परस्त्रीचे हो पाईं जिवाची खोरी होइल तत्क्षणास । चांडाळ कोण दुर्जन करील अभिलाष ? ॥धृ०॥

गुजरण चंद्रवदनी नार । चंद्र गवळी तिचा भ्रतार । त्याच्या द्रव्यासी नाहीं पारावार । पांचशा गवळ्यांचा सरदार ॥चाल॥ त्या पांचश्या गवळ्यांचीं वेगळीं घरं । आणीक गाईम्हशींचीं खिल्लारं । संगें घेऊनिया दलभार गेला चाकरी । घरीं टाकुनी चंद्रवदनी प्रियकर प्यारी । धन्य ईश्वराची कळा कीं चांगुलपण, तिला रूप दिलें भगवंतानं । तिच्या स्वरूपाचें पडे चांदणं राजमंदिरीं । जशी परी रूपसुंदरी ल्याली अलंकार उशन (?) वसन भरजरी । कटि कसुन पिवळा पितांबर नेसुन कीं पदर सावरी । बुट्टेदार कंचुकी ल्याली सुबक जरतारी । लखलखाट चमके ज्वाहार, गळ्यामधिं शोभे चंद्रहार । आणिक जडिताचा करून शिणगार करून परोपरी । माथां मुदराखडी कळाकुसरी । कानीं करंजफुल, बाळ्याबुगडया, हातामधिं तोडे, गोठपाटल्या । पायींही पदी तोरडया ल्याली गुजरी । अनवठ बिचव्याचा झनकार नाद किलकारी । सांडुन शिरीं भवराची छाया (?) सासुला म्हणती घेऊनी या या । जाते दहि दूध विकाया उदापूर नगरीं । दहा पांच मिळून आम्ही जातो नगरच्या नारी । ती सासु म्हणे गुजरीस, ‘नको जाऊं उदापुर नगिरास । तिथें उदेभान राजाचा पुत्र मवास’ ॥१॥

गुजरण चंद्रावदन राजस कह्या प्राणीणा (?) झाली उदास । तिनें जायाचा घेतला सोस । उदापूर नगरी कच्ची सहा कोस ॥चाल॥ दह पांच मिळुन गजघाट शिरीं घेऊन दह्याचा माठ । येऊन पोहचला एकच ताट उदापुर नगर । चवकांत मारी किलकारी गुजरीनार । आठपेठा गल्लोगल्लीं, दही घ्या म्हणून सांगू लागली । तिच्या स्वरूपाची मात काकली गेली दुरवर । दुररस्तो जमला  थाट पहाती जनसार । वाणी उदमी दुकानदार आणिक मोठाले सावकार । लागली जखम काळजापार, झाले कीं चुर । गपगपा झाकले नेत्र पाहतां नूर । जग म्हणती, अरे भगवंता, अशी निर्मिली सुंदर ही कांता, नार गवळ्याची ही पतिव्रता रूपसुंदर । धन्य धन्य प्राणी असला इचा भ्रतार । राजदरबारीं पोहचली मात अशी एक गुजरी आली शहरांत । तिला पाहून या पडली भ्रांत नको घरदार । ऐकून राजपुत्रास धरवेना धीर । हालकार करून तयार बोलावून आणिली गुजरी नार । तिचें रूप पाहुनिया अनवार राजकुमार । ‘दह्यासहित ज्यानीचें मोल बोल करार । आम्ही सौदागर व्यापारी सौदा करूं चाल महालास । जें मागशिल तें देऊं, नाहीं खुमास’ ॥२॥

गुजरण म्हणे रे राजाला, ‘ऐका । सव्वा लाख दह्याचा पैका । बोल ऐकून लागला चुरखा । ज्यानीचें मोल सांगूं काय मूर्खा ॥चाल॥ आहे पातिव्रत्या माझा धर्म सांगते तुला । धर कांहीं शरम, अशा गोष्टीनें भोगशिल कर्मघात जीवाला । तूं येकुता येक पुत्र आहेस राजाला । ईश्वरी दया तुजवरी सातीजणी स्त्रिया राजमंदिरीं कीं जैशा सिंहलद्वीपच्या परी विषयभोगाला । आग लगो, हे परद्वार व्हावें कशाला । जळो जळो हें चांगुलपण कशाला दिलें भगवंतानं । संचिति काय लिहिलें ब्रम्ह्यान कळेना मजला । हें संकट कसें ओढवलें, सांगूं कोणाला । आतां सांगते, गोष्ट कर जतन करावी नार जीवाला घतण, अशा गोष्टीनें पावले पतन, मुकले प्राणाला । हें पुरतेपणीं शोधुन पहावें मनाला । लंकापति रावण, पहा तयाची गती झाली कोण । राज्य बुडविलें, सीतेच्या पायीं कुळक्षय झाला । कीचक द्रौपदीला लुब्ध झाला जीवासी को नांव बुडवील पतिव्रतेस डाग लावील त्याचा कुलक्षय होईल जाइल भंगाला । इंद्राला पडली भगें सर्व अंगाला’ । अशी बोलुन गुजरी नार निघून चालली मुळ ठायास । ऐकून जखम लागली राजपुत्रास ॥३॥

राजा म्हणे, ‘ऐक नारी, तुजवर नाहीं करीत बळजोरी । खुशीचा सवदा करुं परद्वारीं । तुला सोन्यामधिं मढवीन सारी ॥चाल॥ नारी, ऐक सांगतो तुला, बोल येकदां करूं दे सल्ला तुझ्या ज्यानीचा पाहूं मासला चाल एकांतीं । मला चैन पडेना, फेड मनाची भ्रांती । बहु रोजी स्वीकि (?) रूपरंग पाहुन झालों मनामध्यें दंग, तुझा आमचा भ्रांती । बहु रोजी स्वीकि (?) रूपरंग पाहुन झालों मनामध्यें दंग, तुझा आमचा घडेल कधिं संग ? वाटती खर्‍याती (?) तूं नको करूं अनमान चतुर गुणवती । रूप स्वरूप तुझी ही काया । सांडून प्रेमसुखाची छाया येक दिवशीं अंतीं जाइल वाया होइल माती । ही दोन दिवसाची जानी ही नवनवती । तूं सोडून अवघी लाज तर काय होशील आमची भाज । या नगरीचं करिशील राज्य संगातीं । पट्टराणी करीन, छत्र धरीन तुजवरतीं । हें पुरतें पहा शोधून मनाला, मग तूं कर मान्य वचनाला । साती स्त्रिया लावीन सेवेला तुझ्या ग दिनरात्रीं । मम संगत अवघे भोगावी संपत्ती । तूं चांगुलपणांत राजसवाणी काय गवळ्याची घरजिनगाणी । जंगलवस्ती कोण्या ठिकाणीं कंटक रहाती । तिथें कैचें सुखसोहळे विलास होती’ । नाना परी बोधिली ऐके ना झाली उदास । मग उतावळपणीं तिला जाऊन धरली पदरास ॥४॥

गवळण म्हणते, ‘राव राजींद्रा । विनंती ऐका सुखचंद्रा । तुला काय कमी आहे भाग्येंद्रा ? । सोड जाऊं दे, नको धरूं पदरा ॥चाल॥ माझे संगातणीं पहातील वाट, ओसरुन जाईल अवघा हाट, शिरीं धरला दह्याचा माठ, काय करूं याला ? दिनमान होइल अस्तमान घरीं जायाला । किती बोलू वारंवार ? अरे मूर्खा कांहीं धर सुमार, किती सांगशील तरी पडीभार गोष्टी मजला । आग लागो तुझे धनद्रव्याला, हवें कुणाला ? । तुझ्या घरीं राजसंपत्ती महाल मुलुख सर्वयु (?) पर तियाची बिशाद संगूं काय तुजला । माझ्या घरीं निवंता नाहीं धनद्रव्याला । तुझ्या घरीं हत्ती घोडे लाव लष्कर पालखी पागा दास चाकर । माझ्या घरीं गाई म्हशींचीं खिल्लारं गणीत नाहीं त्याला । हिर्‍याची लागली खाण, कोण पुसतो माणिक-मोत्याला ? । तुझ्या पट्टराण्या सातीजणी तशा माझ्या दासी कुणबिणी नित्या राबती सदा निशिदिनीं घरकामाला । मी जशी राधा गोकुळीं तसे सुख सोहळे भोगी त्याला कर्दनकाळ माझा भ्रतार । पांचशा गवळ्यांचा सरदार राजदरबारीं कुल अखत्यार । त्याचा बोलबाला तुजसारखे चाकर आहेत सेवेला’ । अशी ऐकून लागली जखम राजपुत्राला हा जिव गेला तर जाऊं हात लावीन इच्या मालास ॥५॥

