राजपुत्र अति चतुर आकाशीं जैसा गभस्ती ।
बहुत सखीसीं प्रीत राहिला गंगातीर वसती ॥धृ०॥
सर्वगुणसंपन्न बत्तीस लक्षणी राजपुतळा ।
राजचिन्हमंडित सुशोभित ऐश्वर्याची कळा ।
आचारशीळ अतिपवित्र जैसा अग्नि नित्य सोवळा ।
धीर उदार विशेष, अखंडित वसे ह्र्दयीं कळवळा ।
सर्व उपाधीरहित निर्मळ प्राशुन गंगाजळा ।
शचिर्भुत तैसाची प्रतापी पुण्य आगळा ।
पहा सूर्य़वंशीचा सिंधु जसा हरिश्वंद्र अयाध्येपुरी ।
केवळ शांतीचा सिंधु जाणता सर्व कळाकुसरी ।
निष्कलंक त्याची राणी सुलक्षणी, चतुर बहुत मंदिरीं ।
आनंदमय अंतरीं उभयतां चित्तासी स्वस्ति ॥१॥
एक चित्त, एक प्राण, दोन देह असा उभयताचा धडा  ।
सखी सुवर्ण आंगुठी, सखा तिजवरिल हिर्‍याचा खडा ।
स्वरूपवान दोघेहि घालती एक एकावर झडा ।
सन्मुख झरुक्यामधें नेत्रसंकेत करिती क्रीडा ।
पुर्व वेश पालटोनी हिंडती रात्रीं ग्रामीं निधडा ।
गुप्तची मवजा पाहाती, दोहीचा एक मनांतिल वढा ।
लघुपत्र केकती सखी, सखा गुलचेमन हाजारी सिरा ।
शिरीं कलगी आणीक सिरपेच चमकतो, वर मोत्यांचा तुरा ।
कानीं चौकडा, कंठीं हार पाचुचा दिसे साजरा ।
सखा हिरकणीचा हिरा चाले प्रीतीच्या सीरस्ती ॥२॥
कोणी येक दिवसीं अलोलिक गोष्टीचा ताला ।
उभयतास वाटलें म्हणुन सारीपाट मांडीला ।
तशा येकांतामधें उभयतां पण आचुक केला ।
पतीस सुंदर म्हणे, “पणीं जर जिंकीलें तुम्हांला ।
तरी मग गंगाजळिं तुम्ही स्पर्शावें हो स्तनाला ।”
पती जिंकीलीया हाच सखीचा निश्चये पण ठरला ।
पण करून खेळता डाव सखीनें पाहा अवचित जिंकीला ।
हासुन म्हणे स्वामीला, “स्तना स्पर्शा आपुले हास्ती” ॥३॥
गंगाजळी स्पर्शावें स्तनाला ही खचित बोली ।
कसें स्पर्शावें जनादेखतां अशी मसलत पडली ।
येके दिसीं स्नानासी सुंदर गंगाजळी शिरली ।
दहा वीस सखीयांमधें कटाईत ती उभी राहिली ।
राजपुत्र चतुरानें बातमी आधिंच होती ठेवली ।
दूर जाऊनिया आपण बुडि मग गंगेमधि दिधली ।
भवत्या सख्यास न कळता सखी अंगुष्टी दाबिली खरी ।
खुण समजताच आखड सखी बसली जळा भीतरीं ।
स्पर्शून स्तनास दाहावीस हातावर निघुन आले बाहेरी जी जी ।
फारच खुषी अंतरीं सख्याकडे सखी पाहुन हासती ॥४॥
अशी पाहुन चतुराई सखीच्या आनंद चित्तासी ।
तेव्हां नेत्रसंकेतें खुणवी अपुले स्वामीसी ।
इतुकें झाल्या कृत्य आले आपुल्या रंगमहालासी ।
नाना परी पक्वान्नें पाक सदनीं निर्मुन खाशी ।
आनंदांत प्रीतिनें उभय बैसले भोजनासी ।
भोजन झाल्या समयीं आले येकांत मंदिरासी ।
हिरवा करून पोशाख उभये बैसले मंचकावरी ।
घालोनी मुखामधें विडे विनोदें रमती नाना परी ।
विद्वान गुणसंपन्न होता एक पुरुष गंगातीरीं ।
होनाजी बाळा म्हणे, बरी चतुराई उघड दिसती ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत