कां निद्रा केलीस मंचकीं मजविरहित मंदिरीं ?
खरें सांगा मजला तरी ॥धृ०॥
प्रथम प्रहर अवशीचा यामध्यें कां डोळा लागला ?
श्रम कोठवर जीवीं वाटला ।
पदर काढितां वरुन तुझा मुखचंद्र म्लान पाहिला ।
तेव्हांच भाव समजला ।
कोण कार्य मसलती रोजगाराची काळजी तुला-।
उद्भवली ? भास मला ।
दुर्बळ आहों आपण म्हणुन कां श्रम वाटती अंतरीं ? ॥१॥
द्वितिय प्रहर लोटली रात्र मध्यान्ह बोलतां तुशीं ।
खरें अजुन कां न सांगशी ? ।
विनंतिच्या नादांत जाउं पाहते ही सारी निशी ।
मग केव्हां मला भोगशी ? ।
मी तों जाहले अधीर, सख्या, तूं चिंताग्रस्त मानसीं ।
पुढें युक्त करावी कशी ? ।
सुखदु:खाची आहे विभागिण सख्या तुझ्याबरोबरी ॥२॥
तृतिय प्रहर झोपेचा निवळ रात्रा चिंचिण वाजती ।
डुकल्या येती मजप्रती ।
मंदिरचे कंदील, समजा, दीप विझूं पाहती ।
यापुढें विनऊं तरि किती ? ।
अघोर निद्रा कुठुन लागली चाडाळिण तुजप्रती ? ।
व्यापिलें तिनें निश्चिती ।
नेत्र उघडुन पहा मजकडे उगिच एकदां तरी ॥३॥
चौथे प्रहरामधें ऐकतां शब्द कांतेचे असे ।
मग कृपादृष्टि पाहतसे ।
म्हणे, सुंदरी ! वृथा श्रमविले तुला अम्ही राजसे !
न कळतां गोष्ट जाहली असे ।
घेऊन मंचकावरी मग तिला गुजगोष्टी पुसतसे ।
प्रियभावें भोगीतसे ।
होनाजी बाळा म्हणे, असेंच अर्जवुन घ्यावें सुंदरी ।
मृदु भाषणें मधुरोत्तरीं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत