मैत्र मोत्याची जात, जिवा विश्रांत, बोले हरघडी । मैत्र समयाच्या पारीं घालितों उडी ॥धृ०॥
तुम्ही ऐका चित्त देउनी, स्शिर होउन बसा । एक थोडासा दृष्टांत आठवला कसा । एका राजाची कन्या, तिचें नांव गजरा आली भररसा । चांगुलपणा रंभा पुतळी जैशी उर्वशा ॥चाल॥ त्या राजाची कुवरा कीं गजरा नार । सोळा वर्षांची उमर, रूप दाणेदार । नेसली पैठणी साडी, तुटती तार । अंगीं किनखापाची चोळी जरी-जरतार । कपाळीं लाविली टिकली कुंकाची कोर ।
वेणीत गुंफित साज पक्का शेर । उभी होती रंगमहालांत, तळीं बाजार । तो वाण्याचा मुलगा आपल्या दुकानावर । तो मदनाचा पुतळा कीं पाहुनी डोळा झाली वेडी ॥१॥

त्या राजाच्या कन्येनें उचलून खडा टाकिला दुकानावर । हळु हळु बोले वचन कीं गजरा नार । म्हणे वाण्याचा नंदन खडा राव आला कुणीकुन पाहे चवभवता । गपगपा झाकले नेत्र वरती पाहातां ॥चाल॥ ती राजकन्या त्याला खुणवी स्पष्ट । आज यावें रंगमहालांत, करावी खेट । खुण एकतांच वाणी कापे लटपट । फिरून धरी अवसान हिय्या बळकट । होती मुजर्‍याची गडबड कचेरी घनदाट । मग भवता पाहुन तसाच शिरला नीट । ताळा ताळांच्या चारी वेंघला वाट । होती गजरा नार, जाऊन धरी मनगट । तो सर्वांगीं बैसून मनासी मन गेलें मिळून टाकी पलंघडी ॥२॥

एक प्रहर रात्र झाली, रयत गेली, उठले राव । ‘काय करिते आमुची गजरा नयनीं पहावें ’। लावली होती कवाडं, चाले झडकरी सत्यभाव । ‘तूं माझे गजरा लेकी, कवाड उघडावं ’। पित्याचा शब्द ऐकून ‘बरं नाहीं झालं, कसं करावं ?’ । त्या वाण्याच्या काळजानें सोडिला ठाव ॥चाल॥ अशी शंभर वर्षं पूर्ण मुदत भरली । त्या झरुक्याच्या बाहेर होती झगली । लावली कीं झरुक्या, तिथंच लपण केली । मग कवाड उघडून पिता घेतला महालीं । गुजगोष्टी सांगतां पित्यासी निद्रा आली । कांहीं केल्यानें जाईना, मनीं दचकली । होता मार्गेश्वराचा महिना, थंड पडयेली । थडथडा उडे, अंगाची काय गत बनली । त्या भुजंगशेट वाण्याची सुदबुद गेली । देवाचें स्मरण करितां बुद्ध आठवली । त्या खांबाला पागोटयाची वेठी घाली । मग तसाच उतरून दुसर्‍या ताळीं उडी घाली । त्या खांबाला शेल्याची वेठी घाली । मग तसाच उतरून तिसर्‍या ताळीं उडी घाली । त्या खांबाला पंचाची वेठी घाली । मग तसाच उतरून चौथ्या ताळीं उडी घाली । त्या खांबाला काचाची वेठी घाली । मग तसाच उतरून पाचवे ताळीं उडी घालीं । पाय टाकुन धरणीवर चाले तातडी ॥३॥

मग झाला प्रात:काळ, मेळामेळ जनलोकांचा । वर पाहूं लागले झगरा पांघरूणांचा । लोक म्हणती, ‘कोण चोर धीट मनाचा ?’ । एक म्हणतो, ‘पोशाग भुजंगशेट वाण्याचा’ ॥चाल॥ अशी गुणगुण गेली राजाच्या कानीं । शिपाई धाडिले चवघे चव ताळांनीं । कचेरीपुढेम त्येला आणिला बांधोनि । न पुसतां त्याचें शिर द्यावें उडवुनीं । कचेरीपुढें त्येला आणिला बांधोनि । न पुसतां त्याचें शिर द्यावें उडवुनी । त्याच्या जवळ होता बाप, होइना धनी । राज्याप उभा प्रधान कर जोडोनी । ‘भरल्या पोटीं मारावा जेवूं घालोनी’ । आई देत असे शिव्या मनीं तळपुनी । कोण जेवुं घालील याला ? पीडा आम्हांला घरबुडीं ॥४॥

अस्त्रीच्या (?) अरे, तूं पुढें नको येऊं । तुझें मरण आलें जवळी आतां नको भिऊं । गेला बहिणीच्या घरला, ‘ऐक सत्यभामे, घाल तूं जेऊं’ । तेव्हां बहिण म्हणे, “तोंड नको आम्हांला दावुं’ । गावामधिं सखेसोयरे लागला राव घरोघर पाहूं । जन बोलत फटफट, जाचणी बहु ॥चाल॥ सोईरे समस्तांनीं अपमान केला । ते मांग म्हणती ‘सावकाराच्या मुला । काय तुझें जिणें ! कोणी जेवूं घालिना तुजला’ । ‘या गावामधिं एक मैत्र राहिला । त्याच नाव जाखु शिंपी, माहित सर्वांला । त्यासी भेटायासी आमचा हेतु राहिला’ । ते मांग घेउन गेले त्याच्या घराला । ते म्हणती ‘तुजला आणिला भेटायाला’ । गेला घरांत, फुटका थाळा ऐवज निघाला । वाण्याच्या इथं नेऊन शिधा आणिला । स्वयंपाक करून दोघे बसले जेवायाला । कसा काय झाला वृत्तांत सांग तू मजला । येकुणेराच्या पडती गळा, रडती खळाखळा जीवाचे गडी ॥५॥

तुझा नाहीं साधला, लाग, जाऊं कचेरीसी । दोघे मैत्र मिळून गेले राजापाशीं । ‘कर जोडून विनंति ऐका राजेश्वरी गोष्ट थोडीशी । गरिबाचा करावा न्याय, होईल मन खुशी ॥चाल॥ हा सावकाराचा मुलगा तुमचा अंकित । आहे बाळपणापुन याची आमची प्रीत । पायापुढें करितो अर्जी, येक रात । गुजगोष्टी सांगतां पुरेल आमुचा हेत’ । त्या दरबारामधिं कुटाळखोर होत । ‘काय जामीन घेतां पाहुनी याची शपष ?’ । ते मांग म्हणती ऐका हो श्रीमंत । ‘या सावकाराचं गावांत धनवर गोत । कोणी जेऊं घालीना, पडला त्यावर वक्त । तुम्ही द्यावा सोडुन, आम्ही जामीन होत’ । दिला मुचिलका लेहून, आला घेऊन जिवाचा गडी ॥६॥

तुला सांगतो मनसुबा नको रे उभा जाय म्हालासी । नाहीं भोगिली सुंदरा जीवाला मुकशी ॥चाल॥ तसाच उठला तांब्या घेतला हातीं । मग लगबग लगबग गेला लोहार घराप्रती । ‘एक सवा शेर खिळ्यांची करून दे गणती’ । लोक झाले सामसुम काळोखे रातीं । ठोकित चालिला खिळे सफेली वरती । ती गजरा नार चवथ्या ताळीं होती । ‘ऊठ ऊठ गजरे, तुला चढली सुस्ती’ । तवा गजरानार सावध होऊन बसती । चहुकून समयाच्या सारिल्या ज्योती । त्या वाण्याच्या नवतीचा रसकस घेती । म्हणे, ‘गजरे, झालों मरणाचा सांगती, आहे आम्हां तातडी’ ॥७॥

अरे भगंवता, तुला कशी येईना कनवळा ? । मैत्रीचें दु:ख आंठवुन पडली गळा । ‘तुझ्याकरितां मी मरणाचा सोहळा’ ।चाल। मग निरोप घेतला त्यानें त्या समयीं । उतर उरतो खिळ्यावरून, पहा चतुराई । उपटोनि खिळे डबर्‍यामधिं खवी । असे चारी ताळ उतरून आला लवलाही । शिंप्याशीं म्हणे ‘बरी सांगितली सोई’ । गुजगोष्टी सांगता उदय झाला रवी । मग मांगाची राव झुंड आली त्या ठाई । ते मांग म्हणती ‘चोर आमुचा आणुन देई’ । तवा शिंपी सावकाराच्या मुलास दावी । चालविला रस्त्यांतून जनलोक पाही । त्या पाणवटयाच्या नारी  म्हणती ‘अगबाई आतां वधिल पुतळा या रांडेच्या पायीं’ करती वढाताडी ॥८॥

मांगानं दिली तस्ती, बहु घाबरला । मैत्राचें दु:ख पाहुन शिंपी गहिरवला ॥चाल॥ तो सावकार म्हणे, ‘मैत्रा जा घरास । हें आमुचं दु:ख, आम्ही भोगूं सावकाश’ । तेव्हां शिंपी म्हणूं लागला त्या मांगास । ‘मैत्रासी वाचवा, कापा माझ्या मानेस’ । हा वर्तमान गेला गजरेच्या कानास । केला मर्दाचा पोशाक त्या समयास । हातीं समशेर ढाल दिली मुंढयास । उतरली माडी, तळीं आली पागेसस । सजविला घोडा त्यावरी बैस । घोडा उडवीत उडवीत उडवीत आली त्या ठायास । त्या लोकाला म्हणती पैस । काय दोघांच्या शिरीं आपेश कापितां नरडी ॥९॥

मांग घेऊन आले दरबारीं, ‘ऐका राजेसरी । हा वाण्याचा मुलगा तुमचा कीं हो चोर’ । शिपाई म्हणे, ‘ऐसे सांगतां राजा ग्रंथ होईल थोर । हा शिंपी वाणी आहे कीं मईतर’ ॥चाल॥ ‘दोघांसी वाचवा, कापा माझी मान’ । जन म्हणती, ‘हा शिपाई कुठला कोण ? । दोघांकरिता हा कां आपला देतो प्राण ?’ । राज्याप उभा प्रधान कर जोडून । ‘एकाकरितां तिघांचा कां घेता प्राण ? । फेडाल हा अपराध द्याल उसनं’ । राजानें प्रधानाचा मान्य करून त्या तिघा जणासी त्यानें दिलें सोडून । गंगु हैबती मजलशीं गातो गान । राजाराम सभेमधिं डफ झोडी ॥१०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत