बेलबागीं नांदतो लक्षमीकांत शेषशायी ।
दर्शन घेतां मुक्ती, यांत कांहीं संशय नाहीं ॥धृ०॥
स्तव करितां भावार्थें प्राणी तो निर्भय झाला ।
आनंदमय चित्तांत, नाहीं भय काळत्रयीं त्याला ।
निधान वैकुंठीचें, पहा त्रैलोक्यपाळकाला ।
पायीं मुख लावितां गोड मुक्तीचा प्याला ।
लोटांगण घालित भेटूं या जगश्रीमंताला ।
तथा न धरितां सत्य अढळपद येते हाताला ।
धरावे एकनिष्ठेनें पाय ।
मिळे मग पायापाशीं ठाय ।
इच्छिलें देइल संशय काय ।
पाहातां कोण अधिक याशिवाय ।
पातक जन्मोजन्मीं जाय ।
करितसे शत्रूचा निरउपाय ।
सौम्यरूपी देवा, लय लावा विष्णूचे पाईं ॥१॥
स्थळ निर्मळ, बागांत पुष्प तरुवर सुवास येती ।
केळी, बकुळी, आवळी, सिताफळी, नारळी हालती ।
तुळसी, वृक्ष भोंवते द्राक्षीमंडप संगीन जाती ।
समोर पटांगण, कारंजें, गरूडवाहनमूर्ती ।
शांताकृत हें ध्यान लक्ष्मीनारायण ध्याती ।
धन्यकळा निर्मिता दोहीकडे शिवसुत गणपती ।
चिरे उथळी घोटीव साजती ।
महिरपा खांब सरूचे सुती ।
नादघंटा खणखण वाजती ।
विणे, पखवाज, टाळ गाजती ।
परोपरी शृंगार विराजती ।
पाहतां अवघेच नांवाजती ।
नित्य शोभा दिसते जाजती ।
टाहो फोडती मोर अहोदिन शुभचिन्हें गाई ॥२॥
निश्चय धरितां पाईं पडे अभिमान समर्थातें ।
सज्जन प्रीति पाळुन दुष्टवध करि अपल्या हातें ।
जग आधार श्रीपाल्या वाचे जमा अनंतातें (?) ।
व्यर्थ न जाय कदा मग शासन करी कृतांतें ।
अचल चित्त, एकाग्र, न लावा नेत्राचें पातें ।
न्याहाळा सुंदर चतुर्भज रूप अपल्या रूपातें ।
नसावा सद्‌भजनीं अनमान ।
कीर्तनाकडे लावावे कान ।
करितां हरिनामाचें स्नान ।
पराजय शत्रू रानोरान ।
क्षणिक माया निरसे देहभान ।
जसें लेकरूं धरी आईचें थान ।
करा प्राशन अवघे गुणनिधान ।
होनाजी बाळा म्हणे, ध्यान हें जो अंतरिं ध्याई ।
तो नर जाणा धन्य, देव राहतो त्याचे ठाई ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत