ही मजा कांहिं उमजा, घेऊन मज निजा,
सख्या, जिव माझा तुमचेपाशीं ।
राजसा ! अधांतरीं कसा देउन भरवसा पाडितां फाशीं ॥धृ०॥
तुम्ही शिरिमंत, मी गरजवंत असतां जिवंत आजपर्यंत मला राखलें ।
स्नेह सबळ झाला सफळ, केवळ हें अमृतफळ चाखलें ।
अमळसे बसा निवळसे, धरा जवळसे, लहानसें मी माणुस धाकलें ।
नावडे मी, कोण आवडे ? येवढें मन तिकडे फाकलें ।
जननीति रीतिच्या स्थिती, सांगुं तरी किती ? असे हे प्रीतीचे दाखले ।
शिव शिव शिव शिव ! म्या कधीं वचन मोडून टाकिलें ? ।
अंतरची खोटी नव्हे । जिवलगा
जें द्याल मला तें हवें ।
झुळ झुळ नवतीजळ नवें । जिवलगा ।
ती रतलें तुमच्यासवें ।
अबळ आम्ही निर्बळा, भाव मोकळा, लाऊनिया लळा गळा कापशी ॥१॥
लाभला लाभ हा मला, गुलाबी फुला, तुला ठाऊक मी पहिलेपासुन ।
धिर सुटे, मोठें भय वाटे, कुठें खोटेंपण आलें दिसुन ? ।
हा समेट कर, या नेट (काया नेट ?) होईना भेटखेट येका गावांमध्यें असुन ।
आवडि मी धरिते गडी, तुम्ही घडि घडि घडि बसतां रुसुन ।
घावली भली सावली, आस लावली, आलि ही भरजानी मुसमुसुन ।
या मुखें कौतुकें सुखें, मुके घ्याहो गालाला डसुन ।
कशि बोलूं म्हणुन लाजते । जिवलगा ।
अर्धांग वेश साजते ।
वेळ पळ पळ मोजिते । जिवलगा ।
मजिं प्रसन्न योजिते ।
सजणा ! लोचना जना, विषयभंजना, विनाकारण कां संतापशी ? ॥२॥
बरकशीं उतरले कशीं, मीच एकशी आतां कशि अर्धा जळिं सोडितां ? ।
मी आटले, पिटले, विटले, कष्टले, दु:खदिवस काढितां ।
हें हसें जनामधिं दिसे, बळाच्या मिषें, कसे बिनअन्याई दंडितां ? ।
शशिप्रभा दिसे कोणी सुभा, वल्लभा, चतुर सभापंडिता ।
ग्राहिका ! नया करूं हिका माझे आयका, हे नरनायका सुगणमंडिता ! ।
अशि गहिर तरतरा मिळेना खरा पुरुष धुंडितां ।
घरच्यावाणि पाळलें । जिवलगा ।
उणें पडतां संभाळले ।
उघडें देखुन डाळलें । जिवलगा ।
ममता वियोगें वाळलें ।
मनोरथा सकळ सारथा ग्रंथभारता वृथा मजवरतां आरोपसी ॥३॥
मी अशी स्वकायनिशी मिळाले तुशी, कां रे मशि रुसशी रागें भरून ? ।
कर्वती शरीर रतीरति, जिती तुजवरती जाते मरून ।
कंठिची माळ सांभाळ, नका घेउं आळ, ढाळ मोत्याचा येईना फिरून ।
नित येते, जाते, पाहाते, तुला शिर हातें वाहाते चिरून ।
हासते, कधीं रुसते, संग सोशिते, गोष्ट मी पुसते पदरीं धरून ।
या नव्या नव्या पाहाव्या, हव्या त्या बहार घ्याव्या करून ।
कोणितरी पाहिलें पुढें । जिवलगा ।
दाखविलें पद येवढें ।
होनाजी बाळा म्हणे गडे । जिवलगे ।
स्त्रीधर्म तुझा आवडे ।
आलें घडून, गेले पाईं जडुन, कल्पना
मोडुन, अडुन धरि, पडुन जाहले पिशी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत