“राजबनसी बावरे मुशाफर तुम्ही कुठुन आला जी ? ।
झोपेच्या बहरांत, लाल बागांत गर्क झाला जी ॥धृ०॥
वारुसहित देखिली नवलपरीची नवीन मुद्रा हो ।
शालजोडी अंथरुन सुखाची वर केली निद्रा हो ।
मी होउन निर्लज्य काढिले मुखावरिल पद्रा हो ।
आशावंत मन झालें पहावया तुमच्या मुखचंद्रा हो ।
नवी उमेद कोवळी दिसती वय चौदा पंध्रा हो ।
कोण वक्त शिरीं म्हणुन प्रवास आलेत राजेंद्रा हो ।
कोणे देशीं राहणार खासगत वस्ती कोणे ठिकाणीं ? ।
घेउन मुशाफर वेश निघाला टाकुन आपली राणी ।
फार कठिण परदेश, परस्थळीं रांडा मोठया तुफानी ।
मोंहुन बर्‍या जिवलगा तुम्हाला घालतील घाला जी ॥१॥
म्हणे मुशाफर, “आम्ही सुंदरी पंछी परदेशी ग ।
फार भिउन चालतों, नसो रत परके सेजेशीं गे ।
करून खुशामत अमुची आपले मंदिरास नेशी गे ।
वखत गुजरल्या शिरीं सखे मग तूं अंतर देशी गे ।
येउं खरे येकदां तुझ्या सदनासी निश्चयेसी गे ।
यावर मग परंतु माघारें लाव प्रतिज्ञेशीं गे ।
आम्ही येकले पंछी, आमचा कोण इथें आहे वाली ? ।
शोध करुनिया पाहे सखे तु नको फिरूं भवतालीं ।
त्या आधींच बाहेरल्या सांगितल्यास स्त्रियांच्या चाली ।
याउपरी साजणी पाहे पुरता तालामाला हो ॥२॥”
“म्या न केले व्रतनेम, होता ईश्वर पुजिला पूर्वी हो ।
म्हणवुन अशी लाभली मूर्ति मजला तुमची बरवी हो ।
उभी विनविते निर्लज्यपणें मी केवळ निस्पर्वी (?) हो ।
नको तुम्हांव्यतिरिक्त मला धनमालाची चरवी हो ।
संग करिन येकदां, हेच म्या केली जोडी सर्वी हो ।
परिस झगडतां लोहा लागतां तो सुवर्ण करवी हो ।
अंत:करणापासुन मी सर्वस्वें तुम्हांस राजी ।
बहुत वेळ झाला आतां, तुम्ही सत्वर चला, उठा जी ।
राहुन रात्रेची रात्र इच्छा तृप्त करवी माझी ।
पहा वसंत नवतीचा ना फार मानी गुलाबा हो ॥३॥
म्हणे मुशाफर, “ऐक सुंदरी, तूं प्रतिष्ठ भार्या गे ।
गोवुनिया वचनांत दावशिल ममतेचा पर्या गे ।
बाट स्त्रियाची जात, बहुत साबध अपुल्या कार्या गे ।
कवटाळणी पहा कशा नाहीं जोडा तुमच्या धैर्या गे ।
आम्ही येकले गडी, तुम्ही दिसती चंचळ चर्या गे ।
देऊन भाक इमान पाडशील फशीं करून क्रिया गे ।
आम्ही मुशाफर रमते केवळ येक वचन भावार्थी ।
पडूं नये पडली गाठ तुझी या ठायीं सखे ज्या अर्थीं ।
नेउनीया रंगमहालीं सखये पाहे, नको होउं परती ।”
होनाजी बाळा म्हणे, लुब्धलें मन तव स्वरुपाला हो ।
बापु गुणीचे गुण नित्य नूतन सर्वत्राला हो ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत