“तुझी प्रीत असे प्राणविसाव्या, आली सुसमयीं घडुन ।
जोडा एकसारखा, गेली हिरकणी कोंदणी जडुन ॥धृ०॥
“आपला जोडा एकसारखा हें एकांतीं बोलसी ।
परंतु जिवाची खूण सांगतों आम्ही आतां तुजपशीं ।
चतुर स्त्रिया मैत्रांच्या सखये फार चुकविती मशीं ।
पडल गांठ अवघ्यांची येकदा, युक्त सांग कांहीं अशी ।
नको कल्पना धरूं परस्त्री अम्ही मानतो कशी ।
ही अंतरची खूण साजणी तूं अवघी जाणशी ।”
“पति कायावाचामनें कोणा कारणें ।
कां हो प्राणसख्या, पहातां त्याचीं लक्षणें ? ।”
“सखी विषयविलासीं कामिने, करुन साधनें ।
मोहिले पतिस त्यांनीं आपल्या सदगुणें ।
म्हणवून राजअंगणें जाती मीपणें ।
त्यावरुन तयांचा मला गर्व हरवणें ।
मोठा निजध्यास चित्त त्याकडे । सारा वेळ मला चैन ना पडे ।
जेव्हा इतक्यास इच्छिले घडे । तेव्हां निरसेल आमचें सांकडें ।
रात्रीं स्वप्नांत उभ्या मजकडे । यालागीं विचार कोणता गडे ? ।
अगदींच झालों भ्रांत, करी निभ्रांत आम्हां तुजकडून” ॥१॥
“प्राणसख्या प्रियकरा उभी सन्मुख जोडल्या करीं ।
स्वधर्म माझा हाची करावी सेवा आजन्मावरी ।
मला आज नाह्याशी सख्या ! जायाचे परके घरीं ।
तिथें जमा होतील हो तुमच्या मैत्रांच्या सुंदरी ।
पालखींत मी बसेन सख्या, तुम्ही धर तबकडी करीं ।
सैरंध्रीच्या वेषें चला तुम्हि मजसंगें सत्वरी ।”
ऐसें म्हणता सजली केवळ बिजली । शृंगार भूषणें अंगावर घातलीं ।
ती कर्ण फुलें चांगली कर्णि शोभलीं । मुक्त लडा मोती नक्षत्रें भासलीं ।
शिरीं टोप घालितां बरी अपूर्व दिसली ।
केकती मुद राखडी केसामाधिं गोंविली ।
बरवा वेणीचा साज आगळा । कुहिरी मच्छकच्छ आणि आवळा ।
शोभे तन्मणी तेजस्वी गळा । कंठा मोत्याचा घाली आबळा
गजरे हातीं, रुळ चरणीं धुळधुळा । वाजे चालतां कुंभि स्थळा ।
अशा प्रकारें नटुन सिद्ध स्वारीस उभी गडबडुन ॥२॥
चरणी चाली चालाया सिद्ध शिबिकेची धरून तबकडी ।
पालखींतल्यापेक्षां खुभसुरत बनली फाकडी ।
इष्कीयार सावकार होते शहरांत छबेले गडी ।
तनमन होउनी तिला दृष्टी पाहतात उठुन घडिघडि ।
“मी बोलन पालखीआंतुन तुशि सैरंध्रे आवडी ।
पुढला विचार सांगन चित्तापुन तुजला घडोघडि ।
मी उटणें तुमचे हतीं लावविन पती ! ।
मग पूर्ण करा राजे विच्छा असेल चित्तीं ।”
हा नेम करून निश्चिती हो शीघ्रगती ।
पालखींत आपण, सैरंध्री पायीं चालती ।
“ही नविच कोण दिसती ?” अवघ्या पुसती ।
“माहेराहुन धाडिली मज सेवेप्रती ।”
असें सर्वत्राला बोलली । वेगीं नाहावया आपण बैसली ।
जवळी सैरंध्री बोलावली । फरमास मग तिजला सांगितली ।
“उटणें सर्वांगाशीं लावी चांगली ।” तेव्हां तिनें हारसे व्हये भरियली ।
“आज्ञा प्रमाण तुमची मजला, उभी कासोटा भिडुन” ॥३॥
सखी म्हणे सखीयासी, “आहे ही अमक्याची अंतुरी ।
बरेवजे हिशी उटणें लावी सैरंध्री सुंदरी ।”
‘आज्ञा प्रमाण तुमची’ म्हणून मग उटणें घेउन करीं ।
ह्रदयावर हात फिरवुन फिरवुन ते कुचाग्र कुस्करी ।
ऐसी म्हणत करून उटणें तिशी लाविल्यावरी ।
दुसरी ऐना होती मांडी तिची स्वहस्तें चुरी ।
आपुले हातीं घेउनी फणी ते शुभलक्षणी ।
शृंगार नभीं तळपताती सौदामिनी ।
स्वरूपें कोमळ कांता गोजिर्‍या ।
अवघ्या चातुर्य गुणें बहु बर्‍या ।
भाळीं कुंकाच्या रेखुन चिर्‍या । येकापेक्षां येक बनल्या चिर्‍या !
उमतीमधिं नटचंचल बावर्‍या । कोणासी वश न व्हाल खर्‍या ।
परंतु अपुले कुच चुरविले तुम्ही सैरंध्रीकडून ॥४॥
भोजनशाळेंमधिं सुवासिक पक्वान्नें निर्मिलीं ।
घालुनिया रांगोळ्या, पाट मांडून पात्रें मांडिलीं ।
दिवाणखान्यामधें बिछाइत अति अपूर्व घातली ।
भोजन झाल्यापाठीं मंडळी त्या संन्निध बैसली ।
सर्वांची स्वामिनी हळुच मग हास्यवदन बोलली ।
“जळो चतुरपण तुमचें ! नाहीं सैरंध्री अजुन वळखली ! ।’’
सैरंध्री वेष पाहुनी खोचल्या मनीं ।
खालीं पाहता अवघ्या लज्जित होउन मनीं ।
या वेव्हारालागुनी, रात्र ते दिनीं ।
राहिली मागली चार घडि जाणुनी ।
मग सर्वांची स्वामिनी ते शिबिकासनीं ।
बैसली, सांगतें सैरंध्री कामिनी ।
आपल्या सदनांत येउन पोचली । दोघे चित्तामधिं आनंदली ।
हर्षें सखि धरियेली । येकांता ह्रदयीं कवटाळली ।
“इच्छा त्वा बरी आमुची पुरविली ।” घ भावुली तुला प्रसवली ।
हे जोडी निर्मिली विधीनें लक्षामधिं निवडुन ।
होनाजी बाळा म्हणे, प्रीत चातुर्य उभयतांकडून ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत