वृद्धि लोभाची करिता जा, मी जाहले राजी ।
घरीं येउनया नवती भोगावी माझी ॥धृ०॥
याल केव्हांसे उभी राहते द्वारापशीं ।
चहूकडे पाहते, लाविते दृष्ट मार्गाशीं ।
अंगाशेजारून हटकरून खेटून जाशी ।
तेव्हां मज वाटे, आज न्यावा तुला घराशीं ।
आराधुन केलें गत जन्मीं साध्य शिवासी ।
तयाचें देणें या जन्मीं आलें दैवासी ।
लुब्धलें तुम्हां इतुकी
मी तर कामातुर भुकी
स्नेहें वरिष्ठ तुमची सखी
मुखानें आणखी गुण तुमचे नित्य नवाजी ॥१॥
तुम्हाला सोडुन कशी राहीन आदांची (?) ।
प्रीत ही दिसते बळकट ऋणानुबंधाची ।
शरिर पातळ, मी जशी नाजुक साय दुधाची ।
मुखावर शोभा टवटवते विषयमदाची ।
नको मज पैका, मी शिरिमंतिण सदाची ।
गुणावर मरते, स्मरते त्रिकाळ तिंदाची ।
काय काय गुण आठवूं ?
पोटांत किती साठवूं ?
बोलाऊं कोणा पाठवूं ?
नका मन ठेऊं परकीवर, तुम्ही मिजाजी ॥२॥
जनामधें सार्‍या मी विकते तुमच्या नांवे ।
बहुत श्रम केले, हें तरी मनांत आणावें ।
दिल्या वचनाला मग लटकें कां हे म्हणावें ? ।
दिसोदिस आगळी प्रीतिची रीत दुणावे ।
सोशिल्या जखमा देह झिजवुन अपल्या भावें ।
वर्ततां ऐशी ती नार अढळपद पावे ।
कोणता पुरुष तरी असा
देइल पुरता भरवसा
नेहमींच मजपाशीं बसा
प्रीतिच्या हंसा, खेळा हो सोंगटीबाजी ॥३॥
फिदा तुजवरती, जशी नागिण झापा घाली ।
येकांतीं रमते रात्रींची आनंदाखालीं ।
हातीं कर धरते, नेते तिसरे ताळीं ।
धीर धरवेना, सुटले मदनाची कुलाली ।
औक्ष माझें सर्वच तुझ्याच हवालीं ।
किती समजावुं ? वेडयाची आतां गत झाली ।
आळ घेऊन पडते गळा
कस्तुरीच्या परिमळा
चालिव रे माझा लळा
होनाजी बाळा म्हणे, भेटत जा तिनसांजी ।
निरंतन भोगुं गुलानार नवती ताजी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत