत आहे की नाना घरात मोठे. त्यामुळे दोन बहिणी आणि दोन भावांची लग्नं त्यांनाच करावी लागली. शिवाय तुझ्या बहिणींची लग्नंही त्यांनीच केली. आपल्या शेताच्या कोर्टकचेऱ्या सुरू होत्या. अशा सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. कुणी पार पाडल्या त्या?"


 "काय उपयोग झाला त्याचा?त्यांचे भाऊबहीण बंगल्यात राहात आहेत. कधीतरी वाटतं का त्यांना की आपला भाऊ आपल्यासाठी खस्ता खाताना साधं घर बांधू शकला नाही तर आपण त्याला घर बांधून द्यावं?"


क्षणभर पुष्पाबाईंना काय बोलावं ते सुचलं नाही. मग म्हणाल्या,

"तुझ्या वडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं. भावाबहिणींकडून कधीही अपेक्षा बाळगली नाही."


"बरं ते ठीक आहे. हजारो मुलांच्या त्यांनी ट्युशन्स घेतल्या. त्यांच्याकडून जर फी घेतली असती तर आज नाना पैशात लोळले असते. आजकालचे क्लासवाले पाहा. इंपोर्टेड गाड्यांत फिरतात."


"हे तू बरोबर म्हणतो आहेस. पण नानांचं तत्त्व होतं, ज्ञानदानाचे पैसे घ्यायचे नाहीत म्हणून. या त्यांच्या तत्त्वामुळेच तर ते किती प्रसिद्ध होते. किती पुरस्कार मिळाले आहेत त्यांना कल्पना आहे तुला?"


ते ऐकताच राहूल एकदम संतापला. "काय चाटायचे आहेत ते पुरस्कार आई? त्या पुरस्कारांनी घर थोडीच बांधता येतं? पडले आहेत धूळ खात!कोणी विचारत नाही त्यांना!"


तेवढ्यात दार वाजलं. राहूलने दार उघडलं तर शरदराव उभे होते. वडिलांनी आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना या भीतीने राहूलचा चेहरा उतरला. पण शरदराव न बोलता आत निघून गेले आणि तो वाद तिथंच संपला.


शरदरावांनी सायकलला डबा अडकवला आणि भर उन्हात ते औद्योगिक वसाहतीतल्या राहूलच्या कंपनीकडे निघाले. सात किलोमिटरवरच्या कंपनीत पोहचता पोहचता त्यांना चांगलीच धाप लागली होती. कंपनीच्या गेटवर पोहचल्यावर सिक्युरिटी गार्डने त्यांना अडवलं.


"राहूल देशपांडेंना डबा द्यायचा होता. जाऊ का आत?"


"आता नाही देता येणार.." गार्ड म्हणाला, "चेअरमनसाहेब आलेत. त्यांच्यासोबत मिटींग सुरू आहे. कोणत्याही क्षणी ते मिटींग संपवून बाहेर येतील. तुम्ही बाजूला थांबा. चेअरमनसाहेबांना तुम्ही दिसायला नको."


शरदराव थोड्या दूर अंतरावर उन्हातच उभे राहिले. आजूबाजूला कुठेही सावली नव्हती. थोडा वेळ म्हणता म्हणता एक तास उलटून गेला. पाय दुखायला लागले म्हणून शरदराव तिथेच एका तापलेल्या दगडावर बसणार तोच गेटचा आवाज आला. बहुदा मिटींग संपली असावी.


चेअरमनसाहेबांच्या पाठोपाठ अधिकारी आणि त्यांच्यासोबत राहूलही बाहेर आला. उभ्या असलेल्या वडिलांकडे पाहून तो मनात चरफडला.


चेअरमनसाहेबांनी गाडीचं दार उघडलं आणि बसता बसता त्यांचं लक्ष शरदरावांकडे गेलं. गाडीत न बसता ते तसेच बाहेर थांबले.


"ते समोर कोण उभे आहेत?" त्यांनी सिक्युरिटीला विचारलं.


"आपल्या देशपांडे साहेबांचे वडील आहेत. जेवणाचा डबा द्यायला आलेत." सिक्युरिटीने घाबरल्या आवाजात सांगितलं.


"बोलवा त्यांना."


नको ते घडलं होतं. राहूलच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. संताप आणि भीतीने डोकं फुटेल असं त्याला वाटू लागलं.


सिक्युरिटीने आवाज दिल्यावर शरदराव जवळ आले. चेअरमनसाहेब पुढे होऊन त्यांच्याजवळ गेले.


"तुम्ही देशपांडे सर का? डी.एन. हायस्कूलमध्ये तुम्ही शिक्षक होता?"


"हो. तुम्ही कसं ओळखता मला?"


काही कळायच्या आत चेअरमनसाहेबांनी शरदरावांचे पाय धरले. सगळे अधिकारी आणि राहूलही ते दृश्य पाहून अवाक् झाले.


"सर, मी अमित अग्रवाल. तुमचा विद्यार्थी होतो. बघा तुम्ही मला घरी शिकवायला यायचात."


"हो. हो. आठवलं. बाप रे बरेच मोठे झालात की तुम्ही..."


चेअरमन हसले. मग म्हणाले, "सर तुम्ही इथे उन्हात काय करताय? चला आतमध्ये बसू. खूप गप्पा मारायच्यात तुमच्याशी. सिक्युरिटी तुम्ही यांना आत का नाही बसवलंत?" सिक्युरिटीने शरमेने मान खाली घातली.


ते पाहून शरदरावच म्हणाले, "त्यांची काही चूक नाही. तुमची मिटींग चालू होती. तुम्हांला त्रास नको म्हणून मीच बाहेर थांबलो."


"ओके... ओके...!"

चेअरमनसाहेबांनी शरदरावांचा हात धरला आणि ते त्यांना आपल्या आलिशान चेंबरमध्ये घेऊन गेले. "बसा सर." आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत चेअरमन म्हणाले.


"नाही. नाही. ती खुर्ची तुमची आहे." शरदराव गडबडून म्हणाले.


"सर, तुमच्यामुळे ती खुर्ची मला मिळालीय्. तेव्हा पहिला हक्क तुमचा."


चेअरमनसाहेबांनी बळजबरीनेच त्यांना आपल्या खुर्चीत बसवलं.


"तुम्हांला माहीत नसेल पवार सर.." जनरल मॅनेजरकडे पाहत चेअरमन म्हणाले, "देशपांडे सर नसते तर आज ही कंपनी नसती आणि मी माझ्या वडिलांचं धान्याचं दुकान सांभाळत बसलो असतो."


राहूल आणि जी.एम. दोघंही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले.


"शाळेत असताना मी अतिशय 'ढ' विद्यार्थी होतो. कसाबसा ढकलत शाळेने मला नववीपर्यंत आणलं. शहरातल्या सर्वोत्तम क्लासेसमध्ये मला टाकलं गेलं. पण मला शिकण्यातच गोडी नव्हती. त्यातून श्रीमंत बापाचा लाडका लेक. दिवसभर शाळेत माऱ्यामाऱ्या करायच्या. आणि संध्याकाळी क्लासेस चुकवून मुव्ही पाहायच्या हे माझे उद्योग. आईला ते सहन होईना. त्या वेळी देशपांडे सर कडक शिस्तीचे आणि उत्कृष्ट शिकवणारे म्हणून प्रसिद्ध होते. आईने त्यांच्याकडे जाऊन मला शिकवण्याची विनंती केली. पण सरांच्या छोट्याशा घरात बसायला जागा नव्हती, म्हणून सरांनी नकार दिला. आईने सरांच्या विनवण्या केल्या आणि आमच्या घरी येऊन शिकवायची विनंती केली. मागाल ती फी देण्याची तयारी दाखवली. सरांनी फी घ्यायला नकार दिला पण आढेवेढे घेत घरी येऊन शिकवायला तयार झाले. पहिल्या दिवशी सर आले. मी नेहमीप्रमाणे खोड्या करायला सुरुवात केली. सरांनी मला चांगलं बदडून काढलं. मी मुकाट्याने बसायला सुरुवात केली. तुला सांगतो राहूल पहिल्याच आठवड्यात मला अभ्यासात गोडी वाटायला लागली. नंतर तर अभ्यास केल्याशिवाय मला करमायचं नाही. सर इतके छान शिकवायचे इंग्लिश, गणित, सायन्स हे विषय जे मला कठीण वाटायचे ते खूप सोपे वाटायला लागले. सर कधी आले नाहीत तर मला अस्वस्थ वाटायचं. नववीत मी वर्गात दुसरा आलो. आईवडिलांना खूप आनंद झाला. मी तर हवेत तरंगत होतो. दहावीत मी सगळे क्लासेस सोडले आणि फक्त देशपांडे सरांकडे शिकू लागलो. आणि दहावीत मेरीटमध्ये येऊन मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला."


"माय गुडनेस...! पण सर मग तुम्ही सरांना तरीसुद्धा फी दिली नाहीत?" जनरल मॅनेजरनी विचारलं.


"मी आईवडिलांसोबत सरांकडे पेढे घेऊन गेलो. वडिलांनी सरांना एक लाखाचा चेक दिला. सरांनी तो घेतला नाही. सर त्या वेळी काय म्हटले ते अजूनही माझ्या लक्षात आहे. ‌सर म्हणाले, 'मी काहीही केलेलं नाही. तुमचा मुलगाच हुशार होता. मी फक्त त्याला मार्ग दाखवला. आणि मी ज्ञान विकत नाही, मी ते दान करतो'. नंतर मी सरांच्या मार्गदर्शनाखालीच बारावीत परत मेरीटमध्ये आलो. पुढे बी. ई. झाल्यावर मी अमेरिकेत जाऊन एम.एस. केलं. आणि आपल्याच शहरात ही कंपनी सुरू केली. एका दगडाला सरांनी हीरा बनवलं. आणि मीच नाही तर सरांनी असे असंख्य हिरे घडवले आहेत. सर तुम्हांला कोटी कोटी प्रणाम...!!"


चेअरमनसाहेबांनी डोळ्यांत आलेलं पाणी रुमालाने पुसलं.

‌"पण कमालच म्हटली पाहिजे. बाहेर शिक्षणाचा आणि ज्ञानदानाचा बाजार भरलेला असताना एक रुपया न घेता हजारो विद्यार्थ्यांना शिकवणं, नुसतं शिकवणं नाही तर त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणं. व्वा सर, मानलं तुम्हांला..." शरदरावांकडे पाहत जी. एम. म्हणाले.


‌"अहो सर, ही माणसं तत्त्वनिष्ठ होती. पैशाची, मानसन्मानाची भुकेली नव्हती. विद्यार्थ्यांचं भलं व्हावं हा एकमेव उद्देश असायचा." चेअरमनसाहेब म्हणाले.


"माझे वडिलही त्यातलेच. 'एक वेळ उपाशी राहू, पण धान्यात भेसळ करून विकणार नाही' हे त्यांचं तत्त्व होतं. आयुष्यभर त्यांनी ते पाळलं. सचोटीचा व्यापार केला. त्याचा फायदा आज माझ्या भावांना होतोय."


‌बराच वेळ कुणी बोललं नाही. मग चेअरमननी शरदरावांना विचारलं, ‌"सर, तुम्ही घर बदललंय की त्याच घरात राहता?"


‌"त्याच जुन्या घरात राहतोय् सर!"

‌शरदरावांऐवजी राहूलनेच त्यांचं उत्तर दिलं. त्या उत्तरातील वडिलांविषयीची चीड चेअरमनसाहेबांच्या लगेच लक्षात आली.


‌"ठरलं तर मग. सर आज मी तुम्हांला गुरुदक्षिणा देणार आहे. याच शहरात मी काही फ्लॅटस् घेऊन ठेवलेत. त्यांतला एक थ्री बीएचकेचा फ्लॅट तुमच्या नावावर करतोय सर...!"


‌"काय्य?" शरदराव आणि राहूल एकाच वेळी ओरडले. ‌"नको नको. एवढी मोठी गुरुदक्षिणा मला नकोय." शरदराव निग्रहाने म्हणाले.


‌चेअरमनसाहेबांनी शरदरावांचे हात हातात घेतले. ‌"सर, प्लीज.. नाही म्हणू नका आणि मला माफ करा. कामाच्या व्यापात तुमची गुरुदक्षिणा देण्यात मी खूप उशीर केला."


‌मग राहूलकडे पाहत त्यांनी विचारलं, ‌"राहूल तुझं लग्न झालंय?"


‌"नाही सर, ठरलंय. पण जोपर्यंत मोठं घर होत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही अशी सासरच्यांची अट होती. त्यामुळे अजून तारीख नक्की केली नव्हती आणि हाॅलही बुक केला नव्हता."


‌चेअरमननी फोन उचलला. कोणाशी तरी बोलले. मग समाधानाने फोन खाली ठेवून म्हणाले. ‌"तुमच्या मंगल कार्यालयाचं काम झालं. सागर लाॅन्सं माहित आहे ना?"


‌"सर, ते तर खूप महाग..."


‌"अरे, तुला कुठे पैसे द्यायचे आहेत? ‌अरे, सरांचे विद्यार्थी सरांसाठी काहीही करू शकतात. सरांनी फक्त शब्द टाकायला हवा. पण सर तत्त्वनिष्ठ आहेत ते तसं करणार नाहीत. या लाॅन्सचा मालक सरांचाच विद्यार्थी आहे. त्याला मी शब्द टाकला. नुसता हाॅलच नाही, तर जेवणासकट संपूर्ण लग्नच लावून द्यायची जबाबदारी त्याने घेतलीय... तीही मोठ्या आनंदाने. तुम्ही फक्त तारीख सांगा आणि सामान घेऊन जा."


‌"खूप खूप धन्यवाद सर!" राहूल अत्यानंदाने हात जोडत म्हणाला.


‌"धन्यवाद मला नाही तुझ्या वडिलांना दे राहूल! ही त्यांचीच पुण्याई आहे. आणि मला एक वचन दे राहूल, सरांच्या अंतिम श्वासापर्यंत तू त्यांना अंतर देणार नाहीस आणि त्यांना दुखावणार नाहीस. मला फक्त कळू दे तू त्यांना त्रास देतो आहेस. या कंपनीतून तुला डच्चू तर मिळेलच पण अख्ख्या महाराष्ट्रात तुला कुठे नोकरी मिळणार नाही याची मी व्यवस्था करीन." चेअरमन कठोर आवाजात म्हणाले.


‌"नाही सर. मी वचन देतो तसं होणार नाही." ‌राहूल हात जोडत म्हणाला.

‌संध्याकाळी राहूल घरी आला तेव्हा शरदराव पुस्तक वाचत होते. पुष्पाबाई जवळच भाजी निवडत होत्या. राहूलने बॅग ठेवली आणि शरदरावांचे पाय धरले.


‌"नाना, मी चुकलो. मी तुम्हांला वाटेल ते बोलत होतो. मला माहीत नव्हतं नाना तुम्ही इतके मोठे असाल."


‌शरदरावांनी त्याला उठवून छातीशी धरलं.


‌आपला मुलगा का रडतोय हे पुष्पाबाईंना कळेना. पण काहीतरी नक्कीच चांगलं घडलयं म्हणून तर बापलेकात प्रेम उमळून आलंय हे पाहून त्यांचेही डोळे अश्रूंनी भरून आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to प्रेरणादायी गोष्टी 5


चिमणरावांचे चर्हाट
खडका कोथिंबिरीची गोष्ट
त्या वळणावरचा पाऊस
खलील जिब्रानच्या निवडक कथा
ठकास महाठक
धडा
आत्मविश्वासाने भाषण कसे कराल?? महत्वाच्या टिप्स
भूतकथा भाग १
बाधा
दुष्टाचे औदार्य
तुम्हाला तुमची स्वतःची ओळख करुन घ्यायचीय का?
प्रेरणा
टाईम ट्रॅव्हल - द बिगिनिंग
प्रेरणादायी गोष्टी 8
काश्मीर प्रिन्सेस विमान दुर्घटना : सत्यकथा