चांगुलपण संपदा अशि सुंदर पाहुन झुरतों ।
उदास वाटे दशा, तुझी गडे करित आशा फिरतों ॥धृ०॥
चंद्रानन अतिस्वच्छ, उदय भर पुनवेची भरती ।
सौदामिनिसम साम्य प्रभा पडते भुमिवरती ।
हर जिन्नस हरभास विलासामधें शाहाणि पुरती ।
बिजल्या नारी मोठया तुला पाहुन मागें सरती ।
डामडौल पिढीजाद, चाल तुझी हंसिणिची धरती ।
सापडशील ज्याजला सकळ त्याचीं दु:खें हरतीं ।
सुगराइचा सरसुभा, काय करशील न कळे करणी ।
केवळ किमयागर, कळा नसे शोधन करितां धरणी ।
व्हावें म्हणुन हें राज्य प्राप्त, कबुल जाहलों मरणामरणीं ।
सकाम संचारणी शितळ छाया वरती धरितों ॥१॥
नीट निकोप देह, सरळ झाड सोन्याचें वाढलें ।
मुख पाहतां सौचिता चहुकडे दिसतें उजाडलें ।
रत्न आणिक पाषाण परीक्षेला नाहीं दडले ।
गोड, अंबट, कडु, तिखट ब्रह्मदेवानें निवडले ।
तुझा नाद लागला, दौलतीला पाणी पडलें ।
जन्मीं आल्याचें सौख्य तुला भोगणें हें आवडलें ।
भिडुं दे राउत मैदान, वाट मग होईल ती होउं दे ।
चांडाळ दर्द पापिणी, एकदां कर वरता ठेउं दे ।
नव्हें अमरपटयाचें जिणें, असें कांहीं चित्तामधें येउं दे ।
पिक पिकलें घेउं दे, सराइचा पाहारा सरतो ॥२॥
फार गोरी गुलगुलित, नयनें कमळें जशीं उमलती ।
शिताफळें इरसाल उरावर तसे जोबन हलती ।
बागाइत कळी कनक शेवति गेंद तर्र फुलती ।
तव प्रीतिच्या बळें साध्य हे गजतुरंग झुलति ।
नदर ठरो देइ ना, ध्यान चंचळ, डोळे भुलती ।
धनमालाची खाण, हातीं लागेल त्याची चलती ।
या अष्टसिद्धी नवनिधि हजिर होति एक्या वचना ।
नग नाग निवळ न्याहाळितां दिसे त्रैलोक्याची रचना ।
ता म्हणतां ताकभात इतकी समजावी सूचना ।
मुक्त मदन मोचना हा मोहोमय भ्रम अंतरी भरतो ॥३॥
शुभ लक्षण शुभवंत, शांत शोभा नवि नवाळी ।
देवगुणाची रास, नवट नागीण फिरे गव्हाळी ।
सुमनाक्षर प्रतिवचन मधुर शब्दाची मवाळी ।
एकांति भेटशील त्या दिवशीं आमची दिवाळी ।
विषयानलीं धडधडत काळजामधिं जिव्हा वाळी ।
मन मिळल्याचे अधिं कोराची करूं नये टवाळी ।
सार्‍याहुन आगळी वेगळी लबक वजनदार ती ।
अवघ्यामध्यें कुलकुला तुला शरिराची आर्ती ।
खडकीं कोंब फुटतील असा कधीं परमेश्वर सारथी ।
ज्या ज्या रितीं होशिल मान्य ते ते विचार करितों ॥४॥
धरिली आलिंगुन तुला, अशीं रात्रीं पडती स्वप्नें ।
हीण पदमीण अप्सरा राधिका रंभा कुळदीपनें ।
मोहनामृत विश्रांत योजलों हे प्रपंचदीपने !।
गुणसरोवर जळ वाहे, सखे तूं कल्याण कल्पने ।
परमनिष्ट संतुष्ट सधन संतत सुभाव जपणें ।
अनीत आचरीत, अपरमित अघोर तप तपणें ।
महान यत्न संकटीं मिळालें गोत्र घटित वागतां ।
इच्छित फळ घरीं आलें, लाभलें, निश्चयलय लागतां ।
न वर्णवें संतोष, घोष तो शेषमुखीं सांगतां ।
होनाजी बाळा म्हणे, भोगितां चौर्‍यांशी तरतो ।
मिठमोहर्‍या जिवप्राण दृष्ट तुझि घडिघडि उतरतों ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत