"सून-मुलगा अति नालायक आणि वाईट असतात पण आई-वडील-नणंद-जावई ही माणसे देवापेक्षाही श्रेष्ठ आणि आदर्श माणसं असतात" असा संदेश देणारे मराठी चित्रपट बंद होत आहेत आणि मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे मला वाटायला लागले असतांनाच मध्यंतरी एक "स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला आणि वाटलं की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार म्हणजेच मराठी चित्रपट हे सून-मुलगा द्वेष्टेच राहाणार!! असे हे चित्रपट नाण्याच्या केवळ एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं. हे कमी पडले की काय म्हणून बहुतांश मराठी सिरीयल सुद्धा रोज रोज हेच दळण दळत असतात.

मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांना पक्के माहिती आहे की, मराठी चित्रपट (बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या मल्टीप्लेक्स सह) चालण्याचे एकमेव हक्काचे ठीकाण आहे पुणे आणि पुणे येथे पेन्शनर वृद्ध वयस्कर मंडळी जास्त राहातात. मग त्यांच्या मनाला कॅश करुया. मग असे चित्रपट काढतात. पैसे कमावतात.

तरूण मंडळी इमाने इतबारे आपल्या आई वडीलांची सेवा करतात. यात वाद नाही. आदर्शपणाने नव्हे तर प्रॅक्टीकली! शक्य होईल तसे ते आई-वडीलांची हौस मौज करतच असतात, गरजा पुरवतच असतात. 

कोणतेच आई वडील सुद्धा आपल्या मुलांना आदर्शपणे वाढवत नाहीत. तेही प्रॅक्टीकली विचार करूनच शक्य तेवढे शिक्षणच मुलांना देतात. शक्य तेवढे ते मुलांसाठी करतात. स्वतःसाठी काही राखून! बरोबर? 

त्याचबरोबर मग इच्छा मारून मुलेही न आवडणारे शिक्षण आई- वडिलांच्या दबावाखाली किंवा इच्छेखातर पूर्ण करतातच की! 

मुले आयुष्यभर आई-वडीलांखातर, त्यांचे पांग फेडण्याखातर स्वत:च्या अनेक स्वप्नांवर आणि छंदांवर पाणी सोडतातच !! 


मग हेच आई वडील एकदा का वृध्द झाले की अचानक मुलांकडून आदर्शवादी अपेक्षा करतात.का तर ते फक्त "वृद्ध" आहेत म्हणून?

मुलाला लहानपणी अभ्यासासाठी स्वतंत्र खोली सुद्धा न देऊ शकणारे आईवडील मुलगा नौकरीला लागताच शहरामध्ये त्याचेकडून २/3 BHK flat ची अपेक्षा करायला लागतात. हेच नाही तर लहान बहिणीचे/भावाचे ही सगळे मोठ्या मुलाने करावे असा आग्रह धरला जातो. हा मुद्दा मराठी चित्रपट का मांडत नाहीत ???

आजकाल गळेकापू स्पर्धेमुळे पुर्वीच्या पिढी पेक्षा तरुण मंडळींना दुप्पट तिप्पट संघर्ष करावा लागतोय हे लक्षात न घेता फक्त विविध प्रकारचा अपेक्षा ते करताच असतात. आणि या विरोधात मुलगा काही जरी बोलला तरी त्याचे खापर सुनेवर फोडले जाते. याच ठिकाणी त्याच आई- वडिलांचा जावई जर मुलीचे ऐकत असेल तर याच आई वडिलाना आपला जावई आपल्या मुलीच्या मुठीत आहे हे ऐकून कोण आनंद होतो आणि चित्रपटात हा मुद्दा कधीच विचारात घेतला जात नाही. त्या वेळेस मात्र जावयाचे आई वडील खडूस आहेत, आमच्या मुलीचा काही दोष नाही असा प्रचार केला जातो. लक्षात आला का विरोधाभास? हा मुद्दा चित्रपटात ठळकपणे दाखवला पाहिजे.

त्यात मग अशा सिनेमांमुळे तरुणांची गळचेपी, मुस्कटदाबी होते. काही घरांमध्ये असे आदर्शवादी आणि मुलगा-सून द्वेष्टे मराठी चित्रपट बघण्यासाठी "मुला-सूनेवर" दबाव टाकला जातो आणि टोमणे मारले जातात हे सत्य आहे. सगळीकडेच नसेल पण हे आहे. "पहा पहा कशा एकेक सुना असता बाई!!" "पहा तीने सासूचे पाय दाबायला नकार दिला?! 

एकदा सुलोचना दिदी म्हणाल्या होत्या की, प्रेक्षकांनी जास्तीत जास्त मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत. पण, निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांचेकडे असल्या "आगलाव्या" चित्रपटांशिवाय दुसरे काही दाखवायला नसेल तर माझ्यासारखे असंख्य त्रस्त प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवतीलच. हे विषय सोडले  तर मराठी चित्रपटांचा दर्जा उत्तम असतो यात वादच नाही.

चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे कोणताच मुलगा-सून टोकाचे वाईट नसतातच. बहुतेक सासवा सुद्धा तश्या नसतात. मात्र हुंड्यासाठी सुनेला जाळून मारणाऱ्या सासवा आजही आहेत. त्यांना कायदेशीर पणे अटकही होते असे दाखवणारे चित्रपट का बनवत नाहीत? 

अशा सासवा म्हणजे खुनीच की. 
पुरुष एक खून केला की तुरुंगात खितपत पडतो. 
मात्र घराघरातींल अशा "जाळकुट्या" आणि अखंडपणे शब्दांनी सुनेला छळत रहाणार्या "दहशतवादी" बायकांचे काय करायचे?? त्याना कोण अटक करणार??
त्यांच्यावर चित्रपट कधी निघणार?? चित्रपटात त्याना अटक होते आहे फाशी होते आहे असे कधी दाखवणार? जेणेकरून अशा प्रवृत्तीला आळा बसेल!!

याच सासवा स्वत:च्या मुलीच्या आणि जावयांच्या चुकांवर मात्र जाडजूड चादर पांघरतात आणि सुनेची छोट्यात छोटी चूक मोठ्ठी करुन सगळीकडे सांगितली जाते, याला काय म्हणावे? 

सासू-सून वाद हे पिढीततले अंतर असल्याने आहे, हे एकवेळ समजू शकते, पण एकाच वयाचे, एकाच काळातले असूनही सून-नणंद-भावजय एकमेकांना समजावून का घेऊ शकत नाही??

अशा या अति भयानक घरगुती दहशतवादाला खतपाणी घालणारे हे चित्रपट बंद झाले पहिजेत असं मी म्हणत नाही, पण कमीत कमी त्याची कथा ही दोन्ही बाजू मांडणारी हवी.खतपाणी मी यासाठी म्हणालो की घराघरात मुलगा-सून हे आई-वडिलांना त्यांची चूक लक्षात आणून देवू शकत नाही कारण ते "मोठे" असतात आणि एक प्रभावी माध्यम म्हणून चित्रपटाकडे गेले तर ते चित्रपट सुद्धा "मुलगा-सून" हे नेहेमी चुकतातच असेच दाखवतात त्यामुळे सासू-नणंद याना फावते म्हणजेच त्यांच्या वागणुकीला खतपाणी घातले जाते. बरोबर की नाही?

महेश मांजरेकर नेहेमी हट के चित्रपट बनवतात. त्यांचे कडून एक तरी "मुलगा-सून" यांची बाजू मांडणारा चित्रपट पुढे येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा पूर्वी असे चित्रपट काढून वीट आणायचे (अवतार-राजेश खन्ना, उमीद, बागबान वगैरे)

जर असे मानले की "समाजातलेच प्रतिबिंब चित्रपटात उमटते" तर माझ्या आजूबाजूला आणि समाजात आणि मित्र मंडळी मध्ये मला इतके टोकाचे दुष्ट मुलगा-सून आणि आदर्श मुलगी-जावई कधी कुठे पाहाण्यात नाहीत. 

याउलट वर्तमानपत्रांमधील ९० टक्के बातम्या पाहाता सासू-सासर्याच्या-नणंदेच्या छळवादी वृत्तीला आणि अत्याचाराला कंटाळून स्वत:ला संपवणार्या सुनांच्या बातम्याच वाचायला मिळतात.... 

काय वाटते आपल्याला? 

असल्या अतिशयोक्तीपूर्ण चित्रपटांची/सिरीयल्सची आवश्यकता आहे का??

मुलगा आणि सून द्वेष्ट्या ढीगभर चित्रपटांची/सिरीयल्सची गरज आहे का?

दहा चित्रपट/मालिका "सून-मुलगा द्वेष्ट्ये" आणि "आई-वडील-मुलागीई-जावई धार्जिणे" असले तर एक तरी चित्रपट नाण्याची दुसरी बाजू दाखवणारा का नसावा???

मला एक हिंदीतला "वक्त" नावाचा अक्षय कुमार आणि अमिताभचा एक चित्रपट आठवतो तो मुलगा- सून यांची चांगली बाजू दाखवतो!!!

कुणाला माहिती आहे का असा एखादा मराठी चित्रपट ज्यात सून-मुलगा यांची चांगली बाजू मांडली आहे??

माहिती असेल तर येथे सांगावे. म्हणजे तो चित्रपट समाजातील "सून-मुलगा द्वेष्ट्या" सासू-सासार्याना दाखवायाला बरे!!! काय म्हणता? खरे की नाही?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाचनस्तु


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
रत्नमहाल
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
बाधा