तिला बळजोरी हस्तकीं धरलीं । परसद्वारीं नेऊन बसविली । चंद्रवदनी मनीं घाबरली । पाव गिरिजापति, लज्जा हरली ॥चाल॥ रोजना पदरा । भयभित झाली, कापे थरथरा । प्रवास कठीण आहे ईश्वरा, बरी गत नाहीं । वनांत जशी व्याघ्रानं अडविली गाई । भक्त कैवारी शंकर भोळा करुणा आली कणवला । झाला सुवर्णाचा कावळा आला त्या ठायीं । भगवान तिनं वळखला लागली पायीं, मग नेत्रीचें अंजन काढी, पत्र लिहिलं बहु तातडी । कावळ्यापुढें ठेविली घडी, धांव ह्या समयीं । प्राणपति मला भेटवी आणुन लवलाही । पत्र घेऊन काग उडाला एक दिवसांत, जाऊन पोहचला पत्र दिलें चंद्रगुजराला वाचून पाहीं । समजला सर्व वर्तमान बसल्या ठायीं । त्या घडी करून तयारी भर मजलीची करून स्वारी येऊन पोहचला उदापुर नगरीं सकळ शाही । शहरामधीं नाकेबंदी केली ठायीं ठायीं । पांचशे गवळी घेऊन संगें चंद्रगुजर येउनि अंगें रायापुढें होउनि नि:संग बोलला कांहीं । ‘निर्वाण गुजरीसाठी करीन लढाई’ । चंद्रहंस बोलावून आणला राजसभेस । जाऊं दे सोड गुजरीला, नको लावू दोष ॥६॥

मग बोले राजकुमार ‘गवळ्या, पहा पुरता सुमार । गुजरी नाहीं तुला देणार, लखाखित आहे खड्‌गाची धार ॥चाल॥ तीन हातांचा नेम निर्धार । ज्याची फत्ते होईल समशेर । त्यांनी न्यावी गुजरी नार घराकारण’ । असा सभेमधीं बोलला राजनंदन । खड्‌ग घेऊन अतिलवलाही म्हणे, ‘अरे गवळ्या, सावध होई’ हातामधिं हात मारले घाई करुन संधान । तीन हात ढालेवर चुकवले गवळ्यानें । गवळी उठतां पडली भ्रांत एक हातांत करावा घात येऊन गुजरीनें धरला हात ‘द्यावा सोडून । हा एकुलता एक पुत्र राजाकारण’ । उदेभाग राजा-नृपती चंद्र गुजराची करी विनंती, ‘बरी आज मेहेर केली मजवरती दिलें जिवदान । ही गुजरी माझी कन्या गुणनिधान’ । त्याला पोशाख दिला भरजरी । मोत्या-पवळ्यांनी ओटी भरी, करी बोळवण । त्या दिवशी मुक्काम केला बागामधीं जाऊन । गुजरी गेल्यावर राजपुत्रास लागला ध्यास । अदघडी पडेना चैन झाला उदास ॥७॥

गेला घेउन गुजरी नार । लागली जखम काळजापार । फुंद आवरेना विषय अनिवार । प्राण द्यावया केला निर्धार ॥चाल॥ गेला उठुनी माडीवर अंगामधिं घातलं बखतर, तेला मधीं भिजवून सारं अग्न पेटवला । धडधडा चेतूं लागला, कंठ सोकला । मग येउन सदरेम्होरं पहाती अवघे लहानथोर, म्हणती राज्य बुडविले घर, प्राण सोडिला । नगरामधीं अकांत झाला कहर वर्षला । प्रेत पुत्राचें पाहून नयनी शोक बहु केला मायबापांनीं । ‘बरी ईश्वरा केलीस करणी, कुलक्षय झाला । हा पुत्र नव्हें दुष्मान, यानें कसा वाद साधिला’ । राजकुमार मृत्यु पावला, बातम्या गेल्या चंद्रगुजराला । गुजरीसहित परतुनि आला. राजसभेला । म्हणे, ठीक नाहीं झालें, आग लागली दर्याला’ । मग चंद्रगुजर समजून चित्तीं । बोले गुजरी, ‘तयाच्या संगें जावें सति । सांगतों तुजला, जनामधिं लौकिक होइल सांगायला’ । तिला जायाची आज्ञा दिली पतिचरणास येउन लागली, मग संसारीं उदास झाली पदर टाकिला । तिनें जाउन मांडी दिधली त्याच्या उशाला । नगराबाहेर केली खायी सातीजणी स्त्रिया आल्या त्या ठायीं त्यामधीं आठवी गुजरी पाही । करी गलबला । रामराम बोलूं लागली त्या वेळेला । उडी घालति येउन एक एक रडति अवघे नगरचे लोक दु:खामधीं बहु झाला शोक पाहे काय त्याला (?) या विषयापायी बहुजण मुकले प्राणाला । दादू गोपाळा कवी मोरू मोती अण्णाजी म्हणे, राज्य दिलं उदेभानानं चंद्रगवळ्याला । सात जन्म भ्रतार पुढें होइल गुजरीला । कवी विठ्ठल गुणीजन म्हणे ऐक चतुरास । पुतळीने कथा सांगितली भोज राजास । पर अस्त्रीच्या हो पाईं जिवाची खोरी होईल तत्क्षणास ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत