कसें फुटलें प्रारब्ध ? कोपला हरिहर मजवरता ।
ऐन भरामधें आले तों सखये, गत झाला भर्ता ॥धृ०॥
मजप्रमाण धुंडितां स्वरुप या सृष्टीवर नव्हतें ।
सुखामधें चांगली पतिसवें आजवरी होतें ।
कशि कोणाची लागली दृष्ट माझ्या सौभाग्यातें ? ।
दैव भंगुनि कसें आलें ग बाई मरण भ्रतारातें ? ।
धनतर माझे गोत, आतां तें काय असुन नुसतें ! ।
पतिरत्न हरपल्यावरी नारीस कोण पुसतें ? ।
तें पहा कुठुन माझ्याच आलें संचितीं ।
मी केळ जळाले दु:खाग्नीचे संगतीं ।
बाई नाहीं ग शुभ अधिकार अतां मजप्रती ।
बसतां निचिंत मज हवा वाटतो पती ।
मग आपले स्तन मी चुरते आपल्या हतीं ।
मन आशावंत, विषयावर माझी प्रिती ।
चांगला पुरुष पाहताम्च सहभागती ।
म्हणवेना होइल कीं काय चंचळ वृत्ती ।
परिणाम शुद्ध लागेल कोणत्या रिती ? ।
गेले असते सती, न केला आधीं विचार पुरता ॥१॥
मुकले सौभाग्यास तेजहीन स्वरुपावर आलें ।
नाहिं कपाळीं कुंकु, विशोभित चंद्रवदन झालें ।
वैधव्याचें दु:ख या दैविं कुठुन लिहिलें ? ।
पतिवरची मीच अगोदर कां ग नाहिं मेले ? ।
निराश्रित मज टाकुन अक्षयि प्राणपती गेले ।
असें दुर्धर हें पाप पूर्वजन्मिं मी काय केलें ?
त्याचेंच हें फल प्राप्त भोगणें मशीं ।
सार्‍याच गोष्टिनें पहा नाडलें कशी ?
‘पति पति’ म्हणत रडतां जाते दिननिशी ।
मासोळि जळाविण मी हुरपळते तशी ।
वय नवटदशा, तारुण्य बहर मुसमुशी ।
नुकताच होता प्रारंभ माझे नौतिशी ।
इतक्यांत सखा वारला, मि झाले कशी ।
हें कसें आवडलें भगवंता तुशीं ? ।
जाउन बसते अंधारिं सणाचे दिशीं ।
मी दु:खित मांनसीं, कोणावर न ये रागें भरतां ॥२॥
अयोग्य झालें जनीं, न पहाती मुख माझें नयनीं ।
घरांतील माणसें सारीं मजवर पडलीं फिरुनी ।
सासुसासरा, आप्त आणिक दिर, भाऊ, पिता, जननी ।
कोणींच शकुन घेईना, त्यागिलें मज सर्वत्रांनीं ।
श्वानापरि हें जिणें जातसें आयुष्य दिनरजनी ।
स्वस्थ अता निर्वेध असावें परमेश्वरभजनीं ।
मी असा जिवाला धिर आपल्या देतसे ।
तरि दु:खशमन होइना, अतां करुं कसें ? ।
स्वामींचें स्मरण होतां जीव तळमळतसे ।
झोपेंत सखा दृष्टिपुढें माझ्या दिसे ।
धरिलें कवळुन मज, असा भास होतसे ।
मग सावध होउन बाई मीं हळहळतसे ।
देह अशा दु:खाच्या वणव्यामधें जळतसे ।
समजाउं कितीदां ? मला जाहलें पिसें ।
देहभान दिवस कीं रात्र मला हें नसे ।
उगिच जन्मले, असे व्यर्थ हा भार सृष्टिवर्ता ॥३॥
उत्तम सण संक्रांति आणि त्या गौरि चैत्रमासीं ।
सुवासिनी शृंगारयुक्त फिरताती त दिवशीं ।
थव्यांमागें थवे जाती बायकांचे अति उल्हासीं ।
मी पाहुन त्याकडे न दावी मुख आपलें त्यांसी ।
जाहली रुपाची माती, फार वाईट वाटेल मजसी ।
हाय हाय रे ईश्वरा, काय हें अणिलें अद्टष्टासी ? ।
मजहुन आयुष्य कसें उणें झालें स्वामिला ? ।
अनिवार कहर शिरिं शोकाचा जाहला ।
असा काय पूर्वजल्मिंचा दोष लागला ? ।
कीं विवाह काळीं दिस नव्हता चांगला ? ।
नुसता डाग सौभाग्याचा लागला ।
मी हवा तसा कधि नाहिं सखा भोगला ।
राहिली आशा, रडतांना जिव भागला ।
होनाजी बाळा म्हणे, नारिला उपाय यापरता ।
नाहीं दुसरा, अतां आराधी जो कर्ताहर्ता ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत