नूतन आकृती आलबेली छेलछबेली ।
पाहुन बळें झडीं पडून संगत केली ॥धृ०॥
पदरीं द्रव्यसंचय कांहीं पाहिला नाहीं ।
सदगुणावरून रत झाले मी तुमचे पाईं ।
मी केली असेल असलाई कमअसलाई ।
तुमचें मन तुम्हांस देतच असेल ग्वाही ।
अंतर मजपुन सहसाही न घडलें कांहीं ।
अरे प्राणसख्या, या गोष्टीस साक्षी विठाई ।
अति सुकुमारा, नाजुक पुष्पाच्या झेल्या ।
बसुन एकांतीं नाना परी क्रिया केल्या ।
विसरल्या कैशा ? कांहींच न शेवटा नेल्या ।
एकांतीं ह्रदयीं कवळितां कळा कुशळता दाखविल्या ।
मी तव वचनाची भुकेली स्नेहाची मेली ॥१॥
पहिले दिवसीं चित्त न मिळतां मग मनीं सरली चंचळता ।
गेले दिस छळतां ।
या उपर येऊं लागला दिवस मावळता ।
तिळतिळरात्रा जाती तळमळतां, आतां कां छळतां ? ।
बळकट धरले पदरासी, आतां कुठे पळतां ? ।
उगेच रागें मजवरी तुम्ही तरी कां हो भरतां ? ।
असा काय अन्याय तुमचा तरी केला म्या हो ? ।
उभे कां बाहेर ? बरे वजेनें घरामधिं या हो ।
आज कुणीकडे मर्जि उदेली ? ॥२॥
गुणिजना तूं गुणिजनराव्या, प्राणविसाव्या ।
उभयतां द्वैत कल्पना मनांत नसाव्या ।
या इथल्या स्त्रिया कळलाव्या अतिसदभाव्या ।
परिचयावरून त्या पुरतेपणी मज ठाव्या ।
या गोष्टी श्रवण कराव्या, जीवीं धराव्या ।
समजून उमजून त्यांच्या मैत्रिक्या कराव्या ।
चतुर तुम्ही असोन सर्वज्ञ, गुणांची राशी ।
असुन रात्रंदिस सेवेसी उभी तुजपाशीं ।
नसून अपराधी, मजवरी रुसून कां जाशी ? ।
यामागें करून पाहिली बहुत बदफैली ॥३॥
मुख न पाहिल्या मनिं झुरते, घोकण्या करिते ।
वरखालीं पाहुनीया तुमच्या मरणीं मरते ।
मजिनेंच भाषणें करितें, भिऊन आचरितें ।
सांगितली गोष्ट चित्तापसुन जीवीं धरते ।
घार होऊन भवतीं फिरते, पाय नित्य स्मरते ।
तुम्ही आपलें मजला वेड लावलें पुरतें ।
अलिकडेतुमची अति ममता पातळ झाली ।
द्रष्टपण सोडा आज, उठा, चला रंगमहालीं ।
बसुन येकांतीं उभयतां आनंदाखालीं ।
अंग भिजविन आणुन सुगंध तेल चमेली ।
म्हणे होनाजी बाळा, लक्ष्मी सजेली ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत