पती वयानें लहान, सखे मनसमाधान होइना ।
कधिं ग चंडाळ पुढें घेइना ॥धृ०॥
भुइंत चालला दिसंदिवस, मज वरणभात भासतो ।
न्याहाळितां लपुन बैसतो ।
शोढ करून रंगमहालीं नेतां ह्रदयांतरिं त्रासतो ।
पदरचा काय माल नासतो ? ।
निजविलें जर बळानें जवळी तरि वरवर ठाशितो ।
उराचा काल (?) गाल चावितो ।
मी तारुण्यपणामधिं पठ्ठी ।
पाडास आलि ग निंबोटी ।
सख्यावर मर्जी खट्टी ।
पहाटीं पहाटीं येउन निजतो, दु:ख मला साहिना ॥१॥
हौस मनामधिं बहुत राहिली, वृथैव जातें वय ।
वाटतें सासुदिरांचे भय ।
नपूंसकाशीं लग्न लाविलें, बापआई निर्दय ।
साधिलें वैर, नाहिं संशय ।
खाते पिते उदंड, होते करून सर्वी हयगय
राहिलें दुरचे दुर, हाय हाय ।
मी कर्माची पुरती हीण ।
कोणाचें न घेतां रीण ।
पती पाहतां होतो शीण ।
तरुणपणाची कलकल भारी, मरण देव देइना ॥२॥
दूध गाईंचें खुराक लाउन दंड काढवी बळें ।
कधिं ग प्रत्ययास येतिल फळें ? ।
व्हावि चेतना म्हणून ठिवली पक्षियातिचीं कुळें ।
जसा मीन, आमली (?) उदकीं गळे ।
चैन पडेना, जाति पलंगीं वर्ष ठिकाणीं पळे ।
सुचेना कांहीं विषयामुळें ।
कामातुर होउन पडे ।
नित पलंगावर तडफडे ।
जिव जातो, कर्मा रडे ।
दु:ख येवढें होउनि पुढाइत, दाद कुणी देइना ॥३॥
किती दिवस तरी धीर धरावा ? पती जन्मवर असा ! ।
आलि खुब भरास नवती रसा ।
पाहुन उराकडे पाणी गळतें डोळ्यांतुन पसपसा ।
धरिन मी हात कुणाचा दिसा ।
गंगु हैबती म्हणे, साजणी, अधर्म करसी कसा ? ।
मनाला तरि दे दिलभरवसा ।
महादेव कविची तर्‍हा ।
पदरचना ज्याची शिरा ।
गुणिराज कवीश्वर पुरा ।
म्हणे प्रभाकर, ऐक साजणी, कां मनोरथ पुरविना ? ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